तरंगेवाडीच्या शिक्षकाने शाळेसाठी केले ६ लाख रु. खर्च
पुस्तक वाचा, मोबाईल हटवा आणि १ रूपया बक्षीस मिळवा
सांगोला : डॉ. नाना हालंगडे
शिक्षकीपेशाबाबत आजकाल नकारात्मक अर्थाने बोलले जाते. मात्र समाजात आजही असे काही शिक्षक आहेत की ते आपल्या कामातून समाजाच्या कौतुकास पात्र ठरतात. तरंगेवाडी (ता.सांगोला, जि. सोलापूर) येथील उपक्रमशील शिक्षक खुशालुद्दिन शेख यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी शाळेच्या विकासासाठी लॉकडाऊन काळातील १८ महिन्यांच्या पगारातील सहा लाख रुपये दान केले आहेत. शिवाय जे विद्यार्थी, पालक, युवक पुस्तक वाचून त्यावर अभिप्राय देतील त्यांना १ रुपया बक्षीसही देणार आहेत. यापूर्वी शिक्षक शेख यांनी राबविलेला डिजिटल जंगल स्कूलचा उपक्रम खूपच महत्त्वाचा आहे. झेड.पी. सीईओ दिलीप स्वामी तसेच शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी या शाळेस भेट देऊन शेख यांचे कौतुक केले आहे.
खुशालद्दीन उस्मान शेख हे शिक्षक जि.प.प्राथमिक शाळा सांगोलकर- गवळीवस्ती (तरंगेवाडी, ता. सांगोला) येथे कार्यरत आहेत. त्यांनी लॉकडाऊन काळातील 18 महिन्याचा मिळालेल्या पगारातील 15 हजार रुपये घरखर्चाला ठेवून उरलेला पगार एकूण 6 लाख रुपये शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी शाळेला दान केला आहे. त्यातून शाळेच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.
1) गरजूवंत विद्यार्थ्यांना अण्ड्रोइड मोबाइल, सिमकार्ड, रीचार्ज व प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाइलवर 1500 रुपये किमतीचे ई-लर्निंग सॉफ्टवेअर. (खर्च- 1 लाख 70 हजार रुपये)
2) शाळा डिजिटल करण्यास लॅपटॉप, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टिम व ई लर्निंग सॉफ्टवेअर. (खर्च- 1 लाख 40 हजार रुपये )
3) विद्यार्थ्याच्या मनातून कोरोंना भीती जाण्यासाठी वर्गात डिजिटल जंगल क्लासरुमची निर्मिती (खर्च- 1 लाख 10 हजार रुपये)
4) शाळा व वर्ग रंगरंगोटी, डिजिटल तक्ते, पताके, रचनावाद चित्रे. (खर्च- 60 हजार रुपये)
5) विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर पालकांचे नियंत्रण राहावे, यासाठी वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. (खर्च : 25 हजार रुपये)
6) विद्यार्थ्यांना चालण्यासाठी वर्गात हार्डमॅटची सोय
7) शाळेत संगणक कक्ष, परसबाग, वृक्षारोपण (खर्च : 15 हजार रुपये)
8) विद्यार्थ्याचे मोबाईल प्रमाण कमी करण्यास व वाचण्याची सवय अंगी लागावी यासाठी 1000 पुस्तकांच्या सहायाने ‘पुस्तक वाचा, मोबाइल हटवा, 1 रुपया मिळवा’ या उपक्रमाची सुरुवात. (खर्च- 50 हजार रुपये)
उपक्रमशील शिक्षक खुशालुद्दिन शेख यांनी आपल्या पगारातील ६ लाख रुपये गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांच्याकडे दान केले आहेत. यावेळी मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी, शिक्षक सुशांत शिंत्रे, श्रीमंत गावडे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
डिजिटल जंगल स्कूलची भन्नाट कल्पना
शिक्षक खुशालद्दीन शेख यांनी या शाळेत जंगल स्कूलची भन्नाट कल्पना राबवली आहे. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताच त्याला आपण जंगलात गेल्याचा अनुभव येतो. जंगल स्कूलमध्ये त्यांनी वर्गातील सर्व भिंतीवर जंगलातील प्राणी ल, झाडे झुडपे , पक्षी यांची चित्रे काढलेली आहेत. कृत्रिम प्लॅस्टिक झाडाच्या फांद्या, फुले , फळे , पक्षी यांची सजावट केली आहे . घनदाट जंगलाचा रात्रीच्या वेळेचा विद्यार्थ्यांना अनुभव येण्यासाठी डिजिटल लाईटिंग केली आहे. यावेळी वर्गात साऊंड सिस्टिमच्या साह्याने फॉरेस्ट साऊंड इफेक्ट म्हणजेवाहते पाणी , वारा, पक्षी व प्राण्यांचे आवाज , पडणारा पाऊस यांचा इफेक्ट दिला आहे. त्यामुळे वर्गात बसून विद्यार्थ्यांना जंगलात असल्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसभर अध्ययनात गोडी निर्माण होते.
Very nice