डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वळसंगची विहीर आणि खून खटला

राजेंद्र पातोडे यांचा विशेष लेख

Spread the love

आपल्या हयातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूरला येऊन गेले. १९२१, १९२७, १९३५, १९३७, १९४२ व १९४६ साली असे अनेकवेळा डॉ. बाबासाहेब हे सोलापुरात येऊन गेल्याचे संदर्भ आढळतात. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने सजीव झालेली वळसंग येथील विहीर आजही त्या इतिहासाची साक्ष देत आहे.

आंबेडकरी जनतेसाठी २४ जानेवारी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) या गावातील विहिरीच्या लोकार्पण तसेच शिवप्पा पाटील ह्यांची खून खटल्यातून केलेली निर्दोष मुक्तता ह्यासाठी. युवा जोडो अभियान अंतर्गत वंचित बहूजन आघाडीच्या युवा प्रदेश कमिटीने सोलापूर जिल्ह्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू केला होता. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सोलापूर येथील नगरसेवक तथा प्रदेश प्रवक्ता आनंददादा चंदनशिवे ह्यांचे समवेत वळसंग गावी आम्ही भेट दिली. २४ जानेवारी १९३७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या हस्ते ह्या गावातील विहीरीचे उदघाटन करण्यात आले होते. अस्पृश्य समूहाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून त्याकाळात वळसंग येथील विहीरीचे लोकार्पण केले होते. एवढेच नाहीतर शिवप्पा पाटलांची फाशीच्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता करणारे बाबासाहेब ह्यांच्या रोमहर्षक इतिहास असलेल्या वळसंग गावचा इतिहास अंगावर शहारे उभे करतो.

पावन भूमी वळसंग येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विहिरीचे उद्घाटन केले. त्याची कहाणी अशी आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन केलेली पाणी पुरवठ्याची ऐतिहासिक सार्वजनिक विहिर आणि परिसर आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष देत आहे. आपल्या हयातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूरला येऊन गेले. १९२१, १९२७, १९३५, १९३७, १९४२ व १९४६ साली असे अनेकवेळा डॉ. बाबासाहेब हे सोलापुरात येऊन गेल्याचे संदर्भ आढळतात. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने सजीव झालेली वळसंग येथील विहीर आजही त्या इतिहासाची साक्ष देत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३७ ला या विहिरीचे पाणी प्राशन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे १९३७ पूर्वी दलित बांधवांनी स्वतःच्या वस्तीसाठी स्वतंत्र सार्वजनिक विहीर श्रमदान आणि लोकवर्गणीतून बांधली होती. त्याच सुमारास बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर वळसंगला येऊन आडाच्या पाण्याला स्पर्श करीत नाहीत तोपर्यंत आडाचे पाणी कोणीही प्यायचे नाही असा पवित्रा येथील दलित बांधवांनी केला होता. अखेर तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते भुजंगप्पा रुई, तेजप्पा वाघमारे, ओंकारी गायकवाड, विजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून २४ जानेवारी १९३७ रोजी बाबासाहेब आंबेडकर वळसंग येथे आले. स्वातंत्रसैनिक गुरुसिध्दप्पा अंटद यांनी स्वत:ची बैलगाडी बाबासाहेबांच्या मिरवणूसाठी उपलब्ध करून दिली. मिरवणूकीनंतर बाबासाहेबांनी त्यावेळी बाबासाहेबांचे औक्षण करणाऱ्यांना बाबांनी स्वतःच्या हातांनी रेशीम दोर आणि चांदीच्या ग्लासाने आडातील पाणी शेंदुन दिले… स्वतः बाबासाहेबांनी विहिरितले पाणी पिले… आणि ह्या विहिरीचे लोकार्पण केले. तेव्हापासून आजही येथील बांधव याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात.

२४ जानेवारी १९३७ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गावाला भेट दिल्यापासून येथे लोकोत्सव साजरा होतो. सोलापूर जिल्ह्यातील वळसंगच्या ग्रामस्थांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग म्हणून त्याची जपणूक केली जाते. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वळसंग गावाला २४ जानेवारी १९३७ रोजी भेट दिली होती. तेव्हापासून २४ जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गावात सगळीकडे रांगोळ्या काढल्या जातात. मिठाई वाटप केली जाते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांच्या भेटीचा ऐतिहासिक ठेवा वळसंगकरांनी उत्सवाच्या रुपात जपून ठेवला आहे.

शिवप्पा पाटील ह्यांची फाशीची शिक्षा
“एका खूनप्रकरणी इंग्रजांनी माझ्या वडिलांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच त्यांची त्यातून निर्दोष सुटका होऊ शकली आणि आमच्या पाटील घराण्याची वंशवेल बहरू शकली. त्यामुळे आजही आमच्या घराण्यात देवदेवतांच्या पूजेआधी आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा होते. गेल्या ७० वर्षांपासून ही परंपरा आम्ही जपली आहे. बाबासाहेब दैववादी नव्हते. महापुरुषांचे दैवतीकरण करणेही समाजहिताचे नाही. तरीही तो महामानव आमच्यासाठी दैवतच आहे.” कृतज्ञतापूर्ण शब्दांत सांगत होते माजी आमदार (कै.) गुरुनाथ पाटील यांचे बंधू सिद्रामप्पा पाटील. हे ऋण त्यांच्या शब्दाशब्दांमधून व्यक्त होत होते.

बाबासाहेबांप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि अभिमान
सिद्रामप्पा पाटील सांगतात की, “माझे वडील शिवप्पा पाटील. होटगी (ता. दक्षिण सोलापूर) गावची पाटीलकी सांभाळायचे. परिसरात मोठा मान. मात्र, केवळ त्यांच्याच शेतात एक मृतदेह सापडला आणि या कारणावरून पोलिसांनी त्यांना विनाचौकशी अटक करून तुरुंगात डांबले. १९३६ ची ही घटना. याप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ते कारागृहात असतानाच माझे मोठे बंधू शरणबसप्पा यांचा जन्म झाला होता. वंशाचा दिवा जन्मल्याने घरी आनंदाचे वातावरण असले तरी एकुलत्या एका मुलाला फाशीची शिक्षा झाल्याने माझे आजोबा पुंडलिक पाटील यांचा आधारच तुटला. त्यांनी पनवेल येथे जाऊन हा खटला लढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साकडे घातले. बाबासाहेब तेथील फार्महाऊसवर विश्रांतीसाठी येत असत. ही माहिती आमचे नातेवाईक आठवणे यांना होती. त्यांच्या माध्यमातून आजोबांनी बाबासाहेबांची भेट घेतली. परंतु, माझ्या आजोबांना कन्नडशिवाय अन्य भाषा येत नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांना खटल्याविषयी नेमके कळेना. त्यांनी सोलापुरातील अण्णासाहेब ऐदाळे यांना बोलावून घेतले. ऐदाळे यांनी त्यांना या खटल्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बाबासाहेबांनी हा खटला विनाशुल्क लढवण्याची तयारी दर्शवली. सत्र न्यायाधीश युरोपीयन असल्याने त्यांना आरोपीची भाषा कळत नाही, त्यामुळे अपिलात हा खटला विजापूर येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली, ती मान्य झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर २४ जानेेेेेवारी १९३७ रोजी वळसंग येथे आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून रेल्वेने विजापूरला गेले. त्यांनी न्यायालयात केलेल्या बिनतोड युक्तिवादाने माझ्या वडिलांची त्यातून निदरेष सुटका झाली. त्यानंतर माझ्या आजीने गहिवरत मुलगा शरणबसप्पास बाबासाहेबांच्या ओटीत घातले.”

क्रांतिसूर्याच्या दर्शनासाठी गर्दी
हा खटला डॉ. आंबेडकर लढवणार असल्याचा विषय त्यावेळी चर्चेचा बनला होता. सोलापूर व विजापूर जिल्ह्यातील लोकांना त्याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्यासाठी आणि त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी त्यांनी विजापूरच्या न्यायालयात गर्दी केली होती. न्यायालयाच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

मिरवणुकीचेही होते स्वागत

पाटील कुटुंबीय पुढाकार घेऊन होटगी येथेही आंबेडकर जयंती उत्सव साजरा करायचे. माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव हरिष पाटील हे आता सोलापुरातील शिक्षक सोसायटीत राहण्यास आहेत. तरीही परंपरेत खंड पडला नाही. याठिकाणीही ते आंबेडकर जयंतीदिनी निघणार्‍या मिरवणुकीचे घरासमोर स्वागत करतात. आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. आंबेडकरांच्या ऋणाचे पाटील कुटुंबीय उतराई करू शकणार नसल्याची भावना हरिष पाटील यांनी व्यक्त केली.

“वडिलांची सुटका झाल्यानंतर माझे बंधू गुरुनाथ, बहीण हिराबाई व माझा जन्म झाला. अन्यथा आम्ही हे जगही पाहिले नसते. पुढे गुरुनाथ आमदार झाला. पाटील घराण्याने राजकीय क्षेत्रात नावलौकिक कमावला, तो फक्त बाबासाहेबांमुळेच. आम्ही त्यांच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही”, अशी भावना देखील सिद्रामप्पा पाटील, शिवप्पा पाटील यांचे चिरंजीव हे गहिवरून व्यक्त करतात.

“बाबासाहेबांच्या रूपाने आमच्या पाटील कुटुंबासाठी देवच धावून आला. आम्ही त्यांना देवासमानच मानतो. जयंतीदिनीही सर्व कुटुंबीय एकत्र येऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो”, हे शब्द आहेत शिवानंद पाटील यांचे. शिवानंद पाटील नगरसेवक होते आणि शिवप्पा पाटील यांचे ते नातू आहेत. त्यांची ही भावना “मुक्तीदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक”मध्ये प्रकाशित झाली होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा “भीमपराक्रम” ची साक्ष देणाऱ्या वळसंगमध्ये प्रदेश कमिटी पदाधिकारी प्रदेश अध्यक्ष निलेशभाऊ विश्वकर्मा, मी स्वतः, प्रदेश सदस्य अॅड. सचिनजी जोरे, सोलापूर जिल्हा निरीक्षक विशालजी गवळी, ऋषिकेश नांगरे पाटील, अक्षय अण्णा बनसोडे भारावून गेलो होतो. वळसंगच्या बांधवांकडून आमचा सत्कार व सन्मान करण्यात आला होता. ह्यावेळी संजीवनी गायकवाड, चंद्रशेखर मडीखांबे, रवि गायकवाड, शंतनू गायकवाड, राहुल मोरे, खाजाप्पा एवाळे, गुंडाप्पा आरेंकेरि, नागेश हरवाळकर व वळसंग गावकरी उपस्थित होते. अकोल्याचे माझे सहकारी विजय तायडे आणि पुरुषोत्तम अहिर हे देखील त्याभेटीचे साक्षीदार होते.

– राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेश
(९४२२१६०१०१)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका