डॉ. आंबेडकर आणि धुळ्यातील लांडोर बंगला

ऐतिहासिक प्रसंगाला यंदा ८४ वर्षे पूर्ण

Spread the love

धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे. या ठिकाणी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते. या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा ८४ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी ३१ जुलैला या ठिकाणी ‘भीमस्मृती यात्रा’ भरविली जाते त्यानिमित्ताने…’

बाबा आले कळले जनाला
धावली दुनिया बघाया भिमाला ।
हर्ष झाला दलित दीनाला
रंजल्या – गांजल्या पीडित जीवाला ।।

अभिमानाने जोपासलेला अनमोल ठेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाज व देशासाठी दिलेल्या भरीव योगदानात एक सुवर्णपान खानदेशाच्या वाट्याला आले आहे. ८२ वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या धुळे – खानदेश भूमीचा स्मृतिगंध आजही दरवळत आहे. जुन्या – नवीन पिढीने आदराने व अभिमानाने जोपासलेला हा अनमोल ठेवा आजही नगरवासीयांना आनंदित, पुलकित करीत आहे. लळिंग किल्ल्यावरील ‘लांडोर’ बंगल्यात बाबासाहेबांचे वास्तव्य, राजेंद्र छात्रालय, राजवाडे संशोधन मंडळाला दिलेली भेट आणि दीनदलितांना दिलेला मौलिक संदेश परिवर्तनवादी वाटसरूला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहे. प्रेरणा देत आहे.

खांद्याला खांदा लावून चळवळीत काम
धुळे तालुक्यात अनेक भीमपुत्रांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून चळवळीला गतिमान केले होते. समता सैनिक दल, जयभीम विजय व्यायाम शाळा त्याकाळी आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनले होते. आप्पासाहेब लळिंगकर, कॅप्टन भीमराव साळुंखे, डी.जी. जाधव, मंडाबाई मोरे इत्यादी निष्ठावंत शिलेदारांच्या प्रेमापोटीच बाबासाहेबांचा धुळे शहराला पदस्पर्श लाभला होता. महिलांना अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून मुक्तीचा संदेश देणारी परिवर्तनाची चळवळ याच भूमीतून सुरू झाली.

परिवर्तनाचे रोपटे
३१ जुलै १९३७ रोजी परिवर्तनाचे रोपटे लावण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले आणि लळिंगच्या मातीने सामाजिक परिवर्तनाचा गौरवशाली इतिहास लिहिण्याचे अतुलनीय कार्य केले. बाबासाहेब आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी त्यांनी अंधारात खितपतणाऱ्या वंचितांना, दीन – दुबळ्यांना, उपेक्षितांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा महामंत्र दिला. अशा अनेक प्रकाशवाटा आज प्रेरणादायी स्मारकात रूपांतरित झाल्या आहेत. असाच एक प्रकाशवाट दाखवणारा आणि बाबांच्या धीरगंभीर पदस्पर्शाने पावन झालेला लळिंगचा ‘लांडोर बंगला’ भीमस्मृती स्मरकाच्या अपेक्षेने डौलाने उभा आहे.

गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणला
तो काळ १९३५ चा होता. पहाटे ५ वाजता बाबासाहेबांचे धुळे रेल्वेस्थानकावर आगमन झाले . ‘बाबासाहेब धुळे शहरात आले … !’ अशी गोड वार्ता कानी पडताच संपूर्ण आंबेडकरी समाज आनंदाने न्हाऊन निघाला.. यावेळी बाबासाहेबांचे जोरदार स्वागत करण्यात आले … ‘डॉ. आंबेडकरांचा विजय असो’च्या गगनभेदी घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता.

कोर्ट केससाठी आले होते बाबासाहेब
बाबासाहेबांनी धुळे शहराला दिलेली ही पहिली भेट होती. बाबासाहेब एका केसच्या संदर्भात दुसऱ्यांदा धुळेच्या सिंदखेडा तालुक्यात आले होते. त्यावेळी स्काउट गाईड व समता सैनिक दलाच्या सेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. केस बाबासाहेबांनी जिंकली. बार कौन्सिलच्या कार्यक्रमासाठी बाबासाहेब तिसऱ्यांदा रेल्वेने धुळ्यात आले. कोर्टाच्या तारखेस उपस्थित राहिल्यानंतर जाहीर सभा घेतली. सभेत बाबासाहेबांनी महिला वर्गाला ओजस्वी संदेश देत ‘कष्ट व शीलाचे महत्त्व पटवून दिले. बार लायब्ररीला भेट दिली. सोबत इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन संस्थेला सदिच्छा भेट दिली. त्याच दिवशी रात्री ८ वाजता बाबासाहेबांची मनपा शाळा क्रमांक पाचच्या मैदानावर भव्य जाहीर सभा झाली.

अप्पासाहेब लळिंगकरांची बाबासाहेबांवर श्रद्धा
लळिंग निवासी अप्पासाहेब लळिंगकरांची बाबासाहेबांवर अगाध श्रद्धा व प्रेम होते. बाबासाहेब जेव्हा धुळे शहरी येत तेव्हा अप्पासाहेब त्यांना ‘लळिंग’ या आपल्या मूळगावी येण्याचे आमंत्रण देत. बाबासाहेबांनी तीन दिवस २९ ते ३१ जुलै १९३७ रोजी लळिंगच्या ‘लांडोर’ बंगल्यावर वास्तव्य केले केवळ अप्पासाहेब लळिंगकरांच्या आग्रहाखातर, प्रेमापोटीच.

‘अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुलांना शिकवा’
या ठिकाणीही बाबासाहेबांनी स्त्रियांची एक सभा घेऊन ‘अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुलांना शिकवा’ असा स्फूर्तीदायक संदेश दिला. या ऐतिहासिक घटनेला यावर्षी ८४ वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाने या स्थळाला ‘परिवर्तनभूमी’ म्हणून घोषित करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्राचार्य जे.जी. खैरनार, ईश्वर कर्डक, एम.जी. धिवरे, प्रा. बाबा हातेकर, संजय पगारे, शशी वाघ यांच्या पुढाकाराने दरवर्षी ३१ जुलै १९९२ पासून नियमितपणे ‘भीमस्मृती यात्रा’ भरविली जाते.

लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगल्यातील बाबासाहेबांचे वास्तव्य हे आज खऱ्या अर्थाने स्मृतिस्थळ बनले आहे. धुळे ट, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह गुजरात, मध्य प्रदेशातील असंख्य भीमानुयायी या पावन स्थळी आपली भावसुमने अर्पण करण्यासाठी भेट देतात.

– मिलिंद मानकर, नागपूर
(मो. ८१७७८६६३९७)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका