डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही विचारांची उपयुक्तता

अमित वासुदेव गजभिये (नागपूर) यांचा विशेष लेख

Spread the love

डॉ. आंबेडकरांनी जी मूल्ये मांडली. भारताचे आणि भारताच्या लोकशाहीचे प्राक्तन मांडले त्या अधिष्ठानाच काय? त्या मूल्यांच काय? डॉ. आंबेडकरांना वेगवेगळ्या मूल्यांनी आठवण्याचा आणि साठवण्याचा हा प्रयत्न आहेच,  पण हे होत असताना आजच्या समकालीन परिप्रेक्ष्यात आपल्याला थोडे बघावे लागणार आहे आणि किंचित आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

आधुनिक भारताच्या उभारणीत व वाटचालीत डॉ. बाबासाहेब आबेडकरांची भूमिका आणि योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. विसाव्या शतकातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासाचे आकलन आणि विवेचन डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा परामर्श घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हा शब्दश: आणि अक्षरश: महामानव. या महामानवाने जे काही केले तो अक्षरश : एक चमत्कार होता. जगाच्या इतिहासामध्ये अनेक मोठी माणसं आहेत. पण या उंचीचा, या ताकतीचा महापुरूष जगाच्या इतिहासात तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हा महामानव कुठल्या एका जातीचा नाही. कुठल्या एका धर्माचा नाही आणि कुठल्या एका देशाचा सुद्धा नाही, तर खर म्हणजे अवघ्या मानवी समुदायाचा हा महामानव आहे. स्वतंत्र भारताला संविधान देणारा, इथल्या शोषितांना, पीडितांना, वंचितांना आणि उपेक्षितांना आवाज देणारा, इथल्या स्त्रियांसाठी खऱ्या अर्थाने मुक्तीचे दरवाजे उघडणारा असा हा महापुरुष आहे. डॉ. आबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जे काही दडले आहे ते अक्षरश: विलक्षण आहे. जगभरातल्या अभ्यासकांना, विचारवंतांना आणि विद्वानांना आश्चर्य वाटते की अशाप्रकारचा एक माणूस कसा असू शकतो. ज्ञानाच्या सगळ्या कक्षा आणि सगळ्या शाखा कवेत घेणारा हा महामानव आहे. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मावनवंशशास्त्र, इतिहास, धर्म, अध्यात्म या सगळ्या शाखांना कवेत घेणारा मोठा माणूस म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. या महामानवाने आपल्या उन्यापु-या ६५ वर्षांच्या आयुष्यात भारतात जे काही केले तो खरोखरच एक विलक्षण चमत्कार आहे. या महामानवाने आपल्या आयुष्यात एक राज्यघटना जाळली आणि त्याच आयुष्यात दुसरी राज्यघटना दिली. असा माणूस जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही.

सामान्यपणे नेहमी असे होते की, कुठलातरी एक महापुरूष एखादे स्वप्न बघतो. त्यानंतर कुणीतरी त्या वाटेवर चालतो, धावतो आणि त्यानंतर कुणीतरी ते कार्य बऱ्यापैकी पूर्ण करतो. त्यामध्ये कित्येक पिढ्या जातात. पण आपल्या एकाच हयातीमध्ये एवढे मोठे काम करणारा हा महामानव आहे. डॉ. आंबेडकरांना आठवताना हा वारसा महत्त्वाचा आहे. त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. पण शेवटी समकालीन संदर्भात पुढे जावे लागणार आहे. कारण डॉ. आंबेडकरांनीच जॉन स्टुअर्ट मिलला कोट करताना म्हटले होते की, “विभूतीपूजा सुरू होते तेव्हा लोकशाही संपते.” दुर्दैवाने डॉ. आंबेडकरांच्या संदर्भात सुद्धा असेच झाले आहे आणि होत आहे. ज्या आंबेडकरांनी विभूतीपूजा नाकारली त्या आंबेडकरांच्या संदर्भात विभूतीपूजा सुरू झाली आहे. अनेकदा असे घडते की, एकदा विभूतीपूजा सुरू झाली आणि माणूस देव्हा-यात गेला की मग विचार मागे पडतात. डॉ. आंबेडकरांचा विचार महत्त्वाचा आहे. त्यांनी ज्या मूल्यांवर, ज्या निष्ठावर आणि अधिष्ठानावार भारत नावाचा देश उभा करण्याचा प्रयत्न केला. ते मूल्य, निष्ठा आणि अधिष्ठान किती महत्त्वाचे आहेत. पण अनेकदा आपल्याला त्याचा विसर पडतो. अलीकडे दोन गोष्टी प्रामुख्याने घडताना दिसत आहेत. एक म्हणजे महापुरुषांचे अपहरण होत आहे. एरव्ही तुमची मूल्ये वेगळीच आणि तरीही हा महापुरूष आमचाच असे म. गांधी, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासंदर्भात घडत आहे. डॉ. आंबेडकरांबद्दल हे नेहमीच घडत आले आहे. कारण डॉ. आंबेडकर अनेकांना मूल्यांपेक्षा चलनी नाण्यांसारखे वाटतात. त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे अलीकडचे राजकारण आणि समाजकारण हे कमालीचे प्रतीकात्मक होत आहे. म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा मुद्दा पुढे आला बस झालं. तुम्ही त्यांच्या विचाराने देश आणि राज्य चालविता की नाही हे महत्त्वाचे नाही. त्यांचं स्मारक होते आहे म्हणजे झालं. अशावेळी आजच्या समकालीन राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आंबेडकरवाद किती महत्त्वाचा आहे आणि आपण आंबेडकरवादापासून किती दूर जात आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे.

लोकशाहीवर हल्ला होत असताना, संविधानावर हल्ला होत असताना डॉ. आंबेडकरांना आठवणे, त्यांना साठवणे हे केवळ प्रतीकात्मक नाही. केवळ त्यांच्या स्मारकापुरते मर्यादित नाही तर ते त्यांच्या मूल्यांशी, निष्ठांशी आणि अधिष्ठानाशी संबंधित असून त्या दृष्टीने बोलावे लागणार आहे. डॉ. आंबेडकरांनी जी मूल्ये मांडली. भारताचे आणि भारताच्या लोकशाहीचे प्राक्तन मांडले त्या अधिष्ठानाच काय? त्या मूल्यांच काय? डॉ. आंबेडकरांना वेगवेगळ्या मूल्यांनी आठवण्याचा आणि साठवण्याचा हा प्रयत्न आहेच,  पण हे होत असताना आजच्या समकालीन परिप्रेक्ष्यात आपल्याला थोडे बघावे लागणार आहे आणि किंचित आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना संजय आवटे लिहितात, “हजारो वर्षे ज्या समुदायाला जनावरांपेक्षाही वाईट आयुष्य जगावं लागलं, अशा माणसांना सोबत घेऊन न्यायाची लढाई लढण्यासाठी क्रांतिकारकाचं तेज आणि एखाद्या संताची स्थितप्रज्ञता हवी. प्रस्थापित व्यवस्थेनं ज्या आयुधांनी तुमची कत्तल केली, तीच आयुधं आत्मसाद करून व्यवस्थेची फेरमांडणी करण्यासाठी असाधारण प्रतिभा हवी, अपवादात्मक व्यासंग हवा आणि कमालीची कमिटमेंट हवी. बाबासाहेबांकडे हे सगळं होतं. खरं म्हणजे याहून जास्तच होतं. म्हणून तर, प्रगत अमेरिकेत बराक ओबामांना जो पराक्रम करायला एकविसावं शतक उजाडावं लागलं, त्याहून मोठा पराक्रम विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच बाबासाहेब करू शकले.”

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र प्राप्त झाल्यानंतर भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासन व्यवस्थेची मूल्य रूजविणे हे एक आव्हान होते आणि ते एक साहस सुद्धा होते. परंतु, या आव्हानाला आणि साहसाला विचारांचा, प्रामाणिक तळमळीचा आणि अभ्यासाचा पाया होता. पं . जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल सातत्याने या लोकशाही मूल्यांची मांडणी करत होते. त्यामुळेच भारतासारख्या खंडप्राय देशाला हे साहस पेलता आले आणि आधुनिक भारताची उभारणी करता आली. डॉ. आबेडकरांची लोकशाहीची संकल्पना ही त्यांनी भारतीय राजकीय विचाराला दिलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी देणगी आहे. लोकशाहीवर बाबासाहेबांचे एक अतिशय महत्त्वाचे भाषण आहे त्यात ते म्हणतात, ” लोकशाही हे राज्यकारभाराचे स्वरूप आहे. पण हे रूप स्थिर नसते, ते नेहमी बदलत असते. ”डॉ. आंबेडकर राजकीय संकल्पनांचा वा प्रश्नांचा विचार केवळ राजकीय दृष्टीतून करीत नव्हते. त्यांना केवळ राजकीय परिवर्तन अभिप्रेत नव्हते, तर एकूण समाजव्यवस्थेच्या आमुलाग्र परिवर्तनाच्या संदर्भात ते प्रत्येक राजकीय संकल्पनेचा व समस्येचा विचार करीत असल्याचे त्यांच्या राजकीय विचारांच्या मांडणीवरून दिसून येते. त्यांच्या राजकीय विचारांचा व उपयोजनांचा विचार करता लोकशाही, त्यातील स्वातंत्र, समता, बंधुता, समग्र समाज परिवर्तन इत्यादी मूल्यांचा, राष्ट्र आणि राष्ट्रवाद, समाजवाद, शासनाचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र, राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून स्त्रियांच्या हक्कासंबंधीचे कार्य, राजकीय सत्ता आणि राजकीय प्रतिकार आणि सर्वांच्या विचारमंथनातून निर्माण झालेली ‘भारतीय राज्यघटना’ या सर्व मुलांच्या तपशीलावरून डॉ. आंबेडकरांचे राजकीय विचार दृष्टीक्षेपास पडतात.

डॉ. आंबेडकरांच्या राजकीय चिंतनातील लोकशाही विचार हा केवळ आदर्शाच्या स्वप्नरंजनातून उपजलेला नव्हता तर भोवतालच्या सामाजिक राजकीय वास्तवाच्या मुशीतून तो तावून सुलाखून निघाला होता. भारतात लोकशाहीची उभारणी करणे एवढ्यापुरतेच त्यांचे राजकीय ध्येय परिमित नव्हते तर जगात जिथे जिथे लोकशाही असेल त्या त्या सर्वच राष्ट्राशी सहकार्य करून भारताने लोकशाही मूल्याचे संरक्षण करावे अशीही त्यांची इच्छा होती. त्यांच्या लोकशाही विचारात स्वातंत्र, समता, बंधुता आणि समग्र समाजपरिवर्तन इत्यादी मूल्यांना अग्रस्थान होते. त्यांनी आपल्या लोकशाही विचारामध्ये केवळ राजकीय लोकशाहीचा पुरस्कार केलेला नसून सामाजिक व आर्थिक लोकशाहीचा पुरस्कार केला. “दारिद्र्य, निरक्षरता व जातीय पृथगात्मता हे त्यांच्या मते भारतीय लोकशाहीच्या वाटचालीतील अडथळे होते. जोपर्यंत प्रयत्नपूर्वक या तिघांचे निर्मूलन होत नाही तोपर्यंत या देशात लोकशाही अस्तित्वात येऊच शकत नाही. असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी विभिन्न सामाजिक गटाचा समान संधीच्या आधारावर सहभागाचा पुरस्कार करून घेतला, डॉ. आबेडकरांनी लोकशाहीचा विचार करताना संसदीय पद्धती हीच व्यक्तीच्या अंगी आत्मनिर्भरता, उपक्रमशीलता व जबाबदारीची जाणीव निर्माण करू शकते. उच्चतर प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य पडवून शाल, सचोटी उद्यम व धारिष्ट्य इत्यादींचा परिपोष या पद्धतीतच होऊ शकतो. आपल्याला या समाजरचनेत महत्वाचे स्थान आहे. अशी जाणीव हीच पद्धती प्रादुर्भूत करीत असल्यामुळे व्यक्तींच्या मुक्तीचा मार्ग तीमधूनच खुला होऊ शकतो. संसदीय लोकशाहीच मानवी जीवनाच्या प्रवाही स्वरूपाशी सुसंगत ठरते, कारण रक्तपात न पडविता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त तिलाचा अवगत असतो.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय समाजव्यवस्थेच्या विषमतेचा भीषण अनुभव आलेला होता. त्यातूनच त्यांच्या राष्ट्रवादाला भारतातील शूद्रातिशूद्र जनतेच्या शोषणमुक्तीचा संदर्भ असल्याचे जाणवते. बहुसंख्य शोषित जनता शोषणमुक्तीशिवाय राष्ट्रजीवनाच्या प्रवाहात समरस होणार नाही. हे सत्य ते ओळखून होते. राष्ट्रवादातील धर्मसत्ता त्यांना अमान्य होती. त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना धर्मातीत, धर्मविहीन, इहवादी (Secular) स्वरूपाची होती. डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रवादाला बुद्धिग्रामाण्याचे तत्वगंभीर अधिष्ठान लाभले होते. “प्राचीन संस्कृती, इतिहास, परंपरा, धर्म, वंश इत्यादीच्या अतिरेकी भाबड्या गौरवातून असहिष्णुतेचा अविवेकाचा जन्म होतो. या एकारलेल्या, असहिष्णू राष्ट्रभावनेतून राष्ट्राचे अकल्याण होते असे त्याचे मत होते. त्यांनी जुन्या प्राचीन संचिताची आणि नव्या आधुनिक जीवनमूल्यांची बुद्धिवादी निकषांवर कठोर चिकित्सा केली. म्हणूनच सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी राष्ट्रमीमांसा त्यांना मान्य होती. त्यांचे राष्ट्रवादासंबंधीचे विचार ‘थॉटस् ऑन पाकिस्तान ‘, ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ , ‘रानडे, गांधी अॅण्ड जिना’ इत्यादी प्रश्नांमधून आणि प्रसोंगपात केलेल्या भाषणांमधून व्यक्त झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारातून लोकशाही, राष्ट्रवादी विचाराबरोबरच त्यांचे समाजवादी विचार स्पष्ट झाले आहेत. आधुनिक औद्योगिक व यंत्रप्रधान सभ्यतेला समाजवादाची विशेषच आवश्यकता आहे, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते, त्यांच्या समाजवादाचा उगम दारिदनाविषयी त्याना असलेल्या पोटतिडिकीत आढळतो. त्यांनी दारिद्र्य फार जवळून पाहिले होते. प्रत्यक्ष भोगले होते. म्हणून त्यांना दारिदशाची विलक्षण चीड व घृणा होती. समाजवाद ही समाजाला समपातळीवर आणण्याची प्रक्रिया आहे. संधी, सार्वजनिक सोयी, सुखसोयी, सार्वजनिक जागी प्रवेश इत्यादींबाबत जराही भेदभाव करणे त्यांच्या समाजवादात बसत नाही.

डॉ. आंबेडकरांच्या मते समाजवादाचा संदर्भ आर्थिकतेपेक्षा सामाजिकतेला अधिक महत्व देणारा आहे. उच्चनीचता, स्पृश्यास्पृश्यता अशा विभिन्न सामाजिक दूषणांचे उच्चाटन केल्याशिवाय क्षणभरही समाजवाद या देशात टिकू शकणार नाही असे त्यांचे मत होते. “ग्रामीण सुधारणा घडवून आणणे व त्याद्वारे कोट्यवधी खेडूतांना राष्ट्रीय प्रवाहात खेचणे, शहरी व ग्रामीण विकासात समतोल साधणे, जातिमुक्त समाज सर्व पातळ्यांवर निर्माण करणे, सहकारी शेतीला उत्तेजन देणे, युद्ध व अण्वस्त्रांपेक्षा जनकल्याणाला अग्रक्रम देणे, धनिकांचा मानवी घडामोडीकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलून त्यांना त्यांचा सामाजिक जबाबदारीची जाणीव करूण देणे इत्यादी उपाययोजनांद्वारे समाजाची निर्वेध करता येईल असे आंबेडकरांना वाटते. म्हणूनच लोकशाही यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चार अटी सांगतात.
१. समाजामध्ये विषमता असता कामा नये.
२. विरोधक
३. कायदा आणि प्रशासनाच्यासमोर सर्वजन समान असले पाहिजे.
४. संविधानिक नैतिकता समाजामध्ये विषमता असू नये तर समानता असावी.

बाबासाहेबांच्या मते विरोधी पक्षाच्या अस्तित्वाशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. कायदा आणि प्रशासनाच्या समोर सर्वजन समान आहेत. एवढेच नाही तर लोकशाही शासन व्यवस्थेत संविधानिक नैतिकता आणि सारासार विवेक नसेल तर राज्यघटनादेखील निरूपयोगी ठरेल असे विचार बाबासाहेब १९४९ मध्ये मांडत होते. तेच विचार आजच्या प्रगत भारतीय समाजामध्ये तंतोतंत लागू पडतात. म्हणजे २००६ मध्ये महाराष्ट्रात खैरलांजी येथे घडलेल्या हत्याकांडानंतर भैय्यालाल भोतमांगेला न्यायाच्या प्रतिक्षेत २० जानेवारी २०१७ ला मृत्यूला कवटाळावे लागले. २०१४ मध्ये खर्डी (अहमदनगर) येथे सवर्ण मुलीच्या प्रेमप्रकरणातून नितीन आगे याची हत्या करण्यात आली आणि या हत्याप्रकरणातील सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली. १९ जानेवारी २०१६ ला हैद्राबाद येथील केंद्रीय विश्व विद्यालयात पीएच.डीचे उच्च शिक्षण घेणान्या रोहित वेमुलाला गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली. २२ जानेवारी २०१८ ला धर्मा पाटील (धुळे) या शेतकन्यावर आपल्या न्याय आणि हक्कासाठी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ आली.

२६ जुलै २०१९ ला बी.वाय.एल. नायर रूग्णालय मुंबई, येथे वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर (स्त्री रोग तज्ज्ञ) शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षीय पायल तडवी या विद्यार्थीनीचा मानसिक छळ केला जाऊन तिच्यावर अत्याचार केले गेले. तिला अपमानित केले गेल्यामुळे तिने केलेली आत्महत्या. १४ सप्टेंबर २०२० ला उत्तरप्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर बलात्कार करून तिला मारूण टाकण्यात आले. केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मुजूर केले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन. अशा कितीतरी घटना प्रसंगाचा उल्लेख यासंदर्भात करता येईल, या सर्व घडामोडी सामाजिक न्याय आणि हक्काच्या असमानतेतून घडल्या आहेत. ज्या समतेचा पुरस्कार बाबासाहेबांनी प्राणपणाने केला. त्यातही न्यायालयीन समानतेचा आग्रह बाबासाहेबांनी धरला. ती न्यायालयीन समानता समाजामध्ये आणि समाजमनामध्ये रूजविण्यात आमची प्रशासन व्यवस्था अपयशी ठरली असे यातून स्पष्ट होते.

विरोधी पक्षाच्या अस्तित्त्वाशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही असे बाबासाहेब म्हणतात तेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत विरोधी पक्षच नाही, हीच स्थिती २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेबांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारताची राज्यघटना सुपूर्त केली. ही राज्यघटना सुपूर्त करताना बाबासाहेबांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात जी चिंता व्यक्त केली ती आजही स्पष्टपणे दिसत आहे. बाबासाहेब म्हणाले होते “२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समानता राहील. परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्परविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळापर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही.

ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत, ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील. भारतात विषमता ही सतत वाढत आहे . ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे. गरीब पुन्हा गरीब होत आहे आणि श्रीमंत पुन्हा श्रीमंत होत आहे . ‘ ऑक्सफैम ‘चा अहवाल सांगतो की २०१७ मध्ये निर्माण झालेल्या नव्या संपत्तीपैकी ७३ टक्के संपत्ती फक्त एक टक्का श्रीमंतांच्या तिजोरीत गेली तर दारिद्रयरेषेखालील आणि गरीब अशा ६७ कोटी लोकांकडे मिळून त्यापैकी एक टक्का संपत्ती आहे. या एका वर्षात एक टक्का लोकांची संपत्ती २०,१ ९ ३ अब्ज रूपयांनी वाढली. एवढ्या रकमेत भारताचा दर वर्षाचा अर्थसंकल्प सादर होतो . या वर्षाने आणखी नवे १७ अब्जाधीश निर्माण केले आणि आता १०१ अब्जाधीशांचा देश ही भारताची ओळख आहे. दुसरीकडे गरीब मात्र अधिकच गरीब होत चालला आहे. ऑक्सफॅमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निशा अग्रवाल म्हणतात “ ही बिलिओनिअर बुम लोकशाहीसाठी घातक आहे.

त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था संकटात असल्याचे हे लक्षण आहे ह्या सर्व घडामोडी लक्षात घेतल्यानंतर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्यय येतो . बाबासाहेब किती माझे , किती तुमचे , किती आजचे , किती उदयाचे आणि किती समकालीन याची प्रचिती येते. हे संभाव्य धोके बाबासाहेबांनी तेव्हा ओळखले होते. म्हणूनच संविधान हा फक्त सांगाडा आहे ते वापरणारे हात किती चांगले आहेत यावर देशाचे भवितव्य अवलंबून असेल असे बाबासाहेब २५ नोव्हेंबर १ ९ ४ ९ च्या भाषणात सांगत आहेत. आपणाला समकालीन व्हायचे असेल तर पुन्हा बाबासाहेबांकडेच बघावे लागते, कारण त्यांनी ज्या मूल्यावर आणि अधिष्ठानावर भारताची कल्पना विकसित केली.

सर्वसमावेशकतेच्या तत्त्वज्ञानावर भारत नावाचा देश उभा केला . हा देश उभा करणे हे १ ९ ४७ नंतर एक आव्हान होते. सध्या राजकारणाच्या क्षेत्रात भक्त वाढत चाललेले असताना पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेत जे शेवटचे भाषण केले होते त्याची आठवण होते . त्यात बाबासाहेब म्हणाले होते, “भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या शुद्धीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.” हे सांगून बाबासाहेब एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपले लक्ष केंद्रीत करताना म्हणतात “एखाद्या पक्षाने मिळवलेले लँडस्लाइड अथवा प्रचंड बहुमत ही हुकूमशाहीच्या धोक्याची घंटा असणार आहे. राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत होत नाही ; स्वातंत्र्य समता, बंधुता ही मूल्ये आपल्या सामाजिक जीवनाचा आधार होत नाहीत तोपर्यंत हुकूमशाहीचा धोका संपणार नाही.” त्यामुळे बाबासाहेब संविधानिक नैतिकतेचा आग्रह धरतात. पण ‘संविधान बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत’ असे केंद्रीय मंत्री खुलेआम स्पष्टपणे बोलत असतात आणि स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असतात. तेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांपासून त्यांच्या विचारापासून आणि एकूणच आंबेडकरवादापासून किती दूर जात आहोत. आपण किती दांभिक , ढोंगी आणि करंटे होत आहोत याचाही आंबेडकरवाद्यांनी विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळेच डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ मध्ये व्यक्त केलेली चिंता आजही खरी वाटू लागली आहे.

संदर्भसूची
१. संजय आवटे : आम्ही लोक भारताचे लोक, माइंड अॅण्ड मीडिया प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती २०१८ , पृ . क्र . १८७-१८८
२. डॉ. भा. ल. भोळे : आधुनिक भारतातील राजकीय विचार, पिंपळापुरे ॲण्ड के. पब्लिशर्स नागपूर, द्वितीयावृत्ती, २००३ पृ. क्र. ८३०
३. डॉ. भा. ल. भोळे : आधुनिक भारतातील राजकीय विचार, पृ . क्र. ८३१
४. डॉ. भा. ल. भोळे : आधुनिक भारतातील राजकीय विचार, पृ . क्र . ८३२
५. डॉ. अनिल नितनवरे : बोधीजीविका स्मरणिका विशेषांक २०१३, पृ . क्र . ३३
६. डॉ. भा. ल. भोळे : आधुनिक भारतातील राजकीय विचार, पृ. क्र. ८३८
७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, १९४६ ते १९५६
८. संजय आवटे : आम्ही भारताचे लोक, पृ. क्र. १९१-१९२
९ . डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषण, खंड १८, भाग ३, १९४६ ते १९५६

– अमित वासुदेव गजभिये, नागपूर
(मो. ९६७३४५६४८४)
Email : amitweajbhive@gmail.com

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका