डॉ. अब्दुल कलामांच्या सन्मानार्थ साजरा होतो जागतिक विद्यार्थी व वाचन प्रेरणादिन

Spread the love

सांगोला/डॉ.नाना हालंगडे
आज १५ ऑक्टोबर ! हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
१५ ऑक्टोबर १९३१ हा दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. या महान शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्रात भारताला स्वयंपूर्ण केले. ते नेहमी विद्यार्थ्यां मध्ये रमले. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ घोषीत केला. त्या दिवसापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो.


आपल्या आयुष्यात कायम एक शिक्षक म्हणून मला ओळखले जावे अशी इच्छा डॉ.कलाम नेहमी बोलून दाखवयाचे. त्यांना १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर १९९० मध्ये इस्त्रो आणि डीआरडीओ मधील कामांबद्दल पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संरक्षण तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि वैज्ञानिक संशोधनातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारत रत्न पुरस्काराने १९९७ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.

वाचन प्रेरणा दिन
१५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते. कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.


पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करीत आहोत.
आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते. वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात.
मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तकांपासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे. ‘वाचणे’ म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ ‘अवांतर वाचन’ असाच घेतला पाहिजे.
हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.
वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा ‘रिकामे मन नी सैतानाचे घर’ अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.
हा संस्कार जितक्या लहान वयापासून केला जाईल तितके आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनत जाते. कारण या वाचनामुळे लहान मुलांमधील आकलन क्षमता वाढते. गोष्टींच्या पुस्तकातील कोणत्याही कथेला सुरवात, मध्य आणि शेवट असतोच. कथेच्या या रचनेमुळे लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळते. ते विचार करायला सुरवात करतात, कारणांशी संबंध जोडतात, तार्किक विचार करीत मनातल्या मनात कथेचा शेवटही योजून ठेवतात. एखादी गोष्ट अवगत करणे ही लहान मुलांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची जडणघडण होते. वाचनाने विचार क्षमता वाढीस लागण्याचे हे मूळ कारण आहे. वाचन आपल्या मेंदूसाठी व्यायामाचे काम करते.
विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात ‘वाचन संस्कार’ व्हावेत, यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रूजविण्याच्या हेतूने या ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ महत्व आणखीनच वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यां मध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.
महत्वाचे म्हणजे वाचनाच्या वेगाची संकल्पना प्रत्येकाला असायली हवी. एका नजरेच्या टप्प्यात पुस्तकाचा जास्तीत जास्त भाग यायला हवा, तसा सरावही हवा.


भारतीय लोकांचा सरासरी वाचनाचा वेग हा जपानी लोकांच्या सरासरी वाचनाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे हे खेदाने का होईना, आम्ही कबूल करतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त आकलनासह वाचन हे खरे वाचन कौशल्य.
नुसता एकच दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करुन थांबण्यापेक्षा, रोजच जर पुढील उपक्रमांद्वारे वाचन प्रेरणा राबविली तर वाचन प्रेरणा दिनाचे रुपांतरण वाचन चळवळीत होईल, यांत शंका नाही.
या साठी केवळ शाळेतच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, घर परिसर, घर या पातळ्यांवर वाचनालय, पुस्तक पेढी, पुस्तक भेट योजना, पुस्तक दान योजना, वाचन प्रेरणा विषयक व्याख्याने यांचे वेळोवेळी वा कायमचे आयोजन/नियोजन आवश्यक आहे.
या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य लक्षात घेवून आम्हाला आज वाचन या क्रियेसंदर्भात आणखी वेगळे काही सांगावयाचे आहे.
‘वाचन’ हा शब्द आला की, आपण फक्त ‘पुस्तकी वाचन’ एवढाच मर्यादित अर्थ घेतो. आमच्या मते वाचनाचा अर्थ इतका सिमित नाही. आपली पंचेद्रिये आणि मन ही खरी वाचनाची माध्यमे आहेत, त्यांचा वापर करता यायला हवा. डोळ्यांना जे जे दिसतं ते ते वाचता यायला हवं. मग वस्तु दिसो वा व्यक्ती किंवा घडणारा प्रसंग असो, डोळ्यांनी वाचायला हवं.

नाकाला जाणवणारा गंध वाचता यायला हवा!
कानांनी आवाज वाचता यावा असा सराव हवा!
त्वचेलाही होणारा प्रत्येक स्पर्श वाचता यायला हवा!
स्पर्शवाचनातून स्पर्शाचा अर्थ कळायला हवा!
निदान वेळेवर सावध तरी होता येते!
जीभेलाही चव वाचता यायला हवी!
पंचेद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायलाच हवी!

आणि सर्वांत महत्वाचे की, आपल्याला आपल्या मनाद्वारे दुसऱ्यांचे (किमान आपल्या घरातल्या व्यक्तींचे अथवा मित्रमैत्रीणींचे तरी) मन वाचता यायला हवे. दुसऱ्यांचे मन वाचता येणे हे उच्च कोटीच्या संवेदन शीलतेचे लक्षण आहे. अशा संवेदनशीलतेनेच मानवता जागृत होते हे ही लक्षात घ्यायलाच हवे. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वच संवेदनांचे परिपूर्ण वाचन प्रत्येकाला करता येणे आवश्यकच आहे.

आता समारोप चारोळीने करुया !
‘वाचाल तर वाचाल !’ हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन;
वाचाव्यात संवेदनाही, या जागृत पंचेद्रियांनी,
पुस्तकाच्या वाचनासवे, करावे मनाचे वाचन !

प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, संवेदनशील, रसिक व कलावंत होण्यासाठी प्रत्येक शाळेने वाचन प्रेरणेचे कार्यक्रम घेऊन येणारी पिढी समृद्ध व्यक्तिमत्त्वाची घडवावी हेच ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करतांना अपेक्षित आहे. पुस्तकी वाचनासोबत आपण एखाद्याच्या ‘मनाचे’ ही वाचन करावे ही सर्वांना नम्र विनंती करुन, आम्ही आपला निरोप घेतो.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका