डॉन अभी जिंदा है!

'छोटा राजन'च्या गुन्हेगारी कृत्याचा लेखाजोखा

Spread the love

अनेक दशकं मायानगरी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केलेल्या “छोटा राजन” पर्वाचा कोरोनामुळं अस्त झाल्याची अफवा शुक्रवारी प्रसारमाध्यमांतून पसरली. मात्र त्यात तथ्य नसल्याचं ए.एन.आय. या वृत्तसंस्थेनं शुक्रवारी रात्री स्पष्ट केलंय. राजेेंद्र निकाळजे अर्थात छोटा राजन याचा टिळक नगरातील सर्वसामान्य तरुण ते आंतरराष्ट्रीय डॉन असा चित्तवेधक प्रवास नेमका कसा झाला हे जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट वाचायलाच हवा.

• राजेंद्र निकाळजे नावाचा सर्वसामान्य तरुण
मुळात ‘छाेटा राजन’ हे दहशतीचं नाव धारण करण्यापूर्वीचा इतिहास खूप रंजक आहे.१९६० साली एका सर्वसामान्य कुटुंबात राजेंद्र निकाळजे याचा जन्म झाला. राजेंद्रचं मन अभ्यासात रमत नव्हतं. जेमतेम पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यानं शिक्षण सोडून दिलं ते कायमचंच. राजेंद्र निकाळजे हा इतर तरुणांसारखाच मुंबईत आपलं जगणं सुखमय करू पाहणारा, दोन वेळच्या अन्नासाठी, रोजगारासाठी धडपडणारा तरुण. परिस्थिती माणसाला प्रवाहात सामावून घेते असं म्हणतात ते खरंय. तो काळ होता १९७९ चा. देशावर लादण्यात अालेल्या आणीबाणीमुळं जनता भयभीत झालेली. विशेषत: तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मोठा होता. याच वर्षात चार पैसे कमावण्याच्या नादानं राजेंद्रनं मुंबईतल्या सहकार सिनेमाबाहेर तिकीटांचा काळाबाजार सुरु केला. हे सुरु असताना पोलिसांचा मार खावा लागला. सळसळतं रक्त असलेल्या राजेंद्रनं पोलिसांना प्रतिकार केला. पोलिसांचीच काठ हाती घेऊन प्रतिहल्ला केला.. मोठा गजहब झाला.. या घटनेपासून गुन्हेगारी विश्वात राजेंद्रची एन्ट्री झाली.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम समवेत उजवीकडे छोटा राजन.

• राजेंद्र निकाळजे ते “छोटा राजन”
राजन नायर या गुंडाची टोळी मुंबईत जोर धरत होती. छोट्या-मोठ्या गुन्हेगारी कारवायांमुळे या टोळीची चांगला दबदबा होता. गुन्हेगारी वृत्तीचे अनेक तरुण या टोळीत सहभागी होत. राजेंद्र निकाळजेही या टोळीत ज्वाईन झाला. आता राजन नायरला “बडा राजन”, तर राजेंद्र निकाळजेला “छोटा राजन” नावाने लोक ओळखू लागले. छोटा राजन हा धाडसी गुन्ह्यांमुळे चर्चेत येवू लागला. एका प्रेमप्रकरणातून याच टोळीतील चंद्रशेखर सफालिका व अब्दुल कुंजू या गुंडांनी १९८३ साली राजन नायरचा (मोठा राजन) खून केला. खरी गंमत इथंच आहे. आपल्या गुरुच्या खूनाचा बदला घेण्यासाठी छोटा राजन इर्ष्येला पेटला. चंद्रशेखर सफालिका व अब्दुल कुंजू या गुंडांचा खात्मा करण्यासाठी त्यानं जंग जंग पछाडलं. छाेटा राजन हा एक ना एक दिवस आपला खात्मा करणारंच याचा त्या दोघांनी धसका घेतला. छोटा राजनने गुप्तपणे यांना ठार मारण्यासाठी १९८४ मध्ये हल्ले केले. मात्र ते दोघे बालंबाल बचावले, गंभीर इजा झाली. कुंजू यानं तर जीव वाचवण्यासाठी पोलिसांना शरण जाणं पसंद केलं.

• दाऊदच्या टोळीत एन्ट्री
याच दरम्यान मुंबईच्या गुन्हे विश्वात दाऊद इब्राहिमची दहशत होती. दाऊदच्या टोळीत कैक तरुण सहभागी होते. राजन नायरच्या खूनानंतर दाऊदच्या कारवायांना महत्त्व आलं होतं. नायरच्या टोळीची सूत्रे छोटा राजनकडे आली होती. दाऊदच्या आग्रहाखातर छोटा राजन हा “दाऊद कंपनी” अर्थात डी कंपनीत दाखल झाला. छोटा राजनने अत्यंत धाडसाने चंद्रशेखर सफालिका व अब्दुल कुंजू या गुंडांचा खात्मा केला. दाऊदच्या टोळीत छोटा राजनचा दबदबा वाढला. दाऊद व छोटा राजन ही दोन्ही नावं आता एकत्र आल्यानं गुन्हे विश्वातील इतर टोळ्यांच्या अंगातलं अवसान गळालं होतं. या दोघांचा बॉलिवूडनेही मोठा धसका घेतला होता. गोळीबार, चकमक, खून खराबा हे शब्द आता परवलीचे झाले होते. या दोघांना पकडण्यासाठी पोलिसही जंगजंग पछाडत होते.

मुंबई बॉम्बस्फोट (१९९३)

• दाऊद व छोटा राजनचे मतभेद
दाऊदच्या गँगची मुळातच मोठी ताकद होती. त्यात छोटा राजन सारखा नामचिन खमका डॉन सहभागी झाल्याने गुन्हेविश्वात याच दोन नावांचा बोलबाला होता. बडे चित्रपट अभिनेते, बिल्डर, उद्योजकांना धमकावून खंडणीचे प्रकार वाढले. दोघांनी मिळून खूप कारनामे केले. मुंबई पोलिसांनीही या टोळीच्या कारवायांना प्राणाची बाजी लावून रोखले. टोळीतील इतर गुंडांचा खात्मा करून वचक निर्माण केला. मात्र हे दोन मोठे डॉन पोलिसांना चकवा देत होते. या दोघांनीही मुंबईतून आपला बो-या, बिस्तरा गुंडाळून परदेशात पलायन केलं. तिथून ते सूत्रं हलवू लागले.

• अरुण गवळी पर्वाचा उदय
याच काळात मुंबई इलाख्यात अरुण गवळीच्या रुपानं एक मोठी ताकद उदयाला आली होती. अरुण गवळीच्या गुंडांनी दाऊदचा मेहुणा इब्राहिम पारकरचा खून केला. या घटनेनं दाऊद चवताळला. त्यानं गवळी गँग नेस्तनाबूत करण्याचा निश्चय केला. मात्र दाऊदच्या या मोहिमेत छोटा राजनची माणसं अलिप्त राहिली. हळूहळू दाऊद व छोटा राजनमध्ये कटुता आली. दोघांनी आपापले मार्ग निवडले.

• ‘देशभक्त डॉन’ची इमेज
हा १९९३ चा काळ. आपल्याला आठवत असेल की, १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी देश हादरला. अनेकांचे हकनाक जीव गेले. हे सर्व दाऊदनेच केल्याचा कयास झाला. हे बॉम्बस्फोट होताना दाऊदने पाकिस्तानच्या इशा-यावरून हे कृत्य केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चा छोटा राजनसाठी फायद्याच्या होत्या. देशाविरुद्ध कट करणा-या दाऊदची या कारणामुळेच साथ सोडल्याची इमेज छोटा राजनकडे सहानुभूती वळवणारी होती. छोटा राजन हा “देशभक्त डॉन” बनू पाहत होता.

• खून खराब्यांचा काळाकुट्ट इतिहास
छोटा राजनचे मनसुबे प्रत्यक्षात उतरत नव्हते. त्याच्या टोळीने अनेक गुन्हे केले. ते गुन्हे देशहितासाठी, समाजहितासाठी अक्षम्य होते. पत्रकार जे. डे. हत्याकांड हे त्यातलेच एक प्रकरण. याप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. छोटा राजनच्या नावावर अनेक गुन्हे वाढत गेले. वयोमानानुसार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे छोटा राजन फारकाळ पोलिसांना चकवा देऊ शकला नाही.

बाली विमानतळावरून छोटा राजनला ताब्यात घेण्यात आलं.

• अखेर पोलिसांनी पकडलेच
अख्खे आयुष्य गुन्हेगारी जगतात व्यतित केल्यानंतर त्याला एका देशातून दुस-या देशात पळ काढून आश्रय घेण्यावाचून पर्याय उरला नव्हता. तो डुप्लिकेट नावाने राहत होत होता. मात्र गुन्हेगारी कारवायांची खुमखूमी थांबत नव्हती. २०१५ साली ऑस्ट्रेलियात असताना छोटा शकीलच्या गुंडांनी छोटा राजनवर प्राणघातक हल्ला केला. यातूनही तो बचावला. तेथून तो पळून जायच्या प्रयत्नात असतानाच बाली विमानतळावर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला भारतात आणण्यात आलं. सीबीआयने त्याच्या विरोधातील अनेक गुन्ह्यांचा तपास केला. काही केसेस कोर्टापुढे गेल्या.

• ७० हून अधिक गुन्हे
२०१५ साली इंडोनेशियातल्या बालीमधून अटक करण्यात आल्यानंतर छोटा राजनला दिल्लीतल्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मुंबईत त्याच्याविरोधातील सर्व गुन्हेगारी प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. एका विशेष न्यायालयात या प्रकरणांवर सुनावणी सुरू होती. डॉन छोटा राजनवर मुंबईत खंडणी आणि हत्येचे जवळपास ७० फौजदारी गुन्हे दाखल आहेत. २०११ साली पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला दोषी ठरविण्यात आलं होतं. २०१८ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

छोटा राजनचा मृत्यू झाला नसून तो जीवंत असल्याचं ट्वीट एएनआय वृत्तसंस्थेनं केलंय.

• डॉन अभी जिंदा है!
कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर २६ एप्रिल रोजी छोटा राजनला दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छोटा राजनचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं वृत्त शुक्रवारी प्रसारमाध्यमातून व्हायरल झालं. मात्र त्यात तथ्य नाही. छोटा राजन अजूनही जिवंत असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा खुलासा राजनवर उपचार करणाऱ्या एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून करण्यात आला आहे. “उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती चुकीची असून राजनवर उपचार सुरू आहेत”, असा खुलासा वृत्तसंस्था ‘एएनआय’कडून शुुुुुुुुक्रवारी रात्री करण्यात आला आहे.

(संदर्भ : विकिपीडिया, बीबीसी, एएनआय व इतर संकेतस्थळे)

Advt

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका