डिकसळच्या सुपुत्राची गरुडझेप, रेल्वे अधिकारीपदी झाली निवड
रेल्वेचे असिस्टंट इन्स्पेक्टर अनिल शिंदे यांची यशोगाथा
अनिल यांनी उच्च ध्येय बाळगत आपला अभ्यास सुरू ठेवला होता. यांनी असिस्टंट इन्स्पेक्टर पदाची परीक्षा 28 ऑक्टोंबर 2021 रोजी दिली होती. याचा हा निकाल 17 नोव्हेंबर 2021 रोजी लागला. त्यामध्ये प्रावीण्य मिळवित अनिल यांनी या पदाला गवसणी घातली.
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डिकसळ गावचे सुपुत्र अनिल अंबादास शिंदे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2001 साली भारतीय रेल्वेच्या कॉन्स्टेबलपदी विराजमान होत, आपल्या सेवेला सुरुवात केली. आज त्यांनी असिस्टंट इन्स्पेक्टर पदाला गवसणी घालत डिकसळ गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
डिकसळमधील शिंदे कुटुंबीय हे शेतकरीच. पण बारावीनंतर अनिल यांनी रेल्वेच्या जाहिराती पाहून,फॉर्म भरला अन् पहिल्याच प्रयत्नात भारतीय रेल्वेच्या पोलिस विभागात दमदार एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता आज असिस्टंट इन्स्पेक्टर या पदाला गवसणी घातली आहे.
शिंदे कुटुंबीय मूळचे डिकसळचेच. निसर्गावर अवलंबून असलेल्या लहरी शेतीवर आपली उपजिविका भागत नसल्याने, थोरले बंधू भाऊसाहेब यांनी आपल्या दोन्ही बंधुला शिक्षण देत, शासकीय नोकरीसाठी संधी मिळवून दिल्या. त्यातील दोन नंबर बंडोपंत हे भारतीय सेनेत दाखल झाले तर अनिलने रेल्वेत झेंडा रोविला.
त्यानंतर यांनी मागे वळून न पाहता,शिंदे कुटुंबीयांचे अन् गवाचेही नाव उज्ज्वल केले आहे. अनिल शिंदे हे प्रारंभी भारतीय रेल्वेत कॉन्स्टेबल या पदावर 2001 साली दाखल झाले. त्यादरम्यान त्यांनी नाशिक येथे सेवेला सुरुवात केली. त्यादरम्यान त्यांनी राज्यासह कर्नाटकातही सेवा केली. 2010 मध्ये अनिल हे हवालदार पदावर कार्यरत झाले. येथेही मुंबई, सोलापूर, गुलबर्गा याठिकाणी चोख सेवा बजावली.
या पदावर काम करीत असताना अनिल यांनी उच्च ध्येय बाळगत आपला अभ्यास सुरू ठेवला होता. यांनी असिस्टंट इन्स्पेक्टर पदाची परीक्षा 28 ऑक्टोंबर 2021 रोजी दिली होती. याचा हा निकाल 17 नोव्हेंबर 2021 रोजी लागला. त्यामध्ये प्रावीण्य मिळवित अनिल यांनी या पदाला गवसणी घातली.
सध्या अनिल शिंदे हे नाशिक येथे आपले प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी हे सर्व यश कठोर मेहनत करीत संपादन केले असून, यापुढेही भारतीय रेल्वेच्या उच्च पदाला गवसणी घालणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अजून सेवेची 18 वर्षे असून,आपल्या या पदाचा वापर, व सेवेतील अनुभव गोरगरीब,होतकरू मुलांसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल शिंदे यांच्या दैद्यीप्यमान यशामुळे शिंदे परिवारात,आणि गावात आनंदाचे वातावरण असून पेढे वाटून हा आनंद द्विगुणित करण्यात आला.