डिकसळचा पूल घातला मातीत
बांधकामचा उपअभियंता ठेकेदारांना घालतो पाठीशी
सांगोला तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. नेते निवडणुकांच्या तयारीत मश्गूल आहेत. अधिकारी मुजोर बनले आहेत. जनता मात्र खड्ड्यात आहे. तालुक्यातील रस्त्यांच्या दुर्दशेचे पोस्टमार्टम करणारी “थिंक टँक लाईव्ह”ची ही विशेष वृत्तमालिका सांगोला तालुका “खड्ड्यात”.
सांगोला/ नाना हालंगडे
दोन वर्षाची अतिवृष्टी अन् दोन वर्षाचा कोरोना हा सार्वजनिक बांधकाम विभागाला पावला. रस्त्यांची तर वाट लागलीच. उलट, रस्त्यात माती टाकून या विभागातील अधिकाऱ्याने रस्तेच मातीत घातले. असाच प्रकार तालुक्यातील डिकसळ गावातील जत रोडला असलेल्या पुलाच्या बाबतीत घडलेला आहे. चक्क रात्रीच हा पूल ठेकेदाराने मातीत घातला.
सांगोला तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग महापराक्रमीच पहावयास मिळत आहे. उपअभियांता तर ठेकेरादांची री.. ओडत चक्क खोटे बोलत आहे. याबाबतचे नाना किस्से या साहेबाच्या तोंडूनच ऐकावयास मिळाले. तालुक्यातील 120 किलोमिटर रस्त्यांची वाट लागलेली आहे. सद्या सर्वच रस्ते की खड्डे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे तालुकाकावसियाना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.
सध्या या विभागाकडून खड्डे बुजविण्याचे जोरदार मोहीम सुरू आहे,ती चक्क लोकांच्या डोळ्यात माती टाकून,अन् खड्ड्यातही माती टाकून. असाच प्रकार घेरडी-जत रोडला असलेल्या डिकसळ फाटीवरील गेजगेवस्ती लगतच्या पुलावर घडलेला आहे. तेथे मुजोर ठेकेदाराने चक्क रात्री कोणी नसताना डाव साधला अन् पुलावर माती टाकून, उपअभियंता साहेबांना रस्त्यावर मुरुम टाकल्याचा मेसेज दिला. याची शहानिशा या अधिकाऱ्याने केली नाही. उलट हा अधिकारीही मुरूम टाकला असे दणकावून सांगून लोकप्रतिनिधींनाही गंडवित आहे.
येथेच पाच फुटाच्या अंतरावर मोठ मोठे खड्डे आहेत. पण त्या मुजोर ठेकेदाराने बुजविले नाहीत. परवा माती टाकल्यानंतर सहा गाड्या यामध्ये अडकून राहिल्या. अनेक मोटारसायकलीही घसरल्या. याबाबत उपअभियंत्याकडे विचारणा केली असता, त्याठेकेदाराने खालची माती काढून मुरूम टाकला आहे, असे सांगितले. पण तसा कोणताच प्रकार घडलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून,असे हे मातीतून पैसे खाणारे अधिकारीही ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे तालुक्यात पहावयास मिळत आहे.
मस्तवाल ठेकेदार
डिकसळचा पूल मातीत घालणारा ठेकेदार मस्तवाल असल्याचे पहावयास मिळत आहे. त्याच पुलावरील माती जेसीबी यंत्राने काढून तेथेच टाकली. अन् अधिकाऱ्याला मुरूम टाकला आहे असा मेसेज दिला. पण त्याने एक पाटीही मुरूम त्या रस्त्यावर टाकला नाही. उपअभियंता ही मुरूमच टाकला आहे, असेच सांगत आहे. याने असेच प्रकार अनेक रस्त्यावर केले असून, रात्रीत माती टाकून हा ठेकेदार आपले उखळ पांढरे करून घेत आहे.