डाव्या-उजव्याच्या पल्याड

प्रा. अविजीत पाठक (जवाहरलाल नेहरु विद्यापीठ) : अनुवादः श्रीरंजन आवटे

Spread the love

 

 

जेएनयुच्या कॅम्पसवर फिरताना मी स्वतःलाच प्रश्न विचारलाः जवाहरलाल नेहरु आणि स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यांची भेट घेत डॉ. बी. आर. आंबेडकर सेंट्रल लायब्ररीमध्ये प्रवेश करण्याचा नेमका अर्थ काय ? डावं-उजवं यात अडकलेल्या आणि आत्यंतिक ध्रुवीकरण झालेल्या जगात आपण वावरत असल्यानं या प्रश्नाला महत्त्व आलं आहे. ‘हिंदू’ विवेकानंद, ‘वंचितांचे’ आंबेडकर, ‘धर्मनिरपेक्ष’ नेहरुंसोबत एकत्र कसे असू शकतात, हा प्रश्न कोणालाही पडेल असं वातावरण आहे. किंबहुना सध्याच्या विचारविश्वाच्या मुख्य प्रवाहातील वर्चस्व गाजवणारा आवाज लक्षात घेता कुणाला असंही वाटेल की डाव्या-आंबेडकरवादी विद्यापीठाचं स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची स्थापना करुन ‘शुद्धीकरण’ केलं जात आहे आणि ‘राष्ट्रवादी’ विचारांच्या दिशेने विद्यापीठाला नेण्याचा प्रयत्न आहे. मला मात्र कॅम्पसविषयी बौद्धिक आणि भावनिक आस्था असणारा भटका माणूस म्हणून, शिक्षक म्हणून ‘डाव्या’- ‘उजव्या’ चष्म्यातून सगळ्यांकडं पाहण्याची चौकट ओलांडणं गरजेचं वाटतं.

सर्वात प्रथम जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची काही व्यवच्छेदक वैशिष्ट्ये लक्षात घेतली पाहिजेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे प्रतिभावंत विद्यार्थी-प्राध्यापकांची या विद्यापीठात मांदियाळी आहे. मानव्यविद्या आणि सामाजिकशास्त्रे यातील प्रमुख विमर्शांची जाण असलेले चिकित्सक विद्यार्थी विद्यापीठाने घडवले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पेरण्यात आणि ज्ञानक्षेत्रात भरीव योगदान देतील असे विद्यार्थी निर्माण करण्यात विद्यापीठ यशस्वी झाले आहे. त्यामुळे आंतोनियो ग्राम्शी आणि लुइस अल्थुजर, रणजित गुहा आणि इरिक हॉब्सवम, ज्युडिथ बटलर आणि मिशेल फुको अशा मूलगामी मांडणी करणा-या विचारवंतांच्या मांडणीने त्यांचं विचारविश्व व्यापून गेलं नसेल तरच नवल !

दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे ज्ञानमंथन राजकीय घुसळणीच्या प्रक्रियेहून वेगळं नाही, हीदेखील विद्यापीठाबाबतची विशेष बाब. इथले विद्यार्थी आणि प्राध्यापक ‘जैसे थे’ परिस्थितीविषयी नेहमीच साशंक असतात. हे विद्यापीठ संघर्षांचे आणि चिकित्सक मांडणीचे केंद्र बनले आहे. मग ते आणीबाणी विरोधातील आंदोलन असो की, अगदी आताची नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शनं. या अर्थाने विद्यापीठ ‘राजकीय’ स्वरूपाचं आहे.

तिसरं वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे पारंपरिक/ पुराणमतवादी समाजापेक्षा जेएनयुचा सांस्कृतिक नकाशाच वेगळा आहे. विद्यापीठात नवे प्रयोग होतात. प्रचंड मोकळेपणा इथं आहे आणि नव्या शक्यतांची दारं नेहमीच खुली आहेत. निदर्शनाच्या गाण्यांपासून नाटकापर्यंत, अनंतकाळ चालणा-या गप्पांच्या अड्ड्यांपासून ते फुले आणि आंबेडकर, मार्क्स आणि चे यांचे विचार पोहोचवणा-या रंगीबिरंगी पोस्टर्सपर्यंत इथे धमाल असते. विद्यापीठात मार्क्सवाद, आंबेडकरवाद, स्त्रीवाद, उत्तर-आधुनिकता या सा-यांचे आवाजच चहू दिशांनी येत असतात.
अशा आवाजांनी आम्हाला समृद्ध केलं आहे. चिकित्सक अध्यापनशास्त्र शिकण्यासाठी कुणी ‘डावं’ असण्याची गरज नाही. समाज-राजकीय वादांमधून आणि उच्च दर्जाच्या बौद्धिक कृतींमधूनही तुम्हाला समृद्ध होता येतं. बहुतांश विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ आयुष्यात कायापालट घडवणारं असतं. अगदी युपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठीही फक्त पदवी किंवा प्रमाणपत्र मिळवण्याकरताचं हे विद्यापीठ कधीचं नव्हतं आणि नाही.

शैक्षणिक प्रावीण्य आणि निदर्शनांची संस्कृती असूनही इथं काही समस्या आहेत, हे मान्यच केलं पाहिजे. विद्यापीठ एखाद्या बेटासारखं होत चाललं आहे. हे टप्प्याटप्याने बौद्धिक शिष्टपणातून घडलं आणि त्यामुळे स्थानिक बुद्धिवंतापासून आणि विविध ज्ञानपरंपरांपासून विद्यापीठाची नाळही तुटली. काही वेळा तर इथला मूलगामीवाद काहीसा असहिष्णू होतो. जगाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असणा-या जणू प्रत्येकाकडे संशयाने पाहिलं जातं.

उदाहरणार्थ, गांधी, टागोर आणि योगी अरविंद यांना पुरेसं महत्त्व इथे दिलं गेलं नाही किंवा भगवदगीता किंवा उपनिषदाच्या संदर्भाना ‘ब्राम्हणी’ म्हणून हिणवलं गेलं, हे मान्य करण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही. वेगळ्या शब्दांत बोलायचं तर दुस-यांचं मत ऐकून घेणं आम्ही विसरत चाललो होतो. माझी भीती अशी आहे की या संवादाच्या अभावातूनच अनेकांनी विद्यापीठावर ‘अभिजनवादी’ किंवा अगदी ‘राष्ट्रद्रोही’ असा शिक्का मारला.

विद्यापीठाने प्रामाणिक आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. डाव्या-उजव्या चौकटीच्या पल्याड जाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ज्ञानमीमांसीय बहुलता विकसित करण्याची गरज आहे. इतरांचं ऐकून घेणं या अध्यापनशास्त्राच्या मूलभूत घटकाला उत्तेजन द्यायला हवं. आणि हे सारं ‘ब्लेम गेम’ करण्याची जी घृणास्पद प्रथा आहे त्याहून मुळातच वेगळं आहे. ( तुम्ही ‘डाव्यांनी’ आजवर वर्चस्व राखलंत, आता आमची संधी आहे, तुम्ही मार्क्स आंबेडकरांवर बोललात आम्ही सावरकर आणि गोळवलकरांची प्राणप्रतिष्ठा करतो. तुम्ही लिंगभाव अभ्यास आणि शेतक-यांचे लढे शिकवले आता आम्ही संस्कृत, योगा आणि आयुर्वेद सुरु करतो.) हे दुष्टचक्र आहे. या दुष्टचक्रतून बाहेर पडण्याचं धाडस आपण दाखवलं तरच आपण वाचू शकतो. मोकळ्या मनानं, निर्भीडपणे, संवादी राहात शिकत राहाणं आणि ज्या गोष्टी आपल्या खोलवर आत पुराणमतवादी सामाजिक व्यवस्थेतून अंगवळणी पडल्या आहेत, त्या सोडून देणं आज सर्वाधिक गरजेचं आहे.

त्यामुळे या सा-या संदर्भात या लेखाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे मी येतो. मी नेहरुंच्या पुतळ्याकडं पाहतो आणि ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ मला आठवतं. ‘आधुनिक’ असलेल्या नेहरुंनी भारताच्या प्राचीन सभ्यतेच्या परंपरांचा शोध घेतला आणि त्याच वेळी पुराणमतवादी अवजड ओझं फेकून देण्यासाठी लढा देत नवा देश घडवण्याची आकांक्षा मनाशी बाळगली. हा शोध घट्ट मुळांशी जोडलेला होता आणि त्याच वेळी विश्वव्यापी होता. मी विवेकानंदाकडं पाहतो तेव्हा शिकागोमधील धार्मिक सभेत त्यांनी दिलेलं प्रभावी भाषण मला आठवतं – आपल्या सर्वांमध्ये भेद असले तरी आपण एक आहोत, असा उपनिषदांमधला संदेश त्यांनी दिला होता. लोकांची सेवा करण्याची मूलगामी धार्मिक व्यावहारिक वेदांतातील कळकळीचं आवाहन मला दिसतं. आणि हो,विवेकानंद हे कट्टर हिंदू राष्ट्रवादाचे पाईक होते असं कुणी सांगतं तेव्हा मी फक्त हसतो !

अखेरीस आंबेडकरांना आठवताना मी त्यांनी सांगितलेल्या जातिअंताच्या प्रकल्पाला संमती देतो. आणि मला वाटतं की विद्यापीठ ही वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन घडवण्यासाठीची किंवा अगदी तात्त्विक संभ्रमात जगण्यासाठीची आदर्श जागा आहे. आणि त्यामुळेच माझ्या कल्पनेतला विद्यार्थी कोणत्याही प्रकारची लाज, संकोच, भीती, शिष्टता न बाळगता लोकायत आणि वेदांत एकाच वेळी शिकू शकतो, काफ्का आणि कालिदास तो अभ्यासू शकतो, गांधी आणि फुको यांना समजावून घेऊ शकतो.

यासाठी स्वातंत्र्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना स्वतःला उलगडून पाहता येऊ शकेल असं वातावरण हवं. असं सुंदर आदर्श वातावरण बनवण्याच्या दिशेने प्रवास करण्याच्या ऐवजी आपण सूडाच्या भावनेने विद्यापीठाचा आत्माच संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सध्या अनुभवतो आहोत.

– अविजीत पाठक
(जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापक)
अनुवादः श्रीरंजन आवटे

(मूळ लेख ‘द युनिव्हर्सिटी बियॉन्ड लेफ्ट ॲन्ड राइट’ या शीर्षकासह द इंडियन एक्सप्रेसमध्ये दि. ६ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका