‘ट्रॉली टाईम्स’ : पर्यायी माध्यमाचा नवा आविष्कार

संपादक कुणाल रामटेके यांचा विशेष लेख

Spread the love

देशातील ‘मेनस्ट्रीम’ माध्यमांनी आपला खाक्या हा सत्ता आणि सत्ताधारी वर्गाला पोषक असाच ठेवलेला ठळकपणे दिसून येतो. अगदी अलीकडचेच ठळक उदाहरण घ्यायचे झाले तर देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या विरोधात अत्यंत नकारात्मकरित्या बातमीदारी आणि कथित सिद्धांतन करून या देशातील मीडियाने आपल्या विकावूपणावर स्वतःच शिक्कामोर्तब केले आहे. त्यातूनच पर्यायी माध्यमांची आवश्यकता लक्षात घेत शेतकरी आंदोलनाचे खरे स्वरूप आणि वास्तव समाजासमोर मांडण्यासाठी आंदोलन स्थानी सातत्याने उपस्थित असलेल्या सात तरुणांनी एका प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. त्याचे नाव म्हणजे ‘ट्रॉली टाइम्स’.

कोणत्याही लोकशाही प्रधान देशामध्ये जनहितासाठी होऊ घातलेली विधायक आंदोलने ही त्या देशाची ‘लोकशाही व्यवस्था’ जिवंत असल्याची प्रतीके असतात. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनांना जनमानसापर्यंत पोहचवण्याचे काम ‘चळवळींचे पंख’ असलेली माध्यमे करीत असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी मान्यता आपल्याकडे लाभली. मात्र, भारतासारख्या जात-वर्ण-वर्ग-धर्म-लिंग भेदांवर आधारित समाजरचना असलेल्या देशात ‘माध्यमे’ अपवाद वगळता अगदी प्राथमिक अवस्थेपासूनच आपली जनकेंद्रितता गमावून बसली आहेत. अर्थातच यामागे भारतीय सामाजाची जातवर्गीयपुरुषसत्ताक आणि शोषणाधिष्ठित व्यवस्था कारणीभूत आहे.

आजही या देशातील ‘मेनस्ट्रीम’ माध्यमांनी आपला खाक्या हा सत्ता आणि सत्ताधारी वर्गाला पोषक असाच ठेवलेला ठळकपणे दिसून येतो. अगदी अलीकडचेच ठळक उदाहरण घ्यायचे झाले तर देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या विरोधात अत्यंत नकारात्मकरित्या बातमीदारी आणि कथित सिद्धांतन करून या देशातील मीडियाने आपल्या विकावूपणावर स्वतःच शिक्कामोर्तब केले आहे. त्यातूनच पर्यायी माध्यमांची आवश्यकता लक्षात घेत शेतकरी आंदोलनाचे खरे स्वरूप आणि वास्तव समाजासमोर मांडण्यासाठी आंदोलन स्थानी सातत्याने उपस्थित असलेल्या सात तरुणांनी एका प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. त्याचे नाव म्हणजे ‘ट्रॉली टाइम्स’.

जगात आणि भारतातही अनेक वृत्तपत्रे ‘टाइम्स’ नावाने प्रचलित आहेत. मात्र आपल्यासारख्या कृषिप्रधान देशातही अशा माध्यमांसाठी ‘शेती’ हा विषय तसा उपराच. त्यातल्या त्यात ‘गोदी मीडिया’ने शेतकरी आंदोलनाबाबद घेतलेली नाकारात्मक भूमिका लक्षात घेता या आंदोलनाचे प्रतीक बनलेली ‘ट्रॉली’ आणि शेती हा विषय “जसा आहे तसा” लोकांपर्यंत जाणे महत्वाचे होते. त्यासाठी व्यावसायिक पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या शुरुमीत मावी या लेखक आणि चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहीणाऱ्या तरुणाने आपल्या अन्य सहा मित्र-मैत्रिणींना विश्वासात घेऊन १८ डिसेंबर २०२० पासून ‘ट्रॉली टाइम्स’ची सुरुवात केली.

मुळात, सुरुवातीच्या या शेतकरी आंदोलन काळात सोशल मीडियाच्या वापरातून संदेश आणि बातम्या पोहचवण्याचा प्रयत्न ही मंडळी करत होती. मात्र, बरेचशे शेतकरी ग्रामीण भागातील आणि आणि तंत्रज्ञानाचा गंध नसलेले असल्यामाणे त्यांना त्यांच्या भाषेत, त्यांना हाताळण्याजोगे एखादे माध्यम सुरु करावे असा विचार या तरुणानांच्या मनात आला. त्याबाबदाची एक छोटेखानी बैठकही या मंडळींनी आंदोलनातील एका ट्रॉली मध्ये बसून घेतली. आणि त्यातूनच जन्माला आली ‘ट्रॉली टाइम्स’ कल्पना. सुरुवातीला ‘ट्रॉली टाइम्स’च्या सात जणांच्या टीमला थोडं टेन्शन आलं सुद्धा. या कठीण काळात कामी आलं ते त्यांचं शिक्षण आणि टीम वर्क. अवघ्या पाच दिवसात ट्रॉली टाइम्स ची आखणी झाली आणि मित्रांच्या ११ हजार रुपयांच्या ‘कॉन्ट्री’मधून दोन हजार प्रतींचा चार पानांचा अंक हाती आला. त्यातही ‘वितरणा’सारखे काही प्रश्न टीमच्या समोर असतांनाच कोणताही गाजावाजा न करता अवघ्या दोन तासात अंक हातोहात अंदोलन स्थळीच संपले.

पुढे देशभरात ‘ट्रॉली टाइम्स’च्या जन्माची ही कहाणी खूपच गाजली. मात्र, या वृत्तपत्रातून पैसा कमावणे हा उद्देश नसल्याचे संपादकांनी आधीच स्पष्ट केले. पुढच्या अंकांसाठीही मदतीचा ओघ आता सुरु होत असल्याने या तरुण मित्रांची आर्थिक चिंताही काही प्रमाणात का होईना पण मिटली.

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेले ‘ट्रॉली टाइम्स’ हे आज ‘आंदोलन की अपनी आवाज’ या आपल्या टॅगलाईन सह पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून प्रसारित केले जात आहे. ‘जुड़ेंगे, लड़ेंगे, जीतेंगे!’ या लीड ने सुरु झालेली बातमीदारी भगतसिंहांच्या क्रांतिकारी पत्रकारितेचा वारसा सांगत मेनस्ट्रीम मीडिया समोर उभी ठाकत आहे.


‘ट्रॉली टाइम्स’ बाबत भूमिका मांडतांना शुरुमीत मावी म्हणतो “मैं पेशे से एक फ़िल्म राइटर हूं, मेरी पढ़ाई पत्रकारिता की है लेकिन हमारा पुश्तैनी काम ही ‘खेती’ है. ये सिर्फ तीन काले कानूनों की ही नहीं बल्की उससे बड़ी लड़ाई है. भारत का लोकतंत्र खत्म हो चुका है, उसकी बहाली की लड़ाई है. लोकतंत्र का चौथा स्तंभ पत्रकारिता है. मेरे मन में आया कि इस क्रांति में अगर मुझे अपना योगदान देना है, इस लड़ाई को लड़ने का मेरा तरीका ‘चौथा स्तंभ’ है.” निश्चितच या आणि अशा पर्यायांची आवश्यकता लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था वाचवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

– कुणाल रामटेके (संपादक-थिंक टँक लाईव्ह)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका