टी. एन. शेषन : आचारसंहिता आणि मतदान ओळखपत्राचे जनक

स्मृतिदिनानिमित्त विशेष लेख

Spread the love

आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहेत, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी.एन. शेषन यांच्याकडे जाते. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. कधीही, कुठेही, कसाही प्रचार करणे, ध्वनिक्षेपणाचा अमर्यादित वापर अशांमुळे होणारा त्रास, याचा कुठेही विचार केला जात नव्हता, त्यालासुद्धा टी.एन. शेषन यांनीच चाप बसविला.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
भारतीय लोकशाहीला प्रगल्भ करण्यात ज्यांनी महत्वाचे योगदान दिले, ज्यांनी या महाकाय देशात आदर्श निवडणूक आचासंहिता, मतदार ओळखपत्र मोहीम यशस्वी केली त्यांचे नाव आहे टी. एन. शेषन. आज त्यांचा स्मृतिदिन आहे.

केरळमध्ये जन्म
भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचा जन्म केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेलईमध्ये १५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन होते. तामिळनाडूच्या १९५५च्या तुकडीतील ते IAS अधिकारी होते.

अमेरिकेत शिक्षण
अमेरिकेतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी सार्वजनिक प्रशासनाची (Public Administration) पदवी मिळवली होती.

निवडणूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा
भारताच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचं श्रेय टी एन. शेषन यांना दिलं जातं. शेषन यांनी आदर्श निवडणूक आचार संहिता कठोरपणे राबवून निवडणूक सुधारणांसह भारतीय निवडणूक आयोगाला नवीन चेहरा देण्याचे काम केले.

राष्ट्रपतीपदाची लढविली निवडणूक
शेषन हे वर्ष १९९० ते १९९६ पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी १९८९ मध्ये भारताच्या १८व्या कॅबिनेट सचिवपदाचा पदभार सांभाळला होता. १९९६ मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या विशेष योगदानामुळे त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. मतदार ओळखपत्राची सुरुवातही त्यांनी केली होती. त्यांनी १९९७ मध्ये के.आर. नारायण यांच्याविरुद्ध राष्ट्रपतीपदाची आणि त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसच्या तिकिटावर लालकृष्ण अडवाणी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती; परंतु, त्यांना यश आले नव्हते.

निर्भीड अधिकारी
शेषन यांनी निवडणूक सुधारणांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीय लोकशाही बळकट झाली. ते उत्कृष्ट अधिकारी होते. त्यांनी मेहनतीने आणि सचोटीने देशसेवा केली. तामिळनाडूत जन्मलेल्या या अधिकाऱ्याने भारतातील निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. अर्थात शेषन यांना ते करताना प्रचंड विरोधही झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील आमूलाग्र बदलांना विरोध केला, पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून दाखवल्या.

निकोप निवडणुकाचे श्रेय
आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहेत, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी.एन. शेषन यांच्याकडे जाते. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. कधीही, कुठेही, कसाही प्रचार करणे, ध्वनिक्षेपणाचा अमर्यादित वापर अशांमुळे होणारा त्रास, याचा कुठेही विचार केला जात नव्हता, त्यालासुद्धा टी.एन. शेषन यांनीच चाप बसविला.

आचारसंहिता ही त्यांचीच कल्पना
रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत प्रचार करण्यास प्रतिबंध, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या जाहीर सभा, त्यामुळे वाहतुकीस होणारी अडचण, नागरिकांचा खोळंबा यावर कडक बंदी आणली गेली. रस्त्यावर कुठेही सभा न घेता सभांसाठी निवडणूक आयोग ठरवेल त्याच जागी सभा घेणे, प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा होणारा गैरवापर पूर्णत: बंद करणे, धर्माच्या नावावर, देवांच्या नावावर, राष्ट्रीय पुरुषांच्या नावावर मते मागण्यास त्यांनीच बंदी आणली. ध्वनिक्षेपक वापर रात्री १० नंतर बंद म्हणजे बंद. मग तो कुणीही असो. परवानगी नाही, असे अनेक बदल टी.एन. शेषन यांनी केले.

आयुक्त टी. एन. शेषन यांचं १० नोव्हेंबर २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ८६व्या वर्षी चेन्नईतल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संदर्भ : इंटरनेट

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका