ज. वि. पवार : विद्रोही कवी, पँथर आणि समंजस लोकनेता

डॉ. बाळासाहेब मागाडे यांचा विशेष लेख

Spread the love
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्‍चात त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या चार पिढ्यांसोबत एकनिष्ठ राहणारे ज. वि. सर हे चळवळीचे चालते-बोलते विद्यापीठच म्हणावे लागेल. ज. वि. सरांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.

खरं तर ज. वि. पवार सरांची आणि माझी ओळख अगदी अलीकडली. मागील सात-आठ वर्षांपूर्वीची. परंतु मागील पंधराऐक वर्षांपासून मी ज. वि. सरांच्या अनेक कविता, ग्रंथ वाचत आल्याने मी जणू त्यांचा चाहता बनलो. ‘दलित पँथर’चे संस्थापक म्हणून आमच्यासारख्या तरुणांच्या मनात त्यांच्याबद्दल कायम आदराचे स्थान आहेच. त्याहीपेक्षा मला भावलेला त्यांच्यातील एक चांगला गुण म्हणजे ते उत्तम जनसंपर्क असलेले समंजस लोकनेते आहेत.

अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी राजकारणाचे एकमेव आणि अंतिम आशास्थान आहे हे विदीत आहेच. वंचित बहुजन आघाडीच्या झंझावातून हे स्पष्ट होतच आहे. हा झंजावात निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यासह देशभरातील लाखो आंबेडकरी अनुयायांचे हात कार्यरत आहेत. या झंजावातातील एक अग्रणी नेते व मार्गदर्शक म्हणून ज. वि. सरांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. वंचित बहुजन आघाडी हे अलीकडील काळातील एक राजकीय संघटन असले तरी तहहयात अ‍ॅड. बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अगदी निष्ठेने आंबेडकरी घराण्याशी एकरूप झालेले अनुयायी म्हणूनही ज. वि. सरांबद्दल आमच्यासारख्या तरूणांना आदर आहे. राजकारण हा पैसा कमावण्याचा धंदा बनल्याचे चित्र आपण पाहतो. अशा स्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्‍चात त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या चार पिढ्यांसोबत एकनिष्ठ राहणारे ज. वि. सर हे चळवळीचे चालते-बोलते विद्यापीठच म्हणावे लागेल. ज. वि. पवार सरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नसली तरी बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे सुपूत्र भैय्यासाहेब व स्नुषा मीराताई, बाबासाहेबांचे नातू प्रकाश, भीमराव, आनंदराज, जावई आनंदराव तेलतुंबडे व पणतू सुजात या चार पिढ्यांबरोबर ज. वि. सरांनी आपले आयुष्य वाहून घेतले आहे. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत ज. वि. सरांनी त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिली. सत्ता आणि पैशाला लाचार झालेले कथीत नेते आंबेडकर घराण्यापासून दूर गेलेच, शिवाय त्यांनी बदनामीही सुरू केली होती. अशा स्थितीत भैय्यासाहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून ज. वि. सरांनी आपली निष्ठा पणाला लावली. भैय्यासाहेबांनंतरही बाळासाहेबांसोबत ते आपला प्रत्येक श्‍वास न श्‍वास खर्ची घालत राहिले. त्यांच्या निष्ठेचाच जर आदर्श घेतला तर समाजाचे हे चित्र एक दिवस नक्की बदलेल असे वाटते.

ज. वि. सरांचा सोलापूरशी ऋणानुबंध
ज. वि. पवार हे राज्यभरात सुपरिचीत असले तरी सोलापूर जिल्ह्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. ज. वि. सरांनी आयुष्यातील दहाऐक वर्षे बँक अधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात व्यतीत केली आहेत. सोलापूर शहर, बार्शी व परिसरात त्यांनी शाखा व्यवस्थापक म्हणून आपली सेवा बजावली आहे. या नोकरीच्या काळात त्यांचा फार मोठा मित्र परिवार सोलापूरात निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर शहर परिसरात अकरावेळा विविध सभा, परिषदा, कार्यक्रमांच्या निमित्ताने येऊन गेल्याने सोलापूरची भूमी पुलकित झाली आहे. या भूमितील चळवळीचा अंगार, कार्यकर्त्यांचा त्याग सबंध देशाने पाहिला आहे. अशा या भूमीची भूरळ ज. वि. सरांना पडणे साहजिकच होते. ज. वि. सरांनी नोकरीच्या काळात सोलापूरात साहित्य व सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान आजही जुनेजाणते लोक सांगत असतात.

व्यापक जनसंपर्क असलेला लोकनेता
साधारणतः ऑगस्ट 2018 हा महिना संपत आला असावा. “एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सोलापूरला येत असून तू त्या दिवशी भेटायला ये’’ असा निरोप मला ज. वि. सरांनी दिला. तो कार्यक्रम होता ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचा. हा सत्कार सोहळा ज. वि. सरांच्या हस्ते सोलापूरात होणार होता. या कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदरच डॉ. साळुंखे सर व ज. वि. सर सोलापूरात पोहोचले. दरम्यान, त्याचदिवशी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह देश दुःख सागरात बुडाला होता. अशावेळी अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम घेणे उचित नव्हते. डॉ. साळुंखे सरांनी ज. वि. सरांशी विचारपूस करून कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनी थोडे नाराज होत सहमत दर्शविली. कार्यक्रम दोन दिवसांनी ठरला. या दोन दिवसांच्या कालावधीत ज. वि. सर व डॉ. साळुंखे सर सोलापूरात होते. या कालावधीत ज. वि. सरांनी सोलापूरातील मिलिंदनगर, थोरला राजवाडा भागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मिलिंदनगरात भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा जणू एक मेळावाच घेतला. काही दिवसांत वंचित बहुजन आघाडीची सोलापूरात सभा होणार असल्याने त्याबाबत तसेच पक्ष संघटनाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या दोन दिवसांच्या कालावधीत त्यांना भेटावयास येणार्‍यांची संख्या शेकडोंची होती. दरम्यान, आणखी एक दुःखद योगायोग असा की, डॉ. आ.ह. साळुंखे सरांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच पुरोगामी विचारवंत प्रा. फक्रुरुद्दिन बेन्नूर यांचे निधन झाले. दुसर्‍यादिवशी या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमावर दुःखाचे सावट होतेच. प्रा. बेन्नूर हे ज. वि. सरांचे घनिष्ठ मित्र होते. कार्यक्रम संपताच ज. वि. सरांनी तातडीने प्रा. बेन्नूर यांच्या अंत्यदर्शनासाठी स्मशानभूमिकडे धाव घेतली. जनसंपर्क कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज. वि. सर होय.

तरुणांचे मार्गदाते
ज. वि. सरांनी उभी हयात वाचन, लेखन, प्रकाशन, विचारमांडणीमध्ये खर्ची घातली. आंबेडकरी घराण्याशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांचे समवयस्क कार्यकर्ते-मित्र आज विविध राजकीय सत्तेची पदे उपभोगून कोटींची उड्डाणे घेत असले तरी ज. वि. सर मात्र तत्वनिष्ठ राहिले. बंगला, गाडी, पैसा या क्षणभंगूर गोष्टी त्यांना भूरळ पाडू शकल्या नाहीत. त्यांचा हा तत्वनिष्ठपणा ते संपर्कात येणार्‍या प्रत्येक तरुणांत पेरताना दिसतात. ही बाब खरंच सुखावह आहे. हल्ली झटपट प्रसिद्धी आणि पैशाच्या मोहात चळवळ दिशाहिन होताना ज. वि. सरांच्या रुपाने चळवळीचे होकायंत्र टिकून आहे, हे सुचिन्ह आहे. मी चालवित असलेल्या थिंक टँक प्रकाशनाच्या वाटचालीबाबत ज. वि. सरांशी अनेकदा सल्लामसलत करीत असतो. या एकूण वाटचालीत त्यांचे मार्गदर्शन आणि प्रेमाची थाप पुढे जाण्याचे बळ देणारी असते. माझ्यासारख्या शेकडो तरुणांना ज.वि. सरांच्या मार्गदर्शनाची संधी मिळत आहे.

ग्रंथप्रेमी आणि प्रसारक
‘दलित पँथर’चे एक संस्थापक म्हणून ज. वि. सर जसे परिचित आहेत, तसेच ते विद्रोही कवी, लेखक म्हणूनही ओळखले जातात. विचारांची प्रसार अधिकाधिक व्हावा, या हेतूने ते स्वतःची प्रकाशन संस्थाही चालवितात. ज. वि. सरांची असंख्य पुस्तके राज्याच्या कानाकोपर्‍यातील पुस्तक विक्रेत्यांकडे दिसतात. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांच्या राजकिय जीवनाचा वेध घेणारी अनेक पुस्तके ज. वि. सरांनी लिहिली आहे. त्यांची इंग्रजी भाषेतही पुस्तके निघाली आहेत. सहा डिसेंबर रोजी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येणार्‍या लाखोंच्या जनसागराला पुस्तकांची गोडी लागावी यासाठी भव्य प्रमाणात पुस्तक प्रदर्शन घडवून आणण्यात ज. वि. सरांची मोठी भूमिका आहे. त्यांचे ‘आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ’ हे पाच खंड प्रकाशित झाले आहेत. ज. वि. सरांच्या हातून आणखी एक महत्त्वाचे कार्य घडले ते म्हणजे, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य महाराष्ट्र शासनाला प्रकाशित करण्यास भाग पडले. हे अप्रकाशित साहित्य डॉ. माईसाहेब आंबेडकर व भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या सहमतीने मुक्त केल्यामुळे बाबासाहेबांचे इंग्रजी साहित्य प्रकाशित होऊ शकले. या उत्तुंग कार्याचे श्रेय ज. वि. सरांनी कधीही घेतल्याचे ऐकिवात नाही. महाराष्ट्रात कोठेही दौरा असला तरी ज. वि. सरांसोबत नेहमी पाच-पन्नास पुस्तके असतातच. त्यांच्या पुस्तकांची कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहात असतात. अशी ग्रंथनिष्ठा आधुनिक युगात कुठेही दिसणार नाही. ‘दलित पँथर’चे निष्ठावान संस्थापक, विद्रोही कवी, लेखक, प्रकाशक, धडाडीचे कार्यकर्ते, ग्रंथप्रेमी अशा नानाविध भूमिका निभावणार्‍या ज. वि. सरांना दिर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.

ज. वि. पवारांवरील ही स्पेशल व्हिडिओ स्टोरी नक्की पाहा

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका