ज्या मातीत जन्मलो त्या मातीचे संवर्धन करूया!

जागतिक माती दिनविशेष

Spread the love

शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
माती (मृदा) हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.

माती कारखान्यांत तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला की खडकांची झीज होऊन माती तयार होते. लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू असते. साधारण १ सेंमी. मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष, प्राण्यांची विष्टा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते.


जमिनीतील १० ते १५ सेंमी. मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने तयार होतो. हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.

शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सेंद्रीय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत पुरवठा, पीक फेरपालटीचा अभाव इत्यादीमुळे जमिनींचे गुणधर्म बदलत असून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. जमिनीची सुपीकता खालावत चाललेली असून तिचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे.

प्रदेशानुसार मातीमध्ये बदल होतो. माती म्हणजे व्यक्तीचं जीवन अस म्हणणं गैर ठरणार नाही. कारण माणसाची अन्न ही मूलभूत गरज मातीमुळे भागवली जाते. पिकाच्या वाढीसाठी मातीमधील घटकांची आवश्यकता असते.

जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरत आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवून ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.

‘आमची माती’ असं हक्काने म्हणता यावे, यासाठी संपूर्ण जगाला पोसण्यासाठी स्वतः आई समान झिजणाऱ्या मृदेला अबाधित ठेऊन, तिची सुपीकता राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल!

जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने चला तर मग, स्वतःला जपण्यासाठी मृदेलाही जपूया. मातीची महती काय सांगावी, भुकेल्यांची भूक भागविणाऱ्या निस्वार्थ अन्नदात्रीला म्हणजेच मृदेला वाचवूया !

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका