जैविक अभियांत्रिकी क्षेत्रातील पहिलेच क्रांतिकारी पाऊल
कावेरी उमेश कदम यांना जेएनयूकडून पीएच.डी.
सोलापूर/अशोक कांबळे – जीबीएनव्हीसारख्या विषाणूंमुळे पिकांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी इमेज प्रोसेसिंग अलगोरिथमचे तंत्रज्ञान विकसित करणारे संशोधन कावेरी उमेश कदम यांनी केले आहे. भारतात अशाप्रकारचे हे पहिलेच जैविक अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधन असून त्यामुळे आपल्या कृषीप्रधान देशातील सर्व स्तरातील शेतक-यांसाठी वरदान ठरणार आहे. या संशोधनाला स्कोपस इंडेक्सइड जर्नल ने प्रसिद्धी दिली असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) वतीने त्यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
जैविक अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या कावेरी कदम यांनी परिश्रमपूर्वक हे संशोधन केले असून कृषी तंत्रज्ञानातील जीबीएनव्ही विषाणूची डोकेदुखी कायमची दूर होणार आहे. टोमॅटोवर इमेज प्रोसेसिंग अलगोरिथमचे हे तंत्र प्रारंभी केले असून इतर अनेक पिकांच्या समस्यादेखील दूर होणार आहे. या संशोधनावर आधारित त्यांनी तयार केलेले कावेरी डायग्नोस्टिक ऐपदेखील याकामी सहाय्यभूत ठरणार आहे. पिकावरील जीबीएनव्ही विषाणूंचा प्रभाव शोधून त्याला अनुसरून उपाय करण्यासाठी ते ऐप काम करू शकेल. त्याचा वापर अशिक्षित शेतक-यांपासून सुशिक्षित शेतकरी त्याच्या साध्या मोबाईलपासून ऐन्ड्रॉईड उपकरणाच्या मदतीने करू शकतील. त्यामुळे कृषी क्षेत्रातील नव्या क्रांतिकारी पर्वासाठी ही नांदी ठरणार आहे.
डॉ. कावेरी कदम यांचे कोल्हापूर येथून शिक्षण झाले असून त्यांनी या अभ्यासासाठी जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. तिथे प्रा. अतुल जोहरी आणि प्रा. बिनोद कुमार कन्होजिया यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पीएच. डी. प्रबंध पूर्णकेला आहे. त्यांच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.