जेव्हा आय.टी. इंजिनियर बनतो शेतकरी

नांदेडच्या केशव राहेगांवकर यांची यशकथा

Spread the love

मुबारक शेखजी | विशेष प्रतिनिधी

शेती म्हटलं की नुकसानीचा सौदा म्हणत नोकरीकडे वळणारे अनेक शेतकरी पुत्र आपण पाहतो. ‘शेतीत काय आहे? शहरात एखादी सुखाची नोकरी बघा’ हा डायलॉग आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो. शेती करणार्‍याला मुलगी देताना समाज दहावेळा विचार करतो. आजच्या मुली तर शेतकरी नवरा नको गं बाई ! म्हणत इंजिनियर, डॉक्टर यांनाच पसंती देत असतात. मात्र या सर्व संकेतांना झुगारून देत एक अवलिया इंजिनिअर शेतकरी बनलाय.

एकीकडे शेतीला कंटाळून लोक गावं सोडत आहेत. दुसरीकडे इंजिनियर, डॉक्टर नोकरी सोडून गावाकडे शेती करायला येत आहेत. त्यातलेच एक अवलिया म्हणजे नांदेडचे (महाराष्ट्र) केशव राहेगांवकर होय. केशव पेशाने आय.टी. इंजिनियर होते. 1998 ते 2000 पर्यंत ते विप्रो कंपनीत हार्डवेअर विभागात सोल्यूशन प्रोवाईडर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा कॉम्प्यूटर हार्डवेअरचा व्यवसाय सुरू केला आणि काही वर्ष यशस्वीपणे चालवला.

अचानक 2009 मध्ये त्यांच्या भावाची मुलगी आजारी पडली. डॉक्टरांनी अन्नात मिसळलेल्या नुकसानकारक घटकांबद्दल सांगितलं. प्रदूषित अन्नामुळे झालेल्या या घटनेने त्यांना हादरवले. तिथेच त्याच क्षणी त्यांच्या विचारांत बदल झाला. केशव यांना प्रश्न पडला की, अशाच प्रकारे किती जणांना प्रदूषित अन्नामुळे त्रास सहन करावा लागत असेल? याच जाणिवेतून त्यांनी स्वतःचं अन्न स्वतः पिकवण्याचा निर्णय घेतला आणि केमिकलमुक्त शेती करायचा आणि लोकांना जागरूक करण्याचा निर्धार केला.

नांदेडला परतल्यावर त्यांनी पूर्वजांकडून मिळालेली शेती करायला सुरुवात केली. त्यांनी शेतीसाठी फक्त जैविक खत (शेणखत) वापरलं. हळद, अद्रक, शेंगा, तूर, मूग अशी पिकं घ्यायला सुरुवात केली. जैविक शेती असल्याने अनेक लोकांनी त्यांच्याकडून शेतमाल विकत घेण्यास पसंती दिली. त्यांना चांगला फायदादेखील झाला. त्यांचं ध्येय तर लोकांना केमिकलमुक्त शेती करायला लावणे हेच होतं. इतर शेतकर्‍यांना याकडे कसं वळवता येईल याकडेच त्यांचा कल होता.

परिसरातील इतर शेतकर्‍यांना जैविक शेतीकडे वळवणे केशव यांच्यासाठी खूप अवघड काम होतं. त्यांनी इंटरनेटचा सहारा घेतला आणि शेतकर्‍यांना विविध जैविक शेतीच्या फायद्याचे व्हिडिओ दाखविले. हळूहळू मन वळवत त्यांनी शेतकर्‍यांना जोडायला सुरुवात केली. सुरूवातीला दहा, वीस, पन्नास करत करत आज दोनशेपेक्षा जास्त शेतकरी त्यांनी जोडले आणि त्यांचं जीवन बदललं. अमृत नॅच्युरल नावाची कंपनी त्यांनी सुरू केली. मग याच बॅनरखाली त्यांनी आपली उत्पादनं विकायला सुरुवात केली.

केशव हे जैविक शेतीवर होणार्‍या विविध कार्यशाळांमध्ये भाग घेतात आणि रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासोबत असणार्‍या शेतकर्‍यांनाही ते शिकवतात. इंटरनेटच्या सहाय्याने ते दूरदूरच्या शेतकर्‍यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचं काम करतात. शेतकर्‍यांना जैविक शेतीचे फायदे आणि तोटे समजावून त्यांना ‘केमिकलमुक्त शेती’ करायला उद्युक्त करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय बनले आहे.

केशव शिक्षणाला खूप महत्व देतात. त्यांना शिक्षण घेणे आणि देणे खूप महत्वाचे वाटते. जीवनात शिस्त, हिंमत आणि मेहनत यांच्याशिवाय यश मिळत नसल्याचे ते सांगतात.

शेती तर एक असे क्षेत्र आहे जिथे एका रात्रीत सगळं काही मिळणार नाही, प्रामाणिकपणे कष्ट करणे हेच माणसाला यशस्वी शेतकरी बनवू शकते. त्यामुळे कष्ट करत रहा असा संदेश ते शेतकर्‍यांसाठी देतात.

– मुबारक शेखजी

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका