जुनोनी अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; दिले चौकशीचे आदेश
मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत घोषित
सांगोला/नाना हालंगडे
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी येथे वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सातजण ठार झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
जुनोनी येथे अपघात झाल्याचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचना
मिरज सांगोला मार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क करून जखमीना उपचारांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारतर्फे मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
असा झाला अपघात
सोमवारी सायंकाळी पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार ( MH-13 DE -7938) घुसून झालेल्या अपघातात जठारवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर पाच वारकरी जखमी झाले. हा अपघात सांगोला-मिरज रोडवर जुनोनी गावाजवळ सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान घडला. याबाबत सांगोला पोलिसात नोंद झाली आहे.
MH-13 DE -7938 या क्रमांकाची कार होती. तुकाराम दामु काशिद (रा.सोनंद ता सांगोलाा) हा या कारचा चालक आहे. त्याच्यासोबत दिग्विजय मानसिंग सरदार रा.पंढरपूर ता पंढरपूर हाही होता.
अपघातात पाच महिला आणि दोन पुरुष वारकऱ्यांचा समावेश आहे. शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, गौरव पवार, सरामराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई सुभाष जाधव आणि रंजना बळवंत जाधव (सर्व रा. जठारवाडी ता करवीर).
जखमी वारकरी असे, अनिता गोपीनाथ जगदाळे (वय 60), अनिता सरदार जाधव (वय 55), सरिता अरुण सियेकर (वय 45), शानुताई विलास सियेकर (वय 35) आणि सुभाष केशव काटे (वय 67) सर्व रा. जठारवाडी.
MH-13 DE -7938 या क्रमांकाची कार होती. तुकाराम दामु काशिद (रा.सोनंद ता सांगोलाा) हा या कारचा चालक आहे. त्याच्यासोबत दिग्विजय मानसिंग सरदार रा.पंढरपूर ता पंढरपूर हाही होता.
ब्लॅक स्पॉट निश्चित व्हावेत
NHAI ने (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) अशा अपघाती महामार्गावर ब्लॅक स्पॉट (black Spot) असे ठिकाणे शोधून त्यावर उपाय शोधायला हवे. महामार्ग अथवा रस्त्यावरील विशिष्ट ठिकाणी सातत्याने अपघात होतो त्या भागाला ब्लॅक स्पॉट म्हटले जाते. या ठिकाणी अपघाताची काही विशिष्ट कारणे असू शकतात.
यामध्ये रस्त्यावर मोठे वळण असणे, सरळ मार्गावर तीव्र उतार असणे, सरळ असणाऱ्या मार्गावर अचानकपणे वळण येणे आदी कारणांचा समावेश करता येईल. अशा वेळी वाहन अपघाताची शक्यता अधिक असते. हे अपघात जीवेघेणे ठरतात. अशा ठिकाणी गतिरोधक तयार करणे गरजेचे आहे.
हेही पाहा