जिल्हा परिषदेची बदनामी कोण रोखणार?
लाचखोर स्वामीला यापूर्वी दोनवेळा दिली होती समज
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
जिल्हा परिषदच काय पंचायत समितीमध्येही सर्वसामान्य लोकांची कामे पैसा दिल्याशिवाय होत नाहीत. आज प्रत्येक कामासाठी लाच ही द्यावीच लागते. यामध्ये जिल्हा परिषदही मागे नाही असे दिसत आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या सी ई ओ दिलीप स्वामी यांना आता आक्रमक भूमिका घेऊन लाचखोरांची साफसफाई करावी लागणार आहे.
लोकहिताची कामे करताना जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते. यामधील अधिकारी जनतेला काय, या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही त्रास देतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. येथे वरिष्टापासून शिपाईपर्यंत हे प्रकार करतात. पण ज्यांच्या पापाचा घडा भरतो त्यांच्यावर कारवाई होते असे दिसते. मात्र यातून मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची नाहक बदनामी होत असल्याचे दिसते.
परवा दीपावली सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी समाजकल्याण विभागाचा कक्ष अधिकारी बसवराज स्वामी हा लाच घेताना सापडला. त्याला सीईओनी निलंबितही केले. पण अशाने हे थांबणार आहे का? हा प्रश्नही येथे उपस्थित होत आहे.
विरोधी पक्षनेते बळीराम साठे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, यापूर्वी दोन वेळा स्वामीला समज दिली होती. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. स्वामी हा पशूसंवर्धन कर्मचारी पण त्याला प्रतीनियूक्तीवर समाजकल्याणचा कक्ष अधिकारी म्हणून पदभार दिला होता.
यामध्ये स्वामी हा वारंवार असे प्रकार करीत होता. मोहोळ तालुक्यातील हिंगणी येथील सरपंचाला त्याने लाच मागितली होती. त्यातच स्वामी अडकला अन् निलंबित होऊन बसला. जिल्हा परिषदेत काम करून घेण्यासाठी टक्केवारी किंवा लाच मागितली जाते हे १०० टक्के खरे आहे. याबाबतच्या असंख्य तक्रारीही माझ्याकडे आलेल्या आहेत, असेही साठे म्हणाले.
आता तर दोन महिन्यावर निवडणुका येवून ठाकल्याने हे प्रकार मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी कोण रोखणार? हा सवाल येथे उपस्थित होत आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून हे सारे उद्योग थांबविले पाहिजेत. तरच जिल्हा परिषदेचा कारभार सुधारेल.