जस्टीस चंद्रू यांनी 96 हजार प्रकरणांची केली होती विक्रमी सुनावणी
"जयभीम" चित्रपट आहे त्यांच्यावर आधारित
थिंक टँक न्यूज डेस्क
तमिळ सुपरस्टार सूर्या यांची मुख्य भूमिका असलेल्या “जयभीम” चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. “जयभीम” चित्रपट ज्या व्यक्तीवर आधारित आहे ते जस्टीस चंद्रू हे ख्यातनाम वकील होते. पुढे ते मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश बनले. विशेष बाब म्हणजे इतर न्यायाधीश अख्या कारकीर्दीत 10 किंवा 20 हजार प्रकरणांची सुनावणी करतात. मात्र जस्टीस चंद्रू यांनी त्यांच्या कारकिर्दीत 96 हजार प्रकरणांची विक्रमी सुनावणी केली.
अमेझॉन कंपनीकडून रिलीज झालेल्या “जयभीम” चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा आहे. लाखो प्रेक्षकांनी विविध OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहिला आहे. लेनिन, मार्क्स, पेरियार, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचा अप्रतिम वापर करून दिग्दर्शकाने योग्य तो संदेश प्रेक्षकांच्या गळी उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. “जयभीम” ही केवळ घोषणा नव्हे तर ते न्यायाचे, आत्मसन्मानाचे, क्रांतीचे प्रतीक असल्याचे हा चित्रपट सांगतो.
तमिळ सुपरस्टार सूर्या यांच्यासोबतच सुपरस्टार प्रकाश राज यांनीही दमदार भूमिका साकारली आहे. असे असले तरी ज्यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे ते जस्टीस चंद्रू नेमके कोण आहेत. त्यांची न्यायालयीन कामगिरी याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
कोण आहेत जस्टीस चंद्रू?
हा चित्रपट ज्या आदिवासी अत्याचाराच्या घटनेवर आहे त्या काळात जस्टीस चंद्रू हे वकिलीचा नुकताच सराव करत होते. आदिवासींवर झालेला अन्याय त्यांनी न्यायासाठी लावून धरला. या केसमधील वकिलाच्या भूमिकेसोबतच त्यांनी घटनेच्या मुळाशी जाऊन बारकावे शोधले. पुरावे कोर्टासमोर सादर केले.
आदिवासी अत्याचाराची ही केस सेशन कोर्टात सुनावणीसाठी उभी राहिली. या प्रकरणातील पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मारहाण, विनयभंग आणि अत्याचारचा आरोप होता त्यांची निर्दोष सुटका झाली. तरीही चंद्रू मागे हटले नाहीत. तामिळनाडू सरकारने सेशन्स कोर्टाच्या निर्णयाविरोधात मद्रास हायकोर्टात अपील केले. पुढे या केसमधील पाच पोलिसांना जन्मठेप, तर एका डॉक्टरला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला.
चंद्रू बनले न्यायाधीश
जस्टीस चंद्रू 2006 साली मद्रास हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले तर 2009 साली त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. विशेष बाब म्हणजे इतर न्यायाधीश अख्या कारकीर्दीत 10 किंवा 20 हजार प्रकरणांची सुनावणी करतात. मात्र जस्टीस चंद्रू यांनी त्यांच्या कारकिर्दीत 96 हजार प्रकरणांची विक्रमी सुनावणी केली. ते न्यायाधीश असेल तरी अत्यंत साधे राहणीमान असे. त्यांनी आपल्या वाहनावरील लाल दिवा व सुरक्षा रक्षकही नाकारला होता.
गुगलवर सर्वाधिक सर्चिंग
“जयभीम” चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा असलेले जस्टीस चंद्रू यांची कामगिरी सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. जस्टीस चंद्रू यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. गुगलवर जस्टीस चंद्रू यांच्या नावाचे सर्चींग सर्वाधिक आहे. The Hindu, Hindustan Times, The Indian Express या आघाडीच्या वृत्तपत्रांसोबतच विविध भाषांतील वृत्त वाहिन्यांवर जस्टीस चंद्रू हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.