जवळ्यात धडाडणार शेकापची तोफ
कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी
सांगोला/नाना हालंगडे
भारतीय शेतकरी कामगार पक्ष सांगोला व पुरोगामी युवक संघटना सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी व जवळा येथे पुरोगामी युवक संघटना नामफलकाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, ०१ रोजी करण्यात आले आहे. जवळा गावात सायंकाळी ४ वाजता जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ही जंगी सभा आयोजित करून शेकापने लक्ष वेधले आहे.
जवळा गावात दुपारी ४ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आजूबाजूच्या गावातील जास्तीत जास्त कार्यकर्ते जवळा गावात सभेसाठी जमविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई चंद्रकांत देशमुख असतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आम. भाई संपतराव पवार – पाटील उपस्थित राहणार आहेत. उद्घाटक म्हणून भाई डॉ. बाबासाहेब देशमुख (अध्यक्ष , पुरोगामी युवक संघटना , महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित राहणार आहेत.
पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणूकही जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, आ. शहाजीबापू पाटील यांनी “आमदार तुमच्या भेटीला” हा गावभेट दौरा घेऊन सभांचा धडाका लावला होता. विकासाच्या मुद्द्यावर हे दोन्ही ताकदवर नेते एकत्र आल्याने तालुक्याचे राजकारण तापले होते. अशातच शेतकरी कामगार पक्षाकडून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जवळा गावात पुरोगामी युवक संघटनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम तसेच जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध गावांत शाखांचे उद्घाटन
बुरुंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी व जवळा येथे पुरोगामी युवक संघटना नामफलकाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुरुंगेवाडी येथे सकाळी ११.३० वाजता, आगलावेवाडी येथे दुपारी १२.३० वाजता, भोपसेवाडी येथे दुपारी दीड वाजता, तरंगेवाडी येथे दुपारी अडीच वाजता, जवळा येथे दुपारी ३:३० वाजता पुरोगामी युवक संघटना नामफलकाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जवळा येथे जंगी सभा
जवळा गावात दुपारी ४ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आजूबाजूच्या गावातील जास्तीत जास्त कार्यकर्ते जवळा गावात सभेसाठी जमविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री
जवळा गाव तसेच आजूबाजूचा परिसर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांचे या भागात मोठे वर्चस्व आहे. यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या फारशा सभा किंवा कार्यक्रम या भागात दिसले नाहीत. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाकडून जवळा आणि परिसरातील गावांमध्ये लोकसंपर्क वाढविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा