जवळ्यातील ‘भारत’च्या कार्याला सलाम
दरवर्षी गरीब मुलांना चप्पलांचे वाटप
स्पेशल स्टोरी / डॉ.नाना हालंगडे
जवळ्यातील भारतच्या कार्याला सलामच करावा लागेल. दरवर्षी गावातील 40 ते 45 गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची चप्पल मोफत देत जणू हा मायेची ऊबच देत आहे. त्याचे हे चप्पल वाटपाचे 13 वे वर्ष असून यापूर्वी सलग 12 वर्षांपासून गावातील 550 हून अधिक मुलांना चप्पल वाटप केले आहे.
“गरिबी काय असते हे मी स्वतः अनुभवले आहे. मायेची थोर शिकवण ही माझ्या उद्योग व्यवसाय वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे” असे भारत सुरवसे यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील जवळा येथे भारत ज्ञानोबा सुरवसे यांचे चपलांचे दुकान आहे. त्यांनी 12 वर्षात 550 गरीब शालेय मुलांना चप्पलांचे जोड वाटून मायेची ऊब दिलेली आहे. हे समाज कार्य ते 2011 सालापासून करीत आहेत.
भारत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सीता यांच्या समाजसेवेची सुरू कशी झाली, प्रारंभी कसे दिवस काढले, हे भारत यांनी सांगितले असता अक्षरशः डोळेच पाणावतात. ज्यावेळी भारत गावातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता. त्याचवेळी मोलमजुरी करून, कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या मातेने भारतला चप्पालीसाठी पैसे दिले. त्यावेळी 5 रुपये कमी पडले. पण गावातील दुकानदाराने त्याला चप्पल दिली नाही. हीच आस मनात येवून भारत याने आपणही मोठे झाल्यावर काहीतरी करून दाखवायचे याच ध्येयाने त्यांनी मजल मारली आहे. आज त्यांनी मुलगी शारदा हिच्या नावाने दोन दुकाने थाटली आहेत.
भारत सुरवसे म्हणाले की, “गरिबी काय असते, समाज कसा त्रास देतो हे मी स्वतः अनुभवले आहे. त्यामुळे तर कै.सुमन ज्ञानोबा सुरवसे यांच्या आशीर्वादाने आज मी चप्पल दुकानदारी दोन शाखेत विस्तारली आहे. याची सुरुवात 2006 सालापासून सुरू केलेली आहे. आजही गावातील गोरगरीब पाचवी ते सातवीत शिक्षण घेणाऱ्या 40 ते 45 मुलांना त्यांच्या पसंतीने चपलांचे जोड मोफत देतो. चपल वाटपाचे 13 वे वर्ष आहे. आपणही समाजासाठी काहीतरी देणे लागतो हीच आस मनात ठेवून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे. कितीही कमविले तर कमीच पडते. त्यामुळे जिवंत असेपर्यंत समाजासाठी, मानव जातीसाठी मदत करणे हेच माझे ध्येय राहणार आहे.”
या कार्यासाठी पत्नी सीता सुरवसे व श्रीधर दत्ता सुरवसे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
दातृत्वाला सलाम
समाजात माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय भारत सुरवसे यांच्या कृतीतून दिसून येतो. भारत सुरवसे यांचे हे कार्य अद्वितीय आहे. व्यवहारात चार दोन रुपये पाहणारी माणसे गोर गरीबांप्रती माणुसकी दाखवत नाहीत हा नेहमी येणारा अनुभव आहे. समाजात सर्वच जाती धर्मातील आर्थिक स्थिती नसणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना मदतीची नेहमी गरज असते. ही गरज त्यांच्यापरिने भरून करण्याचे काम भारत करत आहेत हे खूप महत्त्वाचे आहे.
हेही वाचा
शेकापच्या ४५ सरपंचांचा शहाजीबापूंवर संताप, कामात खोडा घालत असल्याचा आरोप
विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य