ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

जवळ्याच्या म्हसोबा यात्रेवरील संकट दिपकआबांनी केले दूर

महावितरणने तोडलेली वीज पुन्हा जोडली

Spread the love

व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्षमुळे हजारो लाखो भाविक भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आबांनी तात्काळ समयसूचकता दाखवत वीज वितरण कंपनीचे अधिकारी गोसावी आणि त्यांचे कर्मचारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला.

सांगोला : तालुका प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारी जवळा ता. सांगोला येथील श्री म्हसोबा यात्रा कोरोनाच्या अडचणीमुळे दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्याच उत्साहाने भरली आहे. मात्र यंदाची यात्रा संकटात सापडली. अचानक वीज वितरण कंपनीने सर्वांचीच वीज तोडली. जणू संपूर्ण यात्रा काळोखात बुडून गेली. सांगोला तालुक्याचे नेते, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने मध्यस्थी करून वीज पूर्ववत केली.

जवळा येथील म्हसोबा यात्रेला महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातील विजापूर बेळगाव आणि अन्य भागातून हजारो भाविक आणि व्यापारी येतात. दोन वर्षांनी भरलेली यात्रा यंदा त्याच उत्साहाने भरली असताना अचानक वीज वितरण कंपनीने यात्रेतील एकही दुकानदार किंवा व्यापारी बांधवाने महावितरणकडे विशिष्ठ अनामत रक्कम ठेवून अधिकृत वीज जोडणी केली नाही म्हणून सर्वांचीच वीज तोडली. आणि जणू संपूर्ण यात्रा काळोखात बुडून गेली. दोन वर्षांनी होणारी यात्रा यंदा वीज वितरण कंपनीने कनेक्शन बंद केल्याने होणार की नाही..?

अशी परिस्थिती निर्माण झाली असता ही बाब माजी आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना जवळा येथील व्यापारी शहाजहान अत्तार यांनी कळवली. व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्षमुळे हजारो लाखो भाविक भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आबांनी तात्काळ समयसूचकता दाखवत वीज वितरण कंपनीचे अधिकारी गोसावी आणि त्यांचे कर्मचारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला.

जवळा येथील म्हसोबा यात्रा हा येथील लोकांच्या केवळ उदरनिर्वाहाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे. “जवळ्याचा म्हसोबा” हे सांगोला तालुक्यातील नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे आराध्य दैवत आहे. असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हासोबाची यात्रा दोन वर्षांनी पुन्हा भरत आहे.

या यात्रेत जनावरांचा बाजार, खेळणी, भांडी कपडे मिठाई लहान मुलांचे पाळणे खाद्य पदार्थांचे स्टॉल आदी दुकानदार आपली असंख्य स्वप्न घेऊन त्यांनी यात्रेत आपली दुकाने थाटली आहेत. म्हणून वीज वितरण कंपनीने नियमावर बोट ठेवून भाविकांच्या श्रद्धा आणि व्यापारी बांधवांच्या स्वप्नांचा चुराडा करू नये पुढील वर्षीच्या यात्रेत प्रत्येक व्यापाऱ्यांनी यात्रा सुरू होण्यापूर्वी स्वतःहून अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी त्यासाठी प्रसंगी आपण पुढाकार घेऊ अशी दिपकआबांनी भूमिका घेऊन वीज वितरण कंपनीला पुन्हा त्यांना वीज जोडणी सुरू करावी अशी विनंती केली.

दिपकआबांच्या विनंतीचा मान राखत वीज वितरण कंपनीने पुन्हा सर्व व्यापारी आणि अनेक छोट्या मोठ्या दुकानदार व व्यावसायिकांना वीज देण्याची तयारी दर्शवली. तात्काळ कार्यवाही केली. त्यामुळे पुन्हा एकदा भाविक भक्त तसेच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. दिपकआबांनी शिष्टाई केल्यामुळेच म्हसोबा यात्रेत पुन्हा एकदा रोषणाई संचारली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका