जवळा-कडलास रस्त्याला नेत्यांच्या उदासिनतेचा कलंक
बांधकाम विभागासोबत कोणाची मिलीभगत? रस्त्यांची "माती"
अख्खा सांगोला तालुका खड्ड्यात घालणारा, रस्त्याची “माती” करणारा बांधकाम विभाग हा नेत्यांच्या गावाकडील रस्त्याकडेही लक्ष देत नाही. यावरूनच अधिकारी हे नेत्यांना किती फाट्यावर मारतात हे दिसून येते.
सांगोला / एच. नाना
जवळा हे तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातील आठवडा बाजारात मोठी उलाढाल होत असते. आजूबाजूच्या गावातील, वाड्यावस्त्यातील लोकांची दररोज वर्दळ असते. जत, लोहगाव, सांगोला या प्रमुख मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जवळा गावाच्या नशिबी मात्र वर्षानुवर्षे चांगला रस्ता नाही. याचे कारण म्हणजे कमालीची राजकीय उदासीनता.
जवळा गावाला यायचे म्हटले तर धड रस्ता नाही. जो आहे तो खड्ड्यात गेला आहे. जवळा गावापासून ते कडलास गावापर्यंत अक्षरशः खड्ड्यानेच रस्ता व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालकांना, प्रवाशांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
सांगोला तालुक्यात सर्व रस्त्यांची वाट लागलेली आहे. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पहावयास मिळत आहेत. पण या खड्ड्यांना बुजविण्यात कोणताच माईचा लाल पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे तर सार्वजनिक बांधकामचा उपअभियंता हे खड्डे मातीत घालत आहे. खरे तर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने, असे हे अधिकारी तालुक्यात शिरजोर झाले आहेत.
जवळा गाव हे तालुक्यात बड्या (?) नेत्यांसाठी सुपरिचित आहे. मात्र, त्यांना गावचे काहीही देणेघेणे नाही. ही मंडळी याच रस्त्याने तालुक्याला जाते, पण त्यांना हादरा बसत नाही वा खड्डा लागत नाही. का तर त्यांच्या गाड्या अलिशान आहेत.
मरणयातनेचा प्रवास!
जवळा ते कडलास हा रस्ता 7 किलोमिटरचा आहे. पण कडलासपर्यंत जायलाही सत्तर मिनिटे लागतात. यावरूनच तुम्ही कल्पना करा की रस्ता किती खड्ड्यात गेला असेल. या रस्त्यावरील खड्ड्यांना सुरुवात जवळ्यातील सेंट्रल बँकेपासून होते ती कडलास गावच्या एसटी स्टँडपर्यंत. त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे आहेत. तर देशमुखवस्ती लगत असलेले दोन मोठाले स्पीड ब्रेकर, यासह पाटील वस्तीपर्यंत जरा रस्ता बरा आहे.
त्यानंतर म्हमाणे पेट्रोल पंप ते कडलास गावापर्यंत तर रस्त्याची अवस्था न पाहवणारी. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने माती टाकली. मातीचे हे ठीग रस्त्यावर त्याच अवस्थेत आहेत. तर येथील मुख्य बाजार आवारासमोरील खड्डे अपघातग्रस्त ठरत आहेत. कडलास गावातही बडे बडे नेतेमंडळी आहेत,पण तेही गप्प आहेत.
ज्या गावाला रस्तेच नीट नाहीत. त्यागावातील अन्य विकासकामांची अवस्था कशी असेल, याची तुम्हीच कल्पना करा. या रस्त्याच्या कामासाठीच्या पाट्या कडलास गावात मागील दोन महिन्यापूर्वी लागल्या; पण त्याचे काम अजूनही सुरू नाही. सध्या हा रस्ता म्हणजे “मौत का कुआ”च झाला आहे. याचा सर्वाधिक त्रास वाहनधारक, प्रवासीवर्गाना होत आहे.
कडलास-जवळा रस्त्यावरील कडलास गावच्या वेशीवरच बाजार आवारालगत मागील आठ दिवसापूर्वी रस्त्याच्या मधोमध मुरुमाचे ठिग टाकले आहेत. त्यातही मोठमोठाले दगड आहेत. पण हे ठीग रस्त्यावर पसरले देखील नाहीत. त्याबाबत उपअभियंत्याकडे विचारणा केली असता, पाऊस आहे असे कारण सांगितले.
त्याच्या पुढेही मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पण याकडे कोणीही लक्ष देत नाही. पावसाळा संपला तरी हे अधिकारी पावसाच्या मूडमधून बाहेर यायला तयार नाहीत. दगडाला धडकून एखादा अपघात झाल्यास, हकनाक जीव गेल्यास हे अधिकारी देशोधडीला लागतील, हे नक्की.
उपअभियंत्यांचे दुर्लक्ष
अख्खा सांगोला तालुका खड्ड्यात घालणारा, रस्त्याची “माती” करणारा उपअभियंता हा नेत्यांच्या गावाकडील रस्त्याकडेही लक्ष देत नाही. यावरूनच अधिकारी हे नेत्यांना किती फाट्यावर मारतात हे दिसून येते.