ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

जलजीवनमध्ये कोट्यवधीचा घपला

शेकाप नेत्यांनी सीईओंसमोरच केली पोलखोल

Spread the love

जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांच्या कामाची चौकशी करुन त्यांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याविरुध्दही न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

सांगोला/नाना हालंगडे
सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमतून सुमारे एक हजार कोटी रुपयांची कामे होत आहेत. या कामांची मंजूरी करण्याच्या प्रक्रियेत नियमांना हरताळ फासून कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा कारंडे, संगम धांडोरे, गजेंद्र कोळेकर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, समाधान पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत जलजीवन मिशनमधील गैरप्रकाराची माहिती पत्रकारांना दिली.

सांगोला तालुक्यामध्ये लक्ष्मी नगर , कटफळ , वाटंबरे , वाणीचिंचोळे , मांजरी , धायटी , एकतपुर , आचकदाणी या गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेची कामे न करता बिले अदा करून गैरप्रकार केला आहे , असा आरोप असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सांगोला तालुक्यात काम न करताच आतापर्यंत चार कोटी रुपयांचे बीलही ठेकेदारांना वितरीत करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जलजीवन मिशनच्या कामात दहा टक्के लोकवर्गणी भरण्याची अट आहे. मात्र लोकवर्गणी भरलेली नसतानाही ठेकेदारांना कामे मंजूर करण्यात आली आहे. सर्वात कमी दराने निवीदा दाखल असतानाही जास्त दराने निवीदा दाखल करणाऱ्या ठेकेदारास काम मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याबाबत तक्रार करुनही प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

नियमात तरतूद नसतानाही जीओ टॅगींगची अट कामासाठी घालण्यात आली. निवीदा दाखल होताना या स्पर्धा होवू देण्यात आली नाही. पाईप न आणताच ८५ टक्के बीले वितरीत करण्यात आल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

सांगोला तालुक्यातील लक्ष्मी नगर, कटफळ , वाटंबरे , वाणीचिंचोळे , मांजरी , घायटी एकतपूर , आचकदाणी या गावात काम न करताच खोटे बील काढण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांच्या कामाची चौकशी करुन त्यांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याविरुध्दही न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

सांगोला तालुक्यातील सोणंदचे सरपंच समाधान पाटील व घेरडीचे सरपंचा सुरेखा पुकळे हे दोन सरपंच याचिका दाखल करणार आहेत अशी माहिती यावेळी बाबा कारंडे यांनी दिली.

फौजदारी दाखल करु : स्वामी
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, जल जीवन योजनेच्या कामासंदर्भात ज्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारी निवारण करण्याचे काम करण्यात आले आहेत. अद्याप ज्या तक्रारी आहेत त्याही तपासल्या जात आहेत. जलजीवन मिशनच्या बाबतीत काही ठिकाणी काम न करताच बील वितरीत झाले असेल तर त्याबाबत पुरावे देण्यात यावेत. याप्रकरणी संबधिताविरुध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. माझ्याविरोधात जनहित याचिका दाखल झाली तर त्यातही सत्य समोर येईलच. निविदा प्रक्रिया ही ऑनलाइन असल्यामुळे पारदर्शी कारभार होतो.

यात काही चुका झाल्या असल्यास त्या पुराव्या दिल्या तर नक्कीच दोषींवर फौजदारी दाखल करू अशी प्रतिक्रिया जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांची बदली झाली आहे. मात्र त्यांच्या ठिकाणी राज्य शासनाने अधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही. जलजीवन मिशनची कामे मिशन मोडवर असल्याने अधिकाऱ्याची गरज आहे. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून अधिकारी देण्यात येत नाही , तोपर्यंत कोळी यांना कार्यमुक्त करणार नाही अशी माहिती यावेळी दिलीप स्वामी यांनी दिली.

दीपक कोळी यांची अखेर उचलबांगडी
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची शासनाने अखेर उचलबांगडी केली असून त्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबादला बदली केली आहे.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला हजारो कोटीचा निधी मिळाला. या कामांच्या टेंडरमध्ये कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी अनियमितपणा असल्याच्या तक्रारी आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्या होत्या. त्यावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोळी यांची चौकशी लावली होती. त्या चौकशीच्या अहवालात जनजीवन मिशन योजनेच्या कामात टेंडर देताना अनियमितपणा आढळून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे पाठवला होता त्यामुळे एक महिन्याच्या आतच कोळी यांचे शासनाने बदली केली आहे.

कोळी यांच्या बदल्यात दुसरा अधिकारी दिला नसला तरी आता हा चार्ज कुणाकडे जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंडड यांनी यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे त्यामुळे नवीन अधिकारी येईपर्यंत तो चार्ज कटकधोंड यांच्याकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दीपक कोळी यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे जलजीवन मिशनचे टेंडर देताना त्यांनी बराच गोंधळ घातला. टक्केवारी वसुलीसाठी त्यांनी स्वतंत्र खाजगी व्यक्ती नेमण्याची चर्चा झेडपी मधून ऐकण्यास मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा त्यांच्या कारभारावर मागील काही दिवसात प्रचंड नाराज दिसून आले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका