जनसंपर्क हा सर्वंकष विकासाचा विषय : कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस
'जनसंपर्काचे अंतरंग' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
जनसंपर्क हा सर्वंकष विकासाचा विषय आहे. मानवी संसाधन कौशल्यपूर्ण रीतीने वापरण्यासाठी जनसंपर्क घडून येणे खूप महत्त्वाचे असते. अधिकाधिक लोकसंवाद घडून येण्यासाठी जनसंपर्क महत्त्वाचा आहे. डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी लिहिलेले हे पुस्तक सर्व भाषांत भाषांतरित व्हावे, अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर लिखित ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात हा कार्यक्रम झाला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघ तसेच सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा तसेच बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा.डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा, परिक्षा नियंत्रक प्रा. डॉ. शिवकुमार गणापुर, डॉ. सुरेश पुरी (परीक्षा मंत्री, हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद), विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी या ग्रंथावर भाष्य केले. यावेळी प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डॉ. शिवाजी जाधव, सुसंवाद माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजित बिराजदार उपस्थित होते.
पुस्तकावर भाष्य करताना डॉ. आलोक जत्राटकर म्हणाले की, जनसंपर्क हा विषय प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन करण्याचा विषय आहे. डॉ. चिंचोलकर यांनी त्यांच्या अनुभवाचा कस लावत हे पुस्तक साकारले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप अर्थ व्यक्त करणारे आहे. जनसंपर्क हा मानवकेंद्री विषय आहे. जनसंपर्काच्या अंतर्गत आणि बाह्य जगाशी सांधा जोडण्याचे काम हे पुस्तक करेल. या ग्रंथात पूरक छायाचित्रे, रेखाचित्रे वापरली आहेत. त्यामुळे हा ग्रंथ वाचनिय झाला आहे. नऊ प्रकरणात हे पुस्तक विभागले आहे. कार्पोरेट जनसंपर्क यावरही यामध्ये चांगले लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, दादासाहेब फाळके यांच्यावर त्यांनी उत्तम जनसंपर्क असणारे महापुरुष म्हणून मांडणी केली आहे.
प्रकाशन समारंभास जनसंपर्क तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्याविषयी
‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचे लेखक डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी बारा वर्षे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केले. मागील तेरा वर्षांपासून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून, जनसंपर्क विषयाच्या अध्यापनाचे कार्य करतात. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया या देशस्तरीय जनसंपर्क संस्थेच्या सोलापूर शाखेचे डॉ. चिंचोलकर अध्यक्ष आहेत.