‘जनसंपर्काचे अंतरंग’ ग्रंथाचा रविवारी शानदार प्रकाशन सोहळा
कुलगुरु, उद्योगपतींसह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर लिखित व विद्या बुक्स प्रकाशित ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार, १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ तसेच सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मान्यवरांच्या उपस्थितीत होईल कार्यक्रम
प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा तसेच बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस असतील. या कार्यक्रमास डॉ. सुरेश पुरी, परीक्षा मंत्री, हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. डॉ. आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे या ग्रंथावर भाष्य करतील. ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचे प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे हे समारंभास उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशन समारंभास जनसंपर्क तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे तसेच सुसंवाद या मास कम्युनिकेशन विभागाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजित बिराजदार यांनी केले आहे.
डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्याविषयी
‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचे लेखक डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी बारा वर्षे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केले. मागील तेरा वर्षांपासून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून, जनसंपर्क विषयाच्या अध्यापनाचे कार्य करतात. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया या देशस्तरीय जनसंपर्क संस्थेच्या सोलापूर शाखेचे डॉ. चिंचोलकर अध्यक्ष आहेत.