चिकमहूदच्या ऐतिहासिक जलसेतूचे मजबुतीकरण
नीरा-उजव्या कालव्यावरील १० मोरी असलेला २३ क्रमांकाचा जलसेतू
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील निरा उजवा कालव्यावरील नव्वद वर्षाहून अधिक जुना असलेल्या ब्रिटिशकालीन दहामोरी या जलसेतुच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे नऊ कोटीहून अधिक रुपयांचा निधी खर्चून करण्यात येणारे हे काम दर्जेदार व मजबूत व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.
सांगोला तालुक्यातील चिकमहूद परिसरात नीरा उजवा कालव्यावरील दहामोरी हा ब्रिटिशकालीन जलसेतू सन 1930 मध्ये उभारण्यात आला आहे. हे संपूर्ण बांधकाम दगडी असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सिमेंटचा वापर केलेला नाही. नव्वद वर्षाहून अधिक आयुष्यमान असलेल्या या जलसेतू मध्ये आकर्षक कमानी असलेल्या दहा मोऱ्या आहेत. या जलसेतू खालून वाहनांची व नागरिकांची नेहमी ये-जा असते.

सुमारे आठ ते दहा मीटर उंचीच्या या जलसेतूची रुंदी 30 फूट इतकी आहे. तर दोन मोऱ्यामधील अंतर नऊ मीटरहून अधिक आहे. अशा दहा मोऱ्या असलेला हा जलसेतू नव्वद वर्षाहून अधिक जुना आहे. नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडल्यानंतर हा जलसेतू भरून वाहत असतो. या जलसेतूमधून पुढेे सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. नीरा उजवा कालव्यावरील जलसेतू क्रमांक 23 हा जलसेतू दहामोरी म्हणून ओळखला जातो.

प्राचीन व दर्जेदार बांधकामाचा नमुना असणारा हा जलसेतू इतिहासकालीन ठेवा आहे. सरकारी व लोकहिताची कामे कशा प्रकारे केली जावीत याचा हा उत्तम नमुना आहे. नीरा उजवा कालव्यातून शेतीला पाणी सोडल्यानंतर तीन महिन्यांहून अधिक काळ या जलसेतूमधून पाणी वाहत असते. या संपूर्ण पाण्याचे ओझे हा जलसेतू पेलत असतो व पुढे पाणी जाते. नव्वद वर्षाहून अधिक प्राचीन असलेला हा जलसेतू थोडासा कुमकुवत झाला होता. बऱ्याच ठिकाणी त्यामधून पाणी खाली गळत होते. त्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी जलसेतूला आतून प्लास्टर करण्यात आले आहे. सध्या या जलसेतूच्या भिंतींचे मजबुतीकरण सुरू आहे. ब्रिटिशकालीन दगडी भिंतींवर काँक्रीटचे जॅकेट करून या जलसेतूला खालून आधार देण्यात येणार आहे.
हे मजबुतीकरणाचे काम प्रगतीपथावर असून काम अधिक दर्जेदार व मजबूत व्हावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
मजबुती करणामुळे या जलसेतूचे पूर्वीचे सौंदर्य व दगडी बांधकाम झाकले जाणार आहे. ब्रिटिशकालीन बांधकामाचा उत्तम नमुना झाकून त्याचे मजबुतीकरण होत आहे. हे काम अधिक मजबूत आणि दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.