चाळीसगावात पुरामुळं हाहाकार; 800 जनावरे वाहून गेली
तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर
जळगाव : चाळीसगाव (जि.जळगाव) येथे पावसामुळे हाहाकार माजला आहे. जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ५ ते ७ लोकंही वाहून गेल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे. जळगाव शहर आणि ग्रामीण भागात पहाटे जोरदार पाऊस पडला. तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आल्याने या पुराचे पाणी जवळपास 15 गावांमध्ये शिरले.
या पुराच्या पाण्यात जवळपास 800 जनावरं वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच 5 ते 7 नागरिकही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक आमदार मंगशे चव्हाण यांनी दिली. चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहने अडकून पडल्याने त्यांना मोठ्या अडचणी ना समोर जावे लागत आहे,एक ट्रक दरीत कोसळत त्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार मंगेश चाव्हण यांनी दिली आहे.
मुसळधार पावसामुळं औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराच पाणी पंधरा गावात शिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातील अनेक गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे.