“चार घास गोड-धोड आणून दिल्यामुळं दिवाळी असल्यासारखं तरी वाटलं!”
आपुलकी प्रतिष्ठानने साजरी केली चाळीस गरीब कुटुंबाची दिवाळी
सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
“कोरोनाचा काळ सुरू झाला तसं जगणंही मुश्कील झालंय…. गेल्या वर्षीबी दिवाळी केली नाही, अन यावर्षीबी नाही… तुम्ही लोकांनी जे चार घास गोड-धोड आणून दिलंय त्यामुळं दिवाळी असल्यासारखं तरी वाटंल !” अशी भावना गरजू व गरीब कुटुंबातील लोकांनी आपुलकीच्या सदस्यांसमोर व्यक्त केली.
निमित्त होते आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सांगोला शहर परिसरात कामधंद्यानिमित्त आलेल्या गोरगरीब लोकांना फराळ वाटप, साडी वाटप आणि लहान मुलांना कपडे वाटपाचे!
आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीने सांगोला शहर परिसरातील वासुद रोड, मिरज रोड, पंढरपूर रोड आदी ठिकाणी बाहेरगावाहून विविध कामधंद्याच्या निमित्ताने झोपड्या करून राहत असलेल्या लोकांना प्रत्येक कुटुंबास दिवाळी फराळ, लहान मुलांना कपडे, मोती साबण, उटणे आदी साहित्य व कुटुंबातील प्रत्येक भगिनीला भाऊबीजेची साडी भेट देऊन या गोरगरीब लोकांची दिवाळी गोड करण्याचा छोटासा प्रयत्न आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केला.
शहर परिसरात वास्तव्यास असलेल्या 40 कुटुंबातील 180 लहानथोर सदस्यांना दिवाळी फराळ व 55 महिलांना साड्या आपुलकीने भेट देवून या कुटुंबाची दिवाळी गोड केली.
आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी देणगी जमा करून हा स्तुत्य असा उपक्रम राबविला. ” कोरोना येण्यापूर्वी आमचे व्यवसाय चालायचे, आमची बहुरूपी कला सादर करून प्रपंच चालवत होतो परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आमचं जगणं मुश्कील होऊन बसलं आहे. आजही खेड्यापाड्यात आम्हाला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही. मिळेल त्या चार पैशावर समाधान मानावे लागते, आपुलकीने दिवाळी फराळ, लहान मुलांना कपडे व महिलांना साड्या देऊन आमची दिवाळी गोड केली ” अशी भावना प्रकाश भोसले यांनी यावेळी व्यक्त केली .
आपुलकी प्रतिष्ठानच्या या फराळ वाटपासाठी अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळ्ळीसागर, अरुण जगताप, रमेशअण्णा देशपांडे, अरविंद केदार, सुरेश चौगुले, निलकंठ लिंगे, राजेंद्र दिवटे, वसंत सुपेकर, सुनील मारडे, महादेव दिवटे चैतन्य कांबळे, अरविंद डोंबे, संतोष भोसले, विठूनाना फुले,संजय गव्हाणे, धनाजी शिर्के, अमर कुलकर्णी, किशोर पोपळे, सतीश राऊत, उमेश चांडोले, अभि शिंगाडे आदी उपस्थित होते.