घेरडी-वाणीचिंचाळे-शिरसी रस्ता खड्ड्यातून
सोलापूरकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित
सांगोला तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. नेते निवडणुकांच्या तयारीत मश्गूल आहेत. अधिकारी मुजोर बनले आहेत. जनता मात्र खड्ड्यात आहे. तालुक्यातील रस्त्यांच्या दुर्दशेचे पोस्टमार्टम करणारी “थिंक टँक लाईव्ह”ची ही विशेष वृत्तमालिका सांगोला तालुका “खड्ड्यात”.
सांगोला / नाना हालंगडे
सांगोल्यात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यामुळे अधिकारीही बेभानपणे वागत आहेत. त्यांना आपल्या अधिकार, कर्तव्याची जाण नाही. त्यामुळे रस्तेच काय सर्वच विभागात अंधाधुंद कारभार सुरू आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आघाडीवर असून, तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट यांनीच लावली आहे. त्यातीलच हा एक घेरडी-वाणीचिंचाळे-शिरसी हा रस्ता आहे. दोन वर्षापासून हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
सांगोला तालुक्यातील सर्वच रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. पण या खड्ड्याना मातीत घालणारा एक उपअभियंता तालुक्यात शिरजोर झाला आहे. ठेकेदारांच्या तालावर नाचणाऱ्या हा अधिकारीच चक्क खोटे बोलून जनतेच्या डोळ्यात ही धूळफेक करीत आहे. सध्या तालुकाभर खड्डे बुजविण्याची जोरदार मोहीम सुरू असून, मातीचा वापर करून ठेकेदार व अधिकारीच मालामाल होत असल्याचे तालुकाभर पहावयास मिळत आहे. अशी ही रस्त्यातील कमाई जोरदारपणे तालुक्यात सुरू आहे.
तालुकाभरातील 120 किलोमिटरहून अधिक रस्त्यांची दैना उडालेली आहे. सध्या सर्वच रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना, प्रवाशी वर्गाना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीबरोबर गटगटातील लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने तालुकावासियाना खड्ड्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घेरडी ते शिरसी या रस्त्याची अवस्था न पाहणारी अशीच आहे. खरे तर हा तसा राज्यमार्ग पण शासनानेही दर्जा काढून घेतल्याने बांधकाम विभागानेही दर्जाहीन करून टाकला आहे. घेरडी ते घेरडी-वाणीचिंचाळे-शिरसी हद्दीपर्यंत खड्ड्यांनी आपले साम्राज्य व्यापले आहे. खड्ड्यातून रस्ता शोधत, आठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दीड तास लागत आहे. मग तुम्ही कल्पना करा, रस्त्याची अवस्था कशी असेल.
हा रस्ता विजापूर, जत पारे, घेरडी, शिरसी मार्गे मंगळवेढा ते सोलापूरला जातो. सध्या तर या मार्गावरील सांगोला तालुक्याच्या हद्दीतील 21 किलोमिटर रस्त्यांची दैना उडालेली आहे. खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे या रस्त्यावरून प्रवासच करावा वाटत नाही. हा रस्ताही बांधकाम विभाग कधी मातीत घालणार आहे, हे पाहणेही आता औत्सुक्याचे वाटू लागले आहे. आता यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालूनच हा जाब विचारणार असल्याचे घेरडीचे सरपंच पिंटूदादा पुकळे यांनी सांगितले.