सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील सात मध्यम प्रकपालापैकी एक असलेला घेरडी तलाव शंभर टक्के भरला असून सध्या या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे घेरडीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. तलाव शंभर टक्के भरला असून पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
ब्रिटिशकालीन तलाव असलेला, घेरडीचा तलाव विस्ताराने खूप मोठा आहे. मागील तीन वर्षांपासून येथील हा तलाव भरलेलाच आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या तलावात पाणी होते. परंतु ओढे नाले पावसाअभावी कोरडेच होते. येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते की काय अशी भिती शेतकरी वर्गातून होती. परंतु परतीच्या या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी गेले काही दिवस सुरु असणाऱ्या या पावसाने घरांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. घेरडी तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागल्याने ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.
संपूर्ण सांगोला तालुक्यातच या पावसाने कहर केला असून घेरडी सह पारे, हंगिरगे, नराळे, डिकसळ, जवळा, कडलास, वाणीचिंचाळे, वाकी, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव या गावातील ओढे-नाले, ताली,बंधारे,तलाव पाण्याखाली आले आहेत.
ब्रिटिश कालीन घेरडी तलाव तुडुंब भरून वाहत आहे. शेत शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता सर्वजण हवालदिल झाले आहेत. पावसाने घरांचे, पिकांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. आधीच दैना झालेल्या या रस्त्यांची पार दाणादाण उडाली आहे
यापूर्वी झालेला पाऊस व या पावसाने नद्या, ओढे, नाले, तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. संपूर्ण परिसर जलमय झाला असून अनेक ठिकाणी रस्त्यावरून व पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील खोळंबली होती.
हा तलाव भरला असला तरी याच मार्गावरील सर्वच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले आहेत. डिकसळ, पारे, घेरडी सह अन्य गावातही चांगला पाऊस झाल्याने येथील ही ओढे,बंधारे , ताली भरून वाहत आहे. अनेक ठिकाणीं पाझर लागले आहेत. ज्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने सांगोला तालुक्यात हाहाकार माजविला आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.माणसाबरोबर जनावरांचेही हाल सुरू आहेत.
शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, “एकदम ओक्के” म्हणत कोल्हापूरकरांनी डिवचले!