ग. दि. माडगूळकर; माणदेशातील प्रतिभासंपन्न थोर साहित्यिक

आज पद्मश्री ग. दी. माडगूळकर स्मृतिदिन

Spread the love

‘आधुनिक वाल्मिकी’ अशी ज्यांना बिरुदावली मिळाली, ते लोकप्रिय गीतकार ग.दि.माडगुळकर अर्थात आपले गदिमा, यांचा आज स्मृतिदिन. संवेदनशील कवी, लेखक, अभिनेते यापलीकडे समाजभान राखणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व अशी गदिमांची ओळख सबंध महाराष्ट्राला परिचयाची आहे. त्यांचे अनेक किस्से आपण ऐकले, वाचले असतीलही. परंतु, गदिमा हे नाव उच्चारताच ओघाने शब्द येतो, तो ‘गीतरामायण.’ प्रासादिक काव्यपुष्पांचा नजराणा.

थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
गदिमांना जन्मताच मृत घोषित करण्यात आले होते. लहान मूल असल्यामुळे दफनासाठी खड्डाही खोदण्यात आला, पण सर्वात वर बसलेल्या पटकथाकाराची ‘पटकथा’ सुरु होण्याआधीच संपेल कशी. गदिमांच्या जन्माची रंजक कथा.

आपल्या संस्कृतीत ‘व्दिज’ (दोन जन्म) ही संकल्पना आहे. आपण प्रथम मातेच्या पोटातून गर्भअवस्थेतून जेव्हा बाहेर येतो तो आपला पहिला जन्म, पुढे वर्णानुसार माणूस जेव्हा ज्ञान, शिक्षण, संस्कार प्राप्त करतो व आपली खरी ओळख करुन घेतो तो त्याचा दुसरा जन्म मानला जातो म्हणून आपण ‘व्दिज’. गदिमा स्व:ताला ‘त्रिज’ म्हणायचे कारण त्यांचा तीनदा जन्म झाला होता.

त्यावेळचा सातारा तर आत्ताच्या सांगली जिल्हातले ‘शेटफळ’ हे गदिमांचे आजोळ. हे गाव गायकवाडांचे, अस्सल मराठी वस्ती. गदिमांचे आजोबा (आईचे वडील) त्या गावचे कुळकर्णी.

गदिमांच्या आधी सर्वात मोठी बहिण, नंतर झालेला मुलगा पाळण्यातच वारला त्यामुळे गदिमांच्या आईने नुसती खडी साखर खाऊन सोळा सोमवार केले, मुलगा झाला पण तो जन्मताच मेलेला.

१ ऑक्टोबर १९१९ रोजी हवा बिघडलेली होती, जोरात पाऊस पडत होता. माणदेशात पाऊस दुर्मिळ तिथे अशी कथा प्रचलित आहे की ‘राम-लक्ष्मण-सीता’ वनवासात असताना तिथे आले होते व झाडाखाली जेवायला बसले, तितक्यात पाऊस आला, रामाला राग आला व त्याने जो बाण मारला त्यानंतर माणदेशात जो पाऊस गायब झाला आहे तो आजगायत.

लाडकी लेक ‘बनूताई’ प्रसूती वेदना सोसत होती, बाहेर चिंताक्रांत वडिल (गदिमांचे आजोबा) फेर्‍या मारत होते. त्या काळात प्रसुती घरातच होत असत व हे काम बेमालूमपणे सुईणी किंवा गावातली जाणती स्त्री करत असे.

प्रसूती करणारी प्रौढ स्त्री बाहेर आली, कोणीतरी अधिरपणे विचारले, “काय झालं?”

“झालं, पण देवाने दिलं ते कर्मानं नेलं!”

“व्यंकोबाची मर्जी” असे म्हणत गदिमांचे आजोबा उठले.
“बाळंतिणीला सांभाळा, तो मासांचा गोळा परसदारी निजवून टाका.”

परसदारी खोरी-कुदळी वाजायला लागल्या, खड्डा तयार होऊ लागला. आईला अजून पूर्ण जाग आली नव्हती. इकडे मात्र म्हातारी सुईण मात्र चिंताक्रांत झाली होती. बाजेवरचे पोर तासाभरात मातीखाली दडपले जाणार होते. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने शेगडीसाठी केलेला विस्तव तव्यावर घेतला आणि बाळाच्या बेंबीजवळ नेला, आणि काय आश्चर्य बाळाने टाहो फोडला “कोहम कोहम…”

“मूल जिवंत आहे… मूल जिवंत आहे…”

सगळी कडे आरडाओरडा झाला, गावभर आरोळी उठली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. दफनासाठी खणलेला खड्डा धरणीला आस लागू नये म्हणून जिंवंत कोंबडयाने बुजवण्यात आला, आणि गदिमांचा पुनर्जन्म झाला. गदिमा ‘त्रिज’ झाले. “गजाननाची” पटकथा आत्ता तर सुरु झाली होती, कारण पुढे एक महाकवी जन्माला येणार होता.

गदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक पानेसुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व. “ज्योतीने तेजाची आरती” या उक्तीनुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर…

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक, कलाकार, मराठी माणूस; ज्यांना ‘गदिमा’ या लाडक्या नावाने ओळखतो. जवळच्या मित्रांचे ‘अण्णा’ तर आम्हा नातवंडांचे ‘पपा आजोबा’ अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि. माडगूळकर.

गदिमांचा जन्म ‘शेटफळे’ या त्यांच्या आजोळी झाला, तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीमध्ये ‘माडगुळे’ या गावात गेले. गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते. वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरवातीला ब्रम्हचारी, ब्रँडीची बाटली सारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या (Extra Artist) भूमिका केल्या. भक्त दामाजी (१९४२) व पहिला पाळणा (१९४२) चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. लोकशाहीर रामजोशी (१९४७) चित्रपटापासून खर्‍या अर्थाने कथा, पटकथा, संवाद, गीते ग.दि. माडगूळकर असा ब्रॅंड निर्माण झाला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत ‘अनभिषक्त सम्राटपद’ निर्माण केले. मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला.

मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये रामजोशी, वंदे मातरम, पुढचे पाऊल, गुळाचा गणपती, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊनपाऊस, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, प्रपंच, मुंबईचा जावई, देवबाप्पा सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.

मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान अजोड आहे. त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. प्राचीन मराठी काव्याला अर्वाचीन काळात गदिमांनी अधिक समृद्ध केले. संतकाव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांचा स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील मनाला भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून गदिमांची गीते निर्माण झाली.

*संकलन – इंटरनेट

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका