ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर यांचे अपघातात निधन
कडलास गावात हृदयद्रावक अपघात
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील कडलास गावच्या रहिवाशी तसेच बुरंगेवाडी गावच्या आदर्श ग्रामसेविका स्वप्नाली सुनील सोनलकर (रूपनर) यांचा सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कडलास गावाजवळ ट्रेलरचालकाच्या चुकीच्या ड्रायव्हिंगने अपघातात बळी गेला. घटना एवढी भीषण होती की सोनलकर यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर ह्या कडलास गावच्या सुनबाई होत्या.
हा अपघात हृदय हेलावून टाकणारा होता. ट्रेलर चालकाने पाठीमागून जोराची थडक दिल्याने ग्रामसेविका सोनलकर यांचे जागेवरच निधन झाले. यामुळे संपूर्ण कडलास गाव हळहळ करीत आहे.
ग्रामसेविका सोनलकर या सांगोला पंचायत समितीतील आपले कामकाज आटोपून नुकत्याच घरी चालल्या होत्या. त्याच दरम्यान सांगोलाहून जतकडे जाणाऱ्या ट्रेलरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने सोनककर मॅडम यांचे जागेवरच निधन झाले.
स्वप्नाली सोनलकर ह्या डिसेंबर 2008 मध्ये आपल्या ग्रामसेविका पदावर जॉईन झाल्या होत्या. प्रारंभी त्यांनी आगलावेवाडी, त्यानंतर गौडवाडी ग्रामपंचायतीत सहा वर्षे ग्रामसेविका म्हणून काम केले होते. त्यांनीं काम करण्याची पद्धत वेगळीच असल्याने त्या आदर्श ग्रामसेविका ठरल्या होत्या.
ज्यावेळी त्यांची गौडवाडीतून बुरंगेवाडीला बदली झाली त्यावेळी सगळा गाव रडला होता. तर गावानेच या कुटुंबीयांचा सत्कारही केला होता. सध्या त्या बुरंगवाडी येथे मागील सात महिन्यांपासून कार्यरत होत्या. याच ग्रामपंचायतीची माहिती पंचायत समितीला देण्यासाठी गेल्या असता घरी येताना त्यांना या वाहनाने कडलास गावाजवळ चिरडले.
सायंकाळच्या दरम्यान अपघात घडल्याने, मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. हा अपघात घडल्यानंतर ट्रेलर चालक ट्रेलर घेऊन पळून गेला होता. गावातील युवकांनी पाठलाग करून त्याला पकडले.
सोनलकर यांच्या पश्चात पती, एक चौदा वर्षाची मुलगी अन् सहा वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या या निधनाने पंचायत समितीमध्ये शौकाकळा पसरली असून अनेक महिला ग्रामसेवकानी अश्रुला वाट मोकळी करून दिली.
असा घडला अपघात
आपले काम संपवून एम एच 45 वाय 3043 या स्कुटी वरून कडलास येथे कामावर जात असताना अचानक सांगोलाकडून जतकडे जाणाऱ्या एन . एल .01 ए.इ. 1629 या क्रमांकाच्या कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने स्वप्नाली सोनलकर या स्कुटी वरून रस्त्यावर पडल्या व कंटेनरचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने स्वप्नाली सोनलकर या गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अजित उत्तम अनुसे वय 30 टा . कडलास यांनी कंटेनर चालक प्रवीण परमेश्वर पवार वय 24 रा . तांबोळे ता . मोहोळ याने त्याचे ताब्यातील कंन्टेनर भरधाव वेगात चालवून स्कुटीस ओव्हरटेक करून स्कुटीला जोराची धडक दिल्याने स्कूटी वरील स्वप्नाली सोनलकर यांना खाली पाडुन कंन्टेनरचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने स्वप्नाली सोनलकर या गंभीर जखमी होवुन जागीच मयत होणेस कारणीभुत ठरला व कंटेनर चालकाने आपले ताब्यातील वाहन आपघाताचे ठिकाणी न थांबवता तसाच पुढे घेऊन निघुन गेला आहे म्हणुन कंन्टेनर चालक प्रविण परमेश्वर पवार रा . तांबोळे ता . मोहोळ याचे विरुध्द फिर्याद दाखल केली आहे तपास पो.कॉ अवताडे करीत आहेत .