ग्रामसभेत मतदारयादीचे वाचन होणार

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : सोलापूर  मतदारयादीची चाळणी करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2021 रोजी तालुकानिहाय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये मयत, स्थलांतरीत, आढळून न येणारे मतदार यांच्या याद्याचे वाचन होणार आहे. तालुका निहाय प्राप्त मयत मतदार याद्याचे वाचन करून मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने श्री. शंभरकर यांनी बहुउद्देशिय सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार निवडणूक अमरदिप वाकडे उपस्थित होते.

श्री शंभरकर म्हणाले की, या विशेष मोहिमेमध्ये सर्व मतदार केंद्रावर दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2021 तसेच 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी फॉर्म स्वीकारण्यासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांचा शोध घेवून त्यांना मतदार यादीत चिन्हांकित करणे, व्हीआयपी यांची नावे मार्क इलेक्टर म्हणून चिन्हांकित करणे, तृतीयपंथी मतदारांचा शोध घेवून त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, त्याचबरोबर तालुकास्तरावर नगर परिषद, नगर पालिका व ग्रामीण भागात ग्रामसेवक यांच्या सही शिक्याने मयत मतदारांच्या याद्या झाल्या आहेत. शहरी भागामध्ये महानगरपालिका यांचेकडून मयत मतदारांच्या याद्या प्राप्त करून घेण्यात येत आहेत.

दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली असून, ज्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता त्यांनी संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय व उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध असून त्यांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी . जर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नसल्यास संबंधित तहसिल कार्यालयामध्ये जावून सदर अर्जाची चौकशी करावी. आपला अर्ज नामंजूर करण्यात आला असेल तर नव्याने नमुना अर्ज क्र 6 भरावा असे, आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

मतदार यादीतील नाव शोधणे व नाव नसलेस www.ceo.maharashtra.gov.in, व www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या करीता जिल्ह्यातील मोठ्या मंदीरामध्ये संस्कार भारतीच्या मदतीने रांगोळी काढण्यात येणार आहे. गॅस सिलेंडरवर क्यूआर कोड देण्यात आला असून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी यंदाच्या दिपावली उत्सवाच्या निमित्ताने लोकशाही दिपावली स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती श्री शंभरकर यांनी दिली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका