गौतमी पाटीलला बघून पोरं पेटली, महुदाच्या जत्रंत राडा
सांगोला / नाना हालंगडे
आपल्या बेधुंद अदाकारीनं लाखो लोकांना घायाळ करणाऱ्या डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महुद (ता. सांगोला, जि. सोलापूर) इथं राडा झालाय. गौतमी पाटीलच्या दिलखेचक अदा पाहून बेधुंद झालेल्या तरुणाईत वादाची ठिणगी पडली आणि दोन गटातील तरूणांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांना तिकडे धाव घ्यावी लागली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगोला तालुक्यातील महुद येथे बुधवार, ७ डिसेंबर रोजी खंडोबा यात्रेनिमित्त डान्सर गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कऱ्यक्रंत अज्ञात तरुणांनी गोंधळ घातला असल्याची फिर्याद सांगोला पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे. या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात तब्बल ४ हजार लोकांचा जनसमुदाय महुद येथे जमला होता.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत अशी अल्पावधीत ओळख प्राप्त केलेल्या गौतमी पाटील यांचा ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी महूद ता सांगोला येथे खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
रात्री ७.३० वा. हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाला महुद आणि परिसरातील तब्बल ३ ते ४ हजार लोक एकत्रित जमले होते. कार्यक्रमादरम्यान अचानक रात्री ८.३० च्या सुमारास स्टेजच्या समोर बसलेल्या तरुणांमध्ये आरडाओरडा सुरू असल्याचे लक्षात आले. दोन गटात अज्ञात कारणावरून वाद निर्माण झाला होता.
दोन्ही गटातील अंदाजे ३ ते ४ जण परस्परांच्या अंगावर धावून जात होते. दरम्यान या ऑर्केस्ट्रासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने तात्काळ येथील ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी मदतीने हा वाद संपुष्टात आणला.
दरम्यान पोलिसांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील तरुणांची नावे विचारले असता दोन्ही गटातील एका गटातील ३ ते ४ व्यक्ती तर दुसऱ्या गटातील २ ते ३ व्यक्ती गर्दीचा व अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस नाईक धुळदेव चोरमुले यांनी दोन्ही गटातील अज्ञात व्यक्तीविरुद्ध सांगोला पोलिसात भा.द.वि. कलम 160 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गावात वादाची परंपरा
या गावात यात्रेच्या वेळी वाद होणे हे नेहमीचेच झाले आहे. मागील काही वर्षांपूर्वी सुप्रसिध्द चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांनाही यात्रेनिमित्त बोलावण्यात आले होते. त्याहीवेळी भर कार्यक्रमात राडा झाला होता.
गौतमी पाटीलचा प्रवास
गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली.
आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले. पुण्यात स्थिरावल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न तिने केला. पण दारुचे व्यसन, आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचे ती सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचे ती मान्य करते.
गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळाले होते.
पुण्यात गौतमीने जास्त कार्यक्रम केले. पण कौल्हापूरमध्ये तिने जास्त शो केले. तिथल्या प्रेक्षकांकडून आपल्याला जास्त प्रेम मिळाल्याचे ती सांगते.
घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्याकडे वळल्याचे ती सांगते. सुरुवातील ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. काही दिवसांपुर्वी अश्लिल डान्स प्रकरणी गौतमी पाटीलवर टीका करण्यात आली होती.
भन्नाट व्हिडिओ