गुवाहाटीफेम शहाजीबापूंमुळेच वर्ष गाजले
शेकाप, राष्ट्रवादीने दिला जनतेला आधार
स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
राज्यात महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर जे काही नाट्य घडले त्यामध्ये सांगोल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांची जी भूमिका होती, ती राज्यात नव्हे देशातही चर्चेत राहिली आहे. सध्या नव्या पिढीला सांगोला म्हटले की, शहाजीबापू हे समीकरण डोळ्यांपुढे येते. हे सर्व खरे असले तरी जेव्हा जेव्हा सांगोल्याचे नाव निघेल तेव्हा तालुक्याचे शिल्पकार, माजी आ.गणपतराव देशमुख, माजी आ. काकासाहेब साळुंखे-पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
सांगोला तालुका विविध कारणाने पहिल्यापासूनच चर्चेत आहे. जसा भाई गणपतराव देशमुख यांचा विजयाचा विक्रम तसा शहाजीबापूंचा हरण्याचाही विक्रमच. पण येथे बापूंनीही जिद्द सोडली नाही. 2019 मध्ये निवडणूक जिंकून बापूंनीही सांगोल्याच्या नावाची चर्चा घडवून आणली.
फूट पडल्यानेच नशीब फळफळले
शहाजीबापू तसे सरळमार्गी. सतत पराभव पत्करूनही त्यांनी तालुक्यात कधी गुंडागर्दीचे राजकारण केले नाही. २०१९ च्या निवडणुकीत अगदी काठावर पास झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बापू फारसे चर्चेत नव्हते. अगदी अडगळीत पडल्यासारखी त्यांची स्थिती होती. २०१९ च्या पूर्वी तर बापूंची एखादी बातमी छापून यायला दोन दोन महिने लागायचे. प्रसिद्धीचा झोतच नव्हे तर साधी किरणांची तिरीपही त्यांच्या जवळ येत नव्हती. विरंगुळा म्हणून बापूंना हभप बनून पारायणे देऊन मन रमवावे लागत होते. महाविकास आघाडीत फूट पडली आणि बापू चर्चेत आले. त्यांचे नशीबच फळफळले.
पॉलिटिकल एंटरटेनमेंट
लोकांना मनोरंजन नेहमीच आवडत आले आहे. नट, नट्यांचे उघडे-नागडे नाचणे, थिल्लर विनोद याला तर तुफान मागणी असते. अलीकडील काळात काही वर्षांपासून पॉलिटिकल एंटरटेनमेंट ही नवीन आवड लोकांमध्ये रुजू लागली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास राजकारणी लोकांकडून होणारे मनोरंजन. ना. रामदास आठवले हे यात अग्रभागी. आता त्यांच्याही पुढे जाऊन बापू हे पॉलिटिकल एंटरटेनमेंटचा बादशाह बनण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुवाहाटीच्या डायलॉगमुळे बापू चर्चेत आले एवढेच नव्हे तर त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या कामांसाठीचा निधी खेचून आणला आहे.
सार्वजनिक बांधकाम व जिल्हा बांधकाम विभागातील रस्ता दुरुस्तीसाठी २०० कोटी , पंतप्रधान सडक योजनेच्या कामांसाठी ६० कोटी , नीरा उजवा किमी ८७ ते किमी १०२ कालव्याच्या कामांसाठी ७० कोटी , नवीन रेस्ट हाऊस कामासाठी २ कोटी २० लाख , नगरपालिकेच्या विविध कामांसाठी ५० कोटी , शिरभावी पाणीपुरवठा योजनेसाठी ३०० कोटी , जलजीवन मिशन अंतर्गत सर्व गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी १०० कोटी , तालुक्यातील सर्व प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीसाठी १४.५० कोटी , महूद येथील धान्य गोदामाकरिता ५.५ कोटी , उजनीच्या दोन टीएमसी पाण्यासाठी स्व . बाळासाहेब ठाकरे योजनेला ३०० कोटी ( मंजुरी अंतिम टप्प्यात ) , शहरातील भुयारी गटारी योजनेसाठी १५० कोटी ( मंजुरीच्या अंतिम टप्प्यात ) अशी कामेही यामध्ये आहेत.
सांगोल्यात नवीन औद्योगिक वसाहतीची मागणी त्यांनी केली आहे. टेंभू , म्हैसाळ व उजनीच्या रखडलेले प्रकल्पांना निधी मंजूर झाल्याचेही बापू सांगतात. आमदारांच्या प्रसिद्धीमुळे तालुक्यातील प्रश्नांना व सुविधांनी प्रसिद्धी मिळते अशी स्थिती आहे. आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा विकासकामांसाठी एकत्रित पाठपुरावा होत असल्याने काही कामे गतीने होताना दिसत आहेत.
दीपकआबांचे रस्त्यासाठी आंदोलन
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला – कडलास रस्त्यावरील माण नदीजवळील प्रलंबित रस्त्यासाठी आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाकडून दीपकआबाना हे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र आजतागायत हे काम सुरू झाले नाही. हे काम नव्या वर्षात पूर्ण होईल अशी आशा आहे.
सांगोला तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायट्यावर सत्ता कायम ठेवण्यात दीपकआबा यशस्वी झाले. दीपकआबा आणि शहाजीबापूंनी महावितरणच्या जाचा विरोधात आवाज उठविला.
दीपकआबांच्या मातोश्री तथा माजी आमदार कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या सुविद्य पत्नी हभप शारदादेवी (काकी) यांच्या निधनाने हे वर्ष तालुकावासियांसाठी दुःखद ठरले.
शेकापने पुसले बळीराजाचे अश्रू
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख हे सक्रियपणे काम करताना दिसतात. सरत्या वर्षात डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी वीज वितरण कंपनी विरोधात विराट मोर्चा काढून वीज तोडणी थांबविली. अवकाकी पावसाने नुकसान बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
यंदा खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याने तालुक्याची पैसेवारी ४५ टक्क्यांच्या निश्चित करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयाकडून पूर्ण झाली आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सुरुवातीपासून आवाज उठवून पाठपुरावा केला. गडचिरोली येथे झालेल्या शेकापच्या अधिवेशनात याबाबत ठराव करण्यात आला होता.
श्रीकांत देशमुखांच्या आंदोलनांची आठवण
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे आक्रमक आंदोलनासाठी जिल्ह्यात ओळखले जातात. मागील आठ महिन्यांपूर्वी त्यांनी विविध प्रश्नांवर आक्रमक आंदोलने केली. प्रशासन आणि जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. श्रीकांत देशमुख म्हटले की आंदोलन हे समीकरण होते. त्यांच्यामुळे अनेक प्रश्न जिल्हा, राज्य पातळीवर येत होते.
श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तेव्हापासून आंदोलनांचा आवाज लोपला आहे.
महत्त्वाच्या निवडी
सरत्या वर्षात धनगर समाजाचे आक्रमक नेते, राज्य मागासवर्ग आयोगाचे अभ्यासू सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांची शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्ष प्रवक्तेपदी निवड झाली. त्यांच्या रूपाने शिवसेनेत सांगोला तालुक्याला महत्त्वाचे प्रतिनिधित्त्व मिळाले.
पुरोगामी युवक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड झाली. ही बाबही तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी वेळोवेळी विविध प्रश्नांवर आंदोलने केली.
सरत्या वर्षात सांगोला तालुक्यात खूप काही घडले. मात्र जागेअभावी घेतलेला हा संक्षिप्त आढावा.