गुड न्यूज; २ हजार ८८ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांची घोषणा
मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
अनेक वर्षांपासून बंद असलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधिल रिक्त असलेली विविध विषयांची प्राध्यापकांची तब्बल २ हजार ८८ पदे आणि प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर झाला निर्णय
वरिष्ठ महाविद्यालयांमधिल रिक्त असलेली विविध विषयांची प्राध्यापकांची पदे भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील प्राध्यापकांची पदे भरण्याची घोषणा मागील काही महिन्यांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार ८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. त्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी
प्राध्यापक भरती प्रक्रियेत कोणतीही वशिलेबाजी, पैशांचे व्यवहार होऊ न देता ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे. महाविद्यालय स्तरावर संस्थाचालकांचे खिसे गरम करून आपली पोळी भाजली जाते हे सर्वश्रुत आहे. कोरोना काळात अनेक खासगी शिक्षण संस्था चालक आर्थिक डबघाईत असल्याचे दिसते. ही कसर भरून काढण्यासाठी या भरती प्रक्रियेत गोलमाल होऊ शकतो. त्यामुळे पारदर्शीपणे व विनावशिला ही प्रक्रिया पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.