थिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी

गणेशोत्सवातील 21 प्रकारच्या पानांचे महत्त्व

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे

गणेश उत्सवास 31 ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून,आज 4 था दिवस आहे.उद्या पाचवा दिवस असून,बरेच गणपती यांचे विसर्जन करण्यात येणार आहे.गणेश पूजनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पानाबद्दल काय म्हणते आयुर्वेद? काय आहेत याचे फायदे.

*१. अगस्ती(हादगा)*
प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असते. अ जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

*२. अर्जुन*
अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. ‘अर्जुनारिष्ट’ हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

*३. आघाडा*
आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

*४. कण्हेर*
कण्हेर हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

*५. केवडा*
केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

*६. जातिपत्र*
जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

*७. डाळिंब*
चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो.

*८. डोरली*
डोरलीसारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

*९. तुळस*
तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

*१०.दूर्वा*
गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

*११.देवदार*
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

*१२.धोत्रा*
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

*१३.पिंपळ*
पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

*१४.बेल*
बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

*१५.बोर*
बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

*१६.मरवा*
मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

*१७.मधुमालती*
मधुमालती म्हणजे मालती ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

*१८.माका*
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ‘केश्य गुणधर्म’. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

*१९.रुई*
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

शहाजी पाटील हे शिंदे गटाचे “जॉनी लिव्हर”

*२०.विष्णूक्रान्ता*
विष्णूक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

*२१.शमी*
शमी हा शब्द ‘शमयति रोगान् इति’ म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.

खवासपूरच्या सिद्धेश्वर जरे यांची मका राज्यात अव्वल

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका