गँगस्टर विकास दुबेवर निघतोय हिंदी चित्रपट
ट्रेलर झाला रिलीज, अडिच लाख व्ह्यूज
पोलिसांच्या चकमकीत काही दिवसांपूर्वीच मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे याच्या जीवनावर आधारित “प्रकाश दुबे कानपूरवाला” हा चित्रपट लवकरच रिलीज होतोय. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
गोल्डन बर्ड पिक्चर्स निर्मित हा चित्रपट आहे. अभिनेता प्रमोद विक्रम सिंह, जो मारलेला गँगस्टर विकास दुबेसारखा दिसत आहे, तो या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.
या चित्रपटात आणखी एक गुंड अमर दुबे हा समर या नावाने दाखविण्यात आल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरवरून दिसत आहे.
हा चित्रपट आकाश सिंह गहरवार हे दिग्दर्शित करत आहेत.
यु-ट्यूबवर या चित्रपटाचा ट्रेलर अपलोड करण्यात आला असून आतापर्यंत अडिच लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिल्याचे दिसत आहे.
उत्तरप्रदेशात होती विकास दुबेची दहशत
कुख्यात गुंड विकास दुबे याची उत्तरप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत दहशत होती. त्याच्या विरोधात पोलिसांत विविध गुन्हे दाखल झाले होते. तो अनेक दिवस फरार होता. ९ जुलैला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. १० जुलै रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी घेऊन जात असतानाच पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. याची संधी साधत दुबे याने पोलिसांकडील शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात दुबेचा खात्मा झाला.
विकास दुबेवर उत्तर प्रदेशात विविध पोलिस ठाण्यात साठहून अधिक विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडा, खूनाचा प्रयत्न, अपहरण, वाळू उत्खनन, बेदम मारहाण आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.
तो पोलिसांना गुंगारा देत अनेक वर्षे कारनामे करीत राहिला. त्याच्याबाबत माहिती देणा-यास पाच लाखांचे बक्षिस पोलिसांनी जाहीर केले होते.