खा. शरद पवार सांगोल्यात; गणपतराव देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना झाले भावूक
सांगोला (निखिल काटे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी सांगोला येथे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आबासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना खा. शरद पवार हे भावूक झाले होते.
यावेळी खा. पवार यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, बळीरामकाका साठे यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
प्रारंभी खा.पवारांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिवंगत देशमुख यांच्या पत्नी श्रीमती रतनबाई देशमुख यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली. यावेळी आबासाहेबांचे सुपूत्र चंद्रकांतदादा देशमुख, पोपटराव देशमुख, नातू डॉ. अनिकेत व डॉ. बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
हेही वाचा
गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ डिकसळमध्ये साकारणार ‘भाईंची देवराई’; १० ऑगस्ट रोजी शुभारंभ
सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ
खा. पवारांची शेवटपर्यंत साथ
तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना खा. पवार यांनी शेवटपर्यंत साथ दिली. गणपतराव देशमुख आणि खा.शरद पवार यांचे खूप स्नेहाचे संबंध होते.
आठवणींना उजाळा देताना भावूक झाले खा. पवार
कै. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर खा. शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आबासाहेबांसोबत अनेक वर्षे काम करता आले. सर्वच विषयांत त्यांचा गाढा अभ्यास होता. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या प्रश्नांबाबत ते सतत आग्रही असायचे. त्यांनी सांगोला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सर्व शेकाप कार्यकर्त्यांवर अाहे, असे खा. शरद पवार म्हणाले.