खरीप पिकांना हमीभाव दिला तरच शेती टिकेल
जागतिक अन्नदिन विशेष
सांगोला : डॉ. नाना हालंगडे
गतवर्षापासून सांगोला तालुक्यात खरीप हंगामात वाढ झाली असून, बाजरी बरोबर मका व अन्य पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. तालुक्यात खरीप हंगामाचे क्षेत्र 32 हजार 516 हेक्टर असून, आतातर पूर्व मौसमी पावसाने मागील चार दिवसांपासून कहरच केल्याने सांगोला तालुका गारेगार झालेला आहे. पण खरीप हंगामातील बाजरीचे पिके मात्र तालुक्यातील ठराविकच गावांमध्ये घेतली जातात. मका व अन्य पिके मात्र मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पण खरीप हंगामातील या पिकांना योग्य असा हमीभाव मिळत नाही.
आता खरीपाच्या हंगामासाठी तालुक्यातील बळीराजाने पेरणी केली धान्य काढले पण भाव नाही,हाच माल कवडीमोल भावाने विकला. आत्ता रब्बी हंगामाची तयारी जोमाने सुरू असून, यामध्येही पाऊस, आडकाठी अनित आहे,ठानबंदीमुळे तर, अनेकांनी आपल्या शेतीची मशागत चांगल्या प्रकारे केली असून, शहरी भागातील लोकही गावाकडे येवून शेती कसत असल्याचे पहावयास मिळत आहे.
कोणत्याही कंपनी उत्पादनाचे दर, उत्पादन वादीचा पूर्ण खर्च, पॅकीग, वाहतुक विक्री, शासनाचे विविध कर, गुंंतवणुक तसेच खेळत्या भांडवलावरील व्याज, घरच्या बाहेरांच्या मजुरांची मजुरी असा संपूर्ण खर्च आणि त्यावर 50 टक्क्यांपर्यत नफा ग्रहीत धरून ठरविले जातात. असे दर ठरविण्याच्या अधिकार उत्पादकांनाच असतो. शेतीव्यवसायाचे मात्र याउलट आहे. शेतातील उत्पादनाचा भाव ठरविण्याच्या अधिकार शेतकर्यांना नाही.
खरीप, रब्बी, हंगामातील हमीभावाच्या कक्षेतील नगदी पिके, अन्नधान्य पिकांचा भाव केंद्र सरकार जाहीर करते. असे हमीभाव जाहीर करताना शेतीमालाचा संपूर्ण उत्पादनाचा खर्च देखील लक्षात घेतला जात नाही. जाहीर केलेल्या अशा भावाचा बाजारात आधार मिळत नाही. हंगाम कोणताही असो शेतकर्यांचा शेतीमाल बाजारात यायला सुरूवात झाली की, दर पडतात. शेतीमालास हमीभावाचा आधार देण्यासाठी बाजार समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर हमीभाव देण्याचे कायद्याने बंधन आहे. परंतु एफ.एच.ओ. च्या नावाखाली बहुतांश शेतीमालास हमीभावापेक्षा कमी भावातच त्याची खरेदी केली जाते. अधिक गंभीर बाब म्हणजे पेरणी करतानासुध्दा उत्पादित शेतीमालास काय दर असेल, याची माहिती शेतकर्यांना नसते. यावर्षी चांगल्या आणि वेळेवर पावसामुळे शेतकर्यांनी खरीप पिकांचे नियोजन केलेेले आहे. असे असताना अजुनही खरीप पिकांचे हमीभाव मात्र जाहीर झालेले नाहीत. देशभरातील शेतकर्यांना हमीभावाची प्रतिक्षा लागून राहिलेली आहे.
शेतकरी आपल्याकडील उपलब्ध शेतीक्षेत्र जमीनीचा प्रकार, पाण्याची सोय, इतर संसाधने तसेच पडणारे पाऊसमान यानुसार पिकांचे नियोजन करीत असतो. शेतीमालास बाजारपेठ कुठे मिळेल. तसेच त्यास दर काय मिळतील? याचाही विचार व पिकांची लागवड पेरणी करताना केलेला असतोच आज काल तर शेती अधिक भांडवली आणि व्यावसायिक झालेली आहे. अशावेळी उत्पादित शेतीमालास दर काय असेल? याची माहिती शेतकर्यांना हवीच आहे. हंगाम पूर्ण खरीप लागवडीला सुरूवात झालेली आहे. तरी अजून हमीभाव मात्र जाहीर झाले नसल्यामुळे त्नधान्यांवर भर द्यायचा की, कडधान्यांची अधिक क्षेत्रावर लागवड करायची की, नगदी पिकांचा फेरा वाढवायचा हा असा संभ्रम शेतकर्यांमध्ये आहे. पिकांची लागवड अथवा पेरणीपूर्वी शेतकर्यांना हमीभाव कळेल तर, शेती पिकांचे नियोजन अधिक काटेकोरपणे करता येतील. ज्या शेतीमालास अधिक भाव असेल त्यांच्या लागवडीवर भर देता येवू शकते. त्यामुळे केद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव तात्काळ जाहीर करावे. मागील अनेक वर्षापासून हमीभावात अपेक्षित वाढ झालेली नाही. यावेळी तर, कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्यावर झालेला शेतकर्यांचा खर्च शेतीमाल घरीच पडल्यामुळे शेतीमालास मिळालेले अंत्यत कमी दर, आवश्यक वस्तू उत्पादनाचे वाढलेले दर आदि कारणामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडलेले आहे. आरोग्य, आणिबाणी काळ आणि अंत्यत कठीण आर्थिक परिस्थितीतही मागील वर्षभरापासून शेतकरी शेतीमालाचे उत्पादन घेवून ते ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची पूर्ण खबरदारी घेत आहेत. अशावेळी तरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालास हमीभाव जाहीर करायला हवा. त्यामुळे देशातला तमाम बळीराजा सुखावेल या शिफारसीप्रमाणे हमीभाव मिळाला तर, शेतकर्यांचीच बाजू अधिक भक्कम होईल. पण स्वतःला जाणते राजे म्हणणारे लोकप्रतिनिधी मात्र असे हे करत नाहीत. त्यामुळे तर बळीराजा देशोधडीला मिळालेला आहे. खरीप पिकांचे हमीभाव अगोदर जाहीर केले तर, बळीराजाच्या पदरात चार पैसे जादा पडतील. याचा विचार सर्वांनीच करावा बस्स आणखी काय….
काटा मारी जोमात
आज शेतकऱ्याच्या मालाला कडलीचा भाव आहे, कडतामारी पद्धत ,मनमानी दर, प्रत्यक्षात दुकानात गेल्यानंतरचा भाव शेतकऱ्यांना मारणारा ठरित आहे,यामध्ये जवळा येथील व्यापारी अक्षर: क्षा लुटमारी करीत आहेत.
—————-
अन्न दिवसाचे महत्त्व
१६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हंगेरी चे माजी कृषी आणि अन्न खात्याचे मंत्री डॉ. पल रोमानी यांनी अन्न आणि कृषी संघटनेच्या २० व्या परिषदेमध्ये या संदर्भातील संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि जगभरात हा दिवस साजरा केला जावा हा विचार पुढे आणला. तेव्हा पासून जवळपास १५० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्या संदर्भातील उपाय योजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते. जगभर विविध इतर दिन उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी अन्न दिन महत्त्वाचा मानावा लागेल, कारण त्याचा थेट मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंध आहे.
अन्न सुरक्षेबाबतची एकंदर परिस्थिती पाहता अन्न दिनाबाबत जागरूकता वाढीस लागण्याची गरज आहे. अन्नधान्य मुबलक मिळायला हवे, मात्र ते स्वस्तातच हवे अशी अपेक्षा दारिद्य्र रेषेखालील माणसांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच असते. मध्यमवर्गीयांना तर बाकी काही महागले तरी चालते, पण अन्नधान्य मात्र स्वस्तातच मिळायला हवे असते.
आपल्याला पगार भरपूर मिळावा, मात्र वर्षानुवर्षे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मात्र पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्याच भावात अन्नधान्य द्यावे असे या वर्गाला वाटत असते. बाजारभावाच्या निम्म्याहून कमी पैसे शेतकऱ्याच्या हातात पडतात हे वास्तवही त्यांना नीट माहीत नसते, किंबहुना ते जाणून घेण्याची निकडही त्यांना भासत नाही. तापमानवाढ, मोसमी पावसाची अनियमितता, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, खते बियाण्यांसह अन्य कृषी निविष्ठांची अपुरी उपलब्धता, बाजार यंत्रणेकडून होणारी फसवणूक अशी अनेक आव्हाने खांद्यावर घेऊन शेतकरी काळ्या आईची सेवा मनोभावे करतो आहे. तो नवी आव्हाने पेलण्यासही समर्थ आहे, पण किमान पाठीवर हात ठेवून “लढ” म्हणण्याइतके औदार्य समाजाने दाखवायला हवे.
सरकारी यंत्रणेनेही त्याच्याप्रती असलेले औदासीन्य सोडायला हवे. पीक कर्जासारख्या साऱ्या बाबींची वेळेत पूर्तता करून द्यायला हवी.
‘अन्नदाता सुखी भव’ म्हणून आपण यजमानांना दुवा देत असतो, पण खरा अन्नदाता शेतकरी आहे याचा विसर सर्वांनाच पडलेला असतो.
या जगाच्या पोशिंद्याचे कल्याण करायचे असेल तर त्याने पिकवलेल्या मोत्यांना वाजवी किंमत देण्याची दानतही समाजाने अंगी बाळगली पाहिजे. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हे आपण लक्षात घ्यावयास पाहिजे.