कोरोना संसर्गाने धडाडीच्या पत्रकाराचा मृत्यू
टीव्ही 9 चे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं निधन
पुणे : टीव्ही 9 वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्राने एक धडाडीचा पत्रकार गमावला आहे.
रायकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात विविध माध्यमांत काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. त्यांनी पुणे येथे काम करीत असताना आक्रमकपणे बातमीदारी केली. त्यांचे अनेक रिपोर्ताज गाजले. पुण्यासह महाराष्ट्रभरात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांच्या निधनाची बातमी बुधवारी भल्या सकाळी समाजमाध्यमांत झळकताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
रायकर हे 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.
दरम्यान, एबीपी माझाचे वरिष्ठ पत्रकार राहूल कुलकर्णी यांनी रायकर यांच्या निधनाची बातमी फेसबुकवर पोस्ट करीत रायकर यांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांनीही रायकर यांची ऑक्सिजन पातळी घसरल्याने त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाल्याचे फेसबुकवर म्हटले आहे. (फेसबुकचा स्क्रीनशॉट खालील बाजूस)