कोरोना योद्ध्यांच्या साथीला अद्ययावत सॉफ्टवेअर

बारामतीच्या तरुणाकडून सुविधा कार्यान्वित,  अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

बारामती (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या काळात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे सॉफ्टवेअर बारामती मधील तरुण संगणक अभियंत्याने विकसित केले आहे. रुग्णांचे सर्व प्रकारचे अहवाल एकाच वेळी एका क्लिकवर उपलब्ध होऊन शासनाला संकलित माहिती देण्याबरोबरच रुग्णालाही एसएमएस द्वारे कोरोना तपासणी रिपोर्ट या सॉफ्टवेअरद्वारे मिळणे शक्य होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामतीमध्ये या सॉफ्टवेअरचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले. स्टर्लिंग सिस्टीम प्रा. लि. या कंपनीने हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश पवार यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना योद्ध्यांच्या लढाईत आपणही काही योगदान द्यावे, त्यांच्या कार्याचा आपल्या परीने सन्मान करतानाच आपण स्वतःही त्यांच्या सोबत उभे रहावे या उद्देशाने सामाजिक भावनेतून सतीश पवार यांनी बारामती आरोग्य यंत्रणेला पूर्णतः मोफत असे हे सॉफ्टवेअर विकसित करून दिले आहे.


दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. आपल्या जीवाची तमा न बाळगता या रोगाशी दोन हात करत वैद्यकीय यंत्रणा विषाणू आणि माणसाच्या मध्ये अक्षरशः भिंत बनून उभी आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्यांचीही संख्या त्याच पटीत वाढत आहे. एकीकडे ही लढाई लढत असतानाच आरोग्य योद्ध्यांना शासनाला रोजच्या रोज संकलित माहिती द्यावी लागत आहे. बारामतीध्ये असलेल्या सर्व कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणीसाठी नोंदणी करण्यापासून ते त्यांचा कोरोना तपासणी रिपोर्ट आल्यानंतर रुग्णांना काळविणे, त्याचबरोबर रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्याच्या तब्बेतीच्या सुधारणा बाबत सर्व अहवाल मेंटेन करून ठेवणे हे सर्व काम लिखापडीच्या स्वरूपात करावे लागत असल्याने अतिशय किचकट व वेळखाऊ असे आहे.या वेळखाऊ प्रक्रियेसाठी सतीश पवार यांनी आपल्या स्टर्लिंग सिस्टिम्स प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून अत्यंत सुटसुटीत आणि आरोग्य यंत्रणेसह स्वतः रुग्णालाही ज्याचा लाभ होईल, अशी सॉफ्टवेअर यंत्रणा विकसित केली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. कोरोना विरोधात सध्या रात्रंदिवस लढत असलेले बारामती विभागातील रुई ग्रामीण रुग्णालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड सेंटर आणि बारामती हॉस्पिटल ही चार महत्वाची आरोग्य केंद्रे सध्या या सॉफ्टवेअरने जोडली गेली आहेत. त्यामुळे रुग्णांची अद्ययावत माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध झाली आहे. त्या त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अगदी सहज ही माहिती मिळत असून शासनाला दैनंदिन अहवाल पाठवणे सहज आणि सोपे होणार आहे. विशेषतः लिखापडी मध्ये जाणारा आमचा प्रचंड वेळ एकदमच कमी झाला असून रुग्णांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त वेळ देणे शक्य झाले आहे, असे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणेसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बारामती येथे या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक सादर करून ते प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात आले. सॉफ्टवेअरची माहिती करून घेताना अजित पवार यांनी खर्चाविषयी विचारले. त्यावेळी सामाजिक भावनेतून आपण हे सॉफ्टवेअर मोफत विकसित करून दिले आहे, अशी माहिती सतिश पवार यांनी दिली.

 सध्याच्या काळात आरोग्य यंत्रणेला चांगला आधार ठरू शकेल, अशी ही यंत्रणा आहे. याचा बारामतीसाठी चांगला उपयोग करावा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

 

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदतीचा हात द्यावा, त्यांच्या कार्याचा सन्मान करतानाच त्यांचे काम अधिक सोपे करण्यासाठी छोटीशी मदत म्हणून हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा स्टर्लिंग सिस्टिम्सचा हा छोटासा प्रयत्न आहे.

– सतिश पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टर्लिंग सिस्टिम्स प्रा. लि.)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका