कोरोना महामारीतून काय धडा घेणार आहोत?

डॉ. अनिकेत देशपांडे यांचा चिंतनशील लेख

Spread the love

❝ “गम की अंधेरी रात में.. दिल को ना बेकरार कर.. सुबह जरूर आयेगी.. सुबह का इंतजार कर”… खरंच आहे. दुःखाचा शेवट सुख हाच आहे. प्रत्येकाला वाटतं पहाटेच्या केशरी रंगातून पहाट यावी. प्राजक्ताच्या सड्यातून गंधीत सकाळ व्हावी. पण, अशी सकाळ हवी असेल तर शिस्तीत राहावं लागेल. निसर्गाचं लेणं ल्यायला शिकावं लागेल. प्राजक्त पायाखाली न तुडवता, गंध तसाच ठेवत, पाय उचलावा लागेल. मित्रांनो, आज काहीशी अशीच लांबलेली गम की रात आहे. कदाचित झोप उडवणारी. त्याचे काही परिणाम हे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक हे होणारच आहेत. काळजी करणं हे सोल्यूशन नसून काळजी घेणं व काळजीपूर्वक पुढे जाणं हे सोल्यूशन आहे. ही परिस्थिती आजच निर्माण झाली, असे नाही. देवी, कॉलरा, प्लेग, महामारी, इंन्फ्लुएंझा, डेंग्यू, टीबी, स्वाईन फ्लू अशा अनेक संकटांची आक्रमणं येऊन गेली. त्यावर मात करण्यासाठी जो वेळ लागला. त्यात दोन पिढ्यांनी जीव गमावला, क्वारंटाईन केलं, गावं ओस पडली. पण उपाय मिळालं. औषधं आणि प्रतिबंधक लस. पण, आज तीच बेफिकिरी आपल्यात परतलीय. आपण इतिहासातून काही शिकलोच नाही. कोरोनाच्या या महामारीतून आपण बाहेर पडूच. मात्र, सवाल हा आहे की यातून आपण काही धडा घेणार आहोत की नाही?❞

मी स्वतः…. : कारण मी असलो तरच माझं विश्व आहे. व्यायाम करणे.. खरंतर ही आवड आहे. त्यामुळे नवं काही लागलं नाही. पण या काळात अंगाचा लवचिकपणा कमी झाला आहे. त्यासाठी योग अॅडीशनल करत आहे. ही एक चांगली सवय या काळाने मला दिली आहे. वाचनाची, संगीताची व वादनाची आवड, छंद आहे. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी काय करावे? हा प्रश्न पडला नाहीच. मला वाटते प्रत्येकाने कोणतातरी छंद जोपासला पाहीजे. हा धडा आपण घ्यावा. त्याने आपण स्वतःला विसरतो व चिंतामुक्त होतो. आनंदी राहातो.

जेवण : सुदैवाने मला डायबेटिस आहे. त्यामुळे अतिरिक्त खाण्याची सवय नाही, तर बँलन्स खाण्याची सवय आहे. प्रोटीन्सचे सेवन मात्र नियमित करतो. हेच सगळ्यांसाठी कायमच उपयोगाचं आहे. ही शिकवण घेऊन तसे वागण्याचा प्रयत्न करणे ही पॉझिटिव्ह स्टेप आहे.

आर्थिक : मी आता निवृत्तीच्या वयाचा आहे. म्हणजे काम करू नये असे नव्हे. पण आर्थिक नियोजन करण्याचे वय आहे. या काळामध्ये ख-या गरजा व कृत्रिम आभासी गरजा याची जाण आणि भान आले आहे. ‘ज्याच्या गरजा कमी तो सुखी’ हा जुनाच कानमंत्र परत उपखरंच येणार आहे. नवे कर्ज घेण्याचं माझं वय नाही. त्यामुळे आर्थिक बाजूची पाठीवर देणी नसावीत, अपवाद वगळता.

नागरिकशास्त्र : हे मात्र आपल्याला कायमचे बिंबवावे लागेल, नव्हे तर तीच जीवनशैली असावी. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. पण, समाजात वावरताना इतरांना आपला त्रास वा इतरांना आपल्याकडून संसर्ग होऊ नये इतकी सुरक्षितता कायम अंगवळणी पडायला हवी. नव्या पिढीला नव्या संधी शोधाव्या लागतील. कदाचित काहीजणांची रोजी-रोटी जाईल. हे अटळ आहे पण हे कालातीत नाही, हेही संपणार आहे. संकट ही नवीन संधी असते हा दृष्टीकोन ठेऊन सकारात्मक विचार केला पाहिजे. या वादळात काही आर्थिक संस्था, बँंका अडचणीत येतील. व्याज कमी झाल्याने निवृत्तांना अडचण येईल. पण, गुंतवणूक ही खाजगी वा छोट्या ठिकाणी न करता सरकारी क्षेत्रात सुरक्षित राहील आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये केली तर सुरक्षितता वाढेल. हा काळ जास्त व्याज न बघता सुरक्षितता बघण्याचा आहे. हाही एक बदल विचारात घ्यावा लागेल. आरोग्य विमा बहुतेकदा केला असतो.. अधिक लिहण्याची गरज नाही. पण एक शिस्तबद्ध, कमी गरजांचं, शरीर तंदुरुस्तीचं, आहारविहाराचं नवं जीवन आनंदी करण्याची सवयीची संधी या करोनाने दिली आहे. हे ही नसे थोडके.

सामाजिक :
“मनाप्रमाणे जगावयाचे
किती किती छान बेत होते
कुठेतरी मी ऊभाच होतो
कुठे तरी दैव नेत होते”
– कवी सुरेश भट

दोन व्यक्तींपासून कुटुंब बनते. अनेक कुटुंबाचा समूह बनतो. अनेकदा समूहांचा समाज बनतो. सुरूवात कुटुंबापासून करणं आवश्यक. ‘छोटे कुटुंब-सुखी कुटुंब’ हा गुरुमंत्रच आहे. काहींनी जाणीवपूर्वक दुर्लक्षिलेला. या संकटकाळात आपण कुटुंब सदस्य एकमेकांच्या जास्ती जवळ आलो आहोत. हे करोनाने दिलेलं ‘ब्लेसिंग इन डिस्गाईज’च आहे. नाहीतर रोजच्या जीवनात वेळ नसायचा. पण आपली माणसं आपल्याजवळ हा भावनिक आधार आपल्याला पुढेही ठेवावा लागणार आहे. त्यासाठी रोज ठराविक वेळ गप्पा, एकमेकांचं क्षेमकुशलसाठी जाणीवपूर्वक वेळ काढणं, ही सवय पण करावी लागणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक माहिती असणं वा देणं आवश्यकच आहे. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन व जबाबदा-या यांचं भान ठेवणं गरजेचं आहे. असंही होऊ शकेल की, कुटुंबप्रमुखाची नोकरी जाऊ शकेल अथवा धंदा कमी होईल. किंवा घरातल्या एखाद्याची आर्थिक अडचण होईल त्यावेळी कुटुंबाने मनोधैर्य व आर्थिक मदत, प्रत्यक्ष कमावून वा गरजा कमी करून समजून वागावे लागेल. आणि ते धोरण कायमचे अंगिकारले तरी वाईट काहीच नाही. कुटुंबात जमेल त्यांनी काम केले पाहिजे, ही सवय लावून घ्यायला हवी. पाश्चात्य देशात मुलं काम करून, स्वतंत्र राहून शिकतात.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्यावर विचार करण्यापेक्षा काय कंट्रोलमधे आहे याचा विचार करून सकारात्मक पाऊल उचलावे लागेल. आवश्यक खर्च व अनावश्यक दिखावा याचा फरक आपण समजून मुलांनाही समजावून दिला पाहीजे. कुटुंबाच आरोग्यासाठी सुरक्षित उपाययोजना, विमा वगैरे, आरोग्य पूरक सवयी लावण्याचा हाच काळ आहे आणी तोच पुढेही उपयोगी असणार आहे.

कौटुंबिक सोहळे : यात आमूलाग्र बदल करण्याची संधी करोनाने दिली आहे. या काळात ज्यांनी पाच-दहा जणांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांना नावं नाही ठेवली गेली. तोच विचार पुढे नेला पाहीजे. विशेषतः जे लोक ऋण काढून सोहळा करतात त्यांना तरी फार चांगली शिकवण व आदर्शपण मिळाले आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी खर्च करावेत पण सामाजिक नियमांचे पालन करून. रांग व्यवस्थित लावणे, स्वच्छता राखणे हे भान ‘पोस्ट करोना’पण ठेवावे लागणार आहे.

काही समाजांनी लग्न लागल्यावर जेवण बंद केले आहे, कित्येक वर्षांपासून, फक्त चहा व शुभेच्छा हे अनुकरणीय आहे. पण लग्न समारंभात बंद असे करताना आपण सोशल इनजस्टीस करतो. कारण यावर प्रिंटींगवाला, घोडेवाला, बँडवाला, रोषणाईवाला, फुलंवाला, केटरर्स, वाढपी हे अनेकजण जगतात. त्यामुळे पूर्ण बंदपेक्षा तारतम्य वापरून करणं हे सामाजिकदृष्ट्या योग्य राहील. असे मला वाटते. माणूस एकट्याने सुखी राहू शकत नाही. आजूबाजूला सामाजिक स्वास्थ्य असेल तरच तो सुखी समाधानी असू शकतो.

सामाजिक आरोग्य : एखाद कुटुंब स्वच्छ असून चालणार नाही तर अख्खी गल्ली, गाव स्वच्छ पाहीजे तरच आरोग्य नांदेल. ही एक शिकवण या निमित्ताने राज्यकर्त्यांना मिळाली असणारच आहे. पण कचरा करणारे, इकडे तिकडे थुंकणारे आपणापैकीच आहेत. त्यामुळे आपणही तितकेच दोषी आहोत. आणि ती सुधारणा आता या निमित्ताने समाजात जागृत झाली तरी खूपच झाले. तेच प्रदूषण, ध्वनी व हवा पाणी याबाबत याबाबत नागरिक व सरकार दोघांनी जागरूक रहायला पाहिजे.

एक सत्य सांगतो,
कित्येक जणांना ध्वनीप्रदूषणामुळे ऐकू कमी येते. असे बरेच जण अँक्सिडेंटमध्ये सापडतात. कारण त्यांना हॉर्न ऐकू आलेला नसतो. करोनाच्या निमित्ताने आरोग्य सुधारणा तरी करता येईल. हवा व शुद्ध पाणी हे जर मिळवले, कठीण नाही, फक्त गंगेत नहायचं नाही. तर आरोग्याचे बरेच प्रश्न सुटतील. डॉक्टर व उपचाराचा खर्च वाचेल हे समाजालाच करायचे आहे आणी सरकारला करायला भाग पाडायचे आहे

सामाजिक सलोखा : आज आपण बघत आहोत, काही अपवाद वगळता सर्व लोक काहीना काही योगदान देत आहेत. कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देत आहेत. डॉक्टर व हॉस्पिटल कर्मचारी तर आहेतच. पण पोलीस, सरकारी आरोग्य यंत्रणा, किराणावाले, गवळी, भाजीवाले, बँक कर्मचारी, वॉटर सप्लाय कर्मचारी, अग्निशामक पथक, एम.एस. ई.बी.,  बस चालक, स्वयंसेवी संस्था हे हातात हात घालून जात,  धर्म, गांव विसरून एकमेकांना मदत करत आहेत. हेच पुढेही टिकवायचे आहे. हे यातून शिकायला हवे. या घडामोडींमुळे व आर्थिक परिणामांमुळे एक सामाजिक असमतोल निर्माण होण्याची शक्यता आहे. आज जे राव आहेत ते रंक पण होऊ शकतील. समाजात ‘एक आहे रे गट’ व ‘दुसरा नाही रे गट’ तयार होऊ शकतील आणि सामाजिक असुरक्षितता निर्माण होऊ शकते. हे आपणाला जाणीवपूर्वक टाळायला हवे. आहे रे व नाही रे दोघांनाही समान मानाची वागणूक दिली पाहिजे. आर्थिक मदत शक्य असेल तर करणे. नाहीतर त्यांच्या बद्दल अनुकंपा ठेवून सहानुभूतीने वागणे हे तरी सहज शक्य आहे. ते भिकारी नाहीत परिस्थितीचे बळी आहेत हे जरी ध्यानात घेतले तरी हरकत नाही.

धर्म ही अफूची गोळी असं माओ म्हणायचा..
आज देवळं, चर्च, मशिदी, प्रार्थनास्थळे सगळे बंद आहेत. आपलंही काही अडलं नाही. देवाचंही काही अडलं नाही. श्रद्धा व नतमस्तक तुम्ही कुठेही होऊ शकता. त्यामुळे ही संधी घेऊन धर्म घरातच ठेवावा. ही गोष्ट सामाजिक सलोख्यासाठी फार उपयोगी असणार आहे.

मला एक शेर आठवतो..
“ऐ खुदा
मुझे मस्जिदमें पीने दे
या ऐसी जगहा बता
जहॉं पे तू नहीं है”

म्हणजे.. परमेश्वर घरात आहे आणि देवत्वाचे गुण आपण माणूस म्हणून मिळवण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोख्यासाठी फार उपयोगी आहे. ज्या समाजात शांतता नांदते तीथे लक्ष्मीपण येते, उद्योग वाढतात. सामाजिक शिक्षण पद्धती. आता बरेच दिवस शाळा, कॉलेजेस बंद राहतील. शिक्षण तर चालूच राहील. माणूस अनुभवातून व परिस्थितीतून, निरीक्षणातून शिकतोच. पण विषयांची ओळखही आता नेटवरून, कमी विद्यार्थी घेऊन अंतर राखून करावे लागेल. नवनव्या शिक्षणपद्धती अंमलात आणाव्या लागतील. मुलांना कसं शिकवायचं याचा विचार न करता ते स्वतः शिकण्यास योग्य कसे होतील याचा विचार केला पाहिजे. तर या संधीचा फायदा घेतल्यासारखे होईल. या निमित्ताने एक स्वस्थ, निरोगी, संयमी समाज बनवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही करोनाची शिकवणच नाही का?

राष्ट्रीय : “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही प्रतिज्ञा आठवा. तसे आपण कितीजणं वागतो. आणि मनापासून मानतो याचं उत्तरही स्वतःलाच द्या.. ‘भारत माझा देश आहे..’ देश म्हणजे काय? एक ठराविक, सीमा अधोरेखित केलेला भौगोलिक प्रदेश.. पण आता संकट या सबंध भूभागावर आलं आहे. अपवाद सोडले तर सर्व देश एकजूटीने याचाच लढा देत आहे. हे वास्तव चित्र आहे. पण हीच संधी आहे की भारतीयत्व हा धागा धरून भारत राष्ट्र बनवणे. समान धाग्याने बांधला असलेला जो मानवी समूह असतो त्याला राष्ट्र म्हणतात. एका देशात अनेक राष्ट्रे असू शकतात. राष्ट्र या संकल्पनेला भौगोलिक सीमा नाही. देशाबाहेर राहणारे पण, भारतीयच आहेत. देश जर एकसंध संकट काळी वागत असेल, जसं युद्धजन्य परीस्थितीमध्ये, तर त्याचं भारतीयत्व धागा बनवून राष्ट्र करता येतं. सरकार देशाला, देशाचं, देशासाठी असतं.

आपण नागरिक : आज आपण शिकलो किंवा करोनाने शिकवलं. संकट समान असतंच. त्यालाच सीमारेषा नसते. आपण जागरूक, समजदार, बंधुत्व बाळगून व आदर करून एक देश एक राष्ट्र बनवू शकतो. त्याचा निकष फक्त भारतीयत्व हाच असावा. नागरिक म्हणून आपली जी कर्तव्ये आहेत त्याचे पालन करायला आतापासूनच शिकायला व शिकवायला पाहीजे. तरच सरकारला, जे आपण केलेलं आहे, योग्य पावलं, अंमलबजावणी, प्रगती साध्य होणार आहे. आता संकटामुळे काय होईल? सरकार काही धडा शिकेल? सरकारे आली गेली. पण आरोग्य व्यवस्था दयनीय होत गेली.

सध्या आपण जीडीपीच्या साधारण 1.3-4 पर्सेंट आरोग्यासाठी खर्च करत आहोत. प्रिव्हेन्शनवर खर्च न होता आजारांवर खर्च होत आहे. आपण सध्या साधारण 68 हजार कोटी इतकी कमी रक्कम संपूर्ण देशासाठी खर्च करत आहोत. दुर्दैवाने लोकांपर्यंत किती? हा वेगळा प्रश्न आहे पण तो सध्याचा विषय नाही. पण साधारण 4 टक्के जीडीपी आरोग्यासाठी खर्च व्हावा
68000×4कोटी.

ग्रामीण भागापासून बांधणी नव्याने करावी लागेल. आजारावर नव्हे तर स्वास्थ्यावर खर्च व्हायला पाहिजे. आज करोना आहे उद्या दुसरं काही.. आपण सज्जच पाहीजे. वैद्यकीय संशोधनासाठी संस्था निर्माण करणं, उत्तेजन देणं, फंडस् देणं हे व्हायला हवं. औषधांची व सामग्रीमध्ये आपण स्वयंपूर्ण नाही.. कितीही योजना आल्या गेल्या, चालू आहेत. आपण परदेशावर बरेच अवलंबून आहोत. हे सत्य डोळ्याआड करून चालणार नाही. उलटं त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

आर्थिक प्रश्न : आपण नागरिक डायरेक्ट, इनडायरेक्ट टँक्स भरतो तेच सरकार खर्च करतं. त्यामुळे टँक्स आपणही भरला पाहिजे. हे आपले कर्तव्य. पण सबसिडीची सवय न लावता लोकांना कमावून खर्च करण्याची संधी व तशी योजना सरकारला करायला हवी. ते आव्हानात्मक काम आहे म्हणून सबसिडी देऊन पळवाट काढली जातेय. आता मंदी आहेच; पण ती वाढणार हे पण स्पष्ट आहे. आता सरकारने वेगवेगळी कामे काढून खर्च वाढवला पाहीजे तरच रोजगार मिळेल. हा मार्ग मंदीत वापरला जातो. पण हा खर्च बिजली, सडक, सिंचन, दळणवळण, शिक्षण या मुलभूत क्षेत्रातच व्हायला हवा. तरचं त्याचे दीर्घ चांगले परिणाम मिळतील. शेती क्षेत्र व ग्रामीण अर्थव्यवस्था याकडे सरकारला आता जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. झालेले नुकसान व होणारा परिणाम लक्षात घेऊन अन्नधान्याची स्वयंपूर्णता करणे एक आव्हान असणार आहे. गांधींजी म्हणत होते खेडी स्वयंपूर्ण बनवा. ते योग्य होतं आणि असावं. ग्रामीण भागात बँकेतर्फे पैसे सुलभरित्या आणि योग्यवेळी मिळतील ही व्यवस्था करावी लागणार, नाहीतर शेतकरी खाजगी सावकारांकडून शोषित होऊन आत्महत्या वाढतील.

दुसरं एक नजरेस आलं आहे की, मोठ्या शहरात व महानगरांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महानगरांचे नियोजन ठरवून उद्योगांचे विकेंद्रीकरण करून जनसंख्या समतोल ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याने बरेच प्रश्न सुटतील. अर्थात त्यासाठी ब-याच ठिकाणी पायाभूत सुविधा कराव्याच लागतील. जीडीपी हा देशाच्या प्रगतीचा एकमेव इंडेक्स नाही. त्यात सरकारी सोयीने पण फरक पडतो. जीडीपी वाढला म्हणजे लोक सुखी असं चित्र जगभर दिसत नाही. म्हणून आजकाल हँपीनेस किंवा सँटीस्फँक्शन इंडेक्स मोजतात. त्यात बाजी मारलीय छोट्याशा भुतानने. सुदैवाने लॉकडाऊनमुळे नद्या ब-यापैकी स्वच्छ राहिल्यात. नदी काठी काय करावे काय करू नये यासाठी आता लोकशिक्षण आणि कडक नियम व अंमलबजावणी करण्याची वेळ आहे.

शुद्ध पाणी हा आपला हक्क आणी गरज दोन्ही आहे. ते जर स्वच्छ ठेवलं तर पाण्यापासून होणारे आजार कमी होतील.
सरकारने प्रोअॅक्टीव्ह राहण्याची गरज आहे. तहान लागली विहीर खोद.. असं आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये पाहिले आहेच.  ती यंत्रणा मजबूत करणे देखील सरकारचं उद्दिष्ट असणार आहे. भारतीयांच भारतीयत्व जपणं आणी जागृत करणं हे एक मोठं काम सामाजिक संस्थांसोबत सरकारला करायला हवे. तरच भारत एकसंध समर्थ राष्ट्र होईल.

“दुरितांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो
प्राणिज्यात..।” – ज्ञानेश्वर

कित्येक शतकांपूर्वी विश्वाचा विचार मांडणा-या ज्ञानेश्वरांना वंदन करतो. पण,  विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा..। मला लहानपणी वाचलेले आठवले. खान अफझलखान विजापूहून सैन्य काफिला घेऊन मजल दरमजल करत साधारण दोन महिन्यात प्रतापगडावर पोहचला. आज किती वेळात? आज तो निघाला असता तरी.. ब्रेकिंग न्यूज झाली असती. काही देशांनी सबूरीचा सल्ला दिला असता, काहींनी संधी समजून शस्त्रपुरवठा पण केला असता. काहींनी मध्यस्थीचा प्रयत्न करून स्वतःचे स्थान उंचावले असते. दोन्ही बाजूंनी युद्धावर प्रचंड पैसा खर्च झाला असता. टंचाई झाली असती, बेरोजगारी आणखी वाढली असती. पण नशीब महाराज 4 शतकापूर्वी होते आणि विश्व पण इतकं विस्तारलं नव्हतं. आज.. आपण विश्वाचे एक घटक आहोत.

अमेरिकेत बाजार कोसळला तर इथे कोट्यवधीचे नुकसान होते. आता माझ्यावर काय परिणाम होईल याचा विचार समाज, देश आणि थेट विश्वाशी निगडित परिणामांवर होणार आहे. जागतिक मंदी होतीच. आता ती आणखी गंभीर होणार याला भविष्यवेत्याची गरज नाही. वेगवेगळ्या देशांवर होणारा परिणाम कमी जास्त असेल इतकेच. पण सुटका कुणालाच नाही. बेरोजगारी ही मोठी समस्या येणार. त्यात परत स्वदेशी नागरिकांना प्राधान्य त्या सरकारला द्यावे लागणार. आणि बळी जाणार इतर देशातील नागरीकांचा. यात भारतही आलाच. तिथून जर लोक इकडे आले तर त्यांना सामावून घेणाऱ्या संधी इथेही कमी होणार. आणि परदेशी चलन पण कमी होणार. रुपया, डॉलरचा रेषो वाढणार आणी परदेशी शिक्षणाला जाणे पण महाग होणार, ही एक शक्यता. पण जर तीथे शिक्षणसंस्थांना अडचण आली तर विद्यार्थ्यांना काही सवलतीपण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक सामाजिक अस्वस्थता, मानसिक ताण त्या अनुषंगाने येणारे विकार हा एक सोशल प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा वेळेला संधी समजून काही देश इतर देशातील कंपन्या ताब्यात घेण्याचा किंवा त्या देशाची इकॉनॉमी आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतील. त्याचे दूरगामी परिणाम होणारच. आता पावलं उचलावी लागतील. उद्योग व शेती कशी वाढेल याचा विचार करावाच लागेल. हे संकट वैश्विक आहे. कदाचित यातून धडा घेऊन एकमेकांना सहकार्य लागणार, आपण सगळेच इंडीपेंटन्ट नसून इंटरडिपेडन्ट आहोत, याचे भानही आलं असणार आहे. कदाचित त्यामुळे सहचर्य व सहकार्य हा सकारात्मक बदलही निर्माण होऊ शकतो. पण ते काळच ठरवेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हा विचार आता विस्तारला पाहिजे. पण त्यासाठी कष्ट, क्वालिटी, किंमत या गोष्टी पाळल्यातरच. सध्यातरी इंटरनॅशनल स्पर्धेत आपण कमी आहोत. सर्वोत्तमचा ध्यास हाच गुरूमंत्र पाहीजे आणि ते ही किफायतशीर किंमतीत… तरच आपण सोनेरी दिवस पाहू आणि हा विचार आपल्या स्वतःमध्ये रुजवावा लागेल. आता युद्ध हे शस्त्र-अस्त्राने लढले जाणार नाही तर आर्थिकदृष्ट्या बलशाली तो विजेता हे असणार आहे.

जपानने महायुद्धानंतर झेप घेतली ती चांगले वर्ककल्चर वाढवून तेच आपल्यालाही लागू. करोनानंतर काही क्षेत्रं बाधीत झाली तरी नवी क्षेत्रं पण तयार होतील हे नक्कीच. त्याचा विचार करून मनुष्यबळ वापरावे लागेल ती स्किल्स डेव्हलप करावी लागतील. पण मी आणि पलीकडचा अमेरिकन एकाच सुपात आहोत हे खरं. आता अशा प्रकारच्या साथींचा वैश्विक संघटनांतून मुकाबला करण्याची आवश्यकता आहे. कारण आता आजार सर्वदूर पोहचतात. एका देशाची समस्या ही विश्वाची समस्या होते. इतकं विश्व छोटं झालं आहे. आपण आता आपल्या विश्वाच्या द्रुष्टीकोनाचा विस्तार करण्याची गरज आहे. शेवटी आपण माणसं आहोत.
या जैविक श्रुंखलेचा एक भाग आहोत. त्यामुळे त्या साखळीला आबाधित ठेवावं लागेल. तरच होमो सेपियन्स ही जमात आस्तित्वात राहील.

एकच सांगतो,
“विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकाशले..”
हा प्रकाश प्रत्येकाच्या मनी आला तर….।
सुबह जरूर आयेगी

आपण सर्वजण सुखी, समाधानी असावं ही ईशचरणी प्रार्थना..।

– अनिकेत देशपांडे, सोलापूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका