कोरोनाने टेन्शन वाढवले
९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले
थिंक टँक न्यूज नेटवर्क/ नाना हालंगडे
देशात करोनाची तिसरी लाट आल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे. केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं नसली तरी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून ( covid cases in india ) आले आहेत. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ९०, ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या ७ महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९१, ८४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत १९, १५२ जण बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत एकूण ३.५१ कोटीहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ४.८२ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २.७५ हजारांवर गेली आहे. देशात आतापर्यंत ३.३४ कोटी जण करोनामुक्त झाले आहेत. देशातील करोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.४३ टक्क्यांवर गेला आहे.
देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० इतकी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे एकूण ७९७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३३० जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत ओमिक्रॉनचे ४६५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ जण बरे झाले आहेत. देशातील ओमिक्रॉनच्या २६३० रुग्णांपैकी ९९५ जण बरे झाले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
करोना संसर्गात होणार ५ राज्यांच्या निवडणुका?
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणूक आयोग निवडणुका घ्यायच्या की नाही? यावर आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची ११ वाजता बैठक होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण हे आज निवडणूक आयोगासमोर निवडणुका होणाऱ्या राज्यांतील स्थितीचा आढावा सादर करणार आहेत. दुसरीकडे, निवडणूक आयोगानेही निवडणुका होणाऱ्या ५ राज्यांमधील तयारीचा आढावा पूर्ण केला आहे. दुसरीकडे, देशात करोनाचा संसर्ग वाढत आहे. पण निवडणूक आयोग काही निर्बंधांसह निवडणूक घेण्याच्या बाजून असल्याचं बोललं जातंय. यामुळेच येत्या काही दिवसांत ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय पक्षही निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. पंतप्रधान मोदींसह सरकारी कार्यक्रमही थांबवण्यात आले आहेत. यामुळे निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते, अशी चिन्ह आहेत.