कोरोनाचा नवा गडी आलाय… पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आमचं कसं होणार?
व्यापारी वर्गाला चिंता, पुन्हा कर्जबाजारीपणा
- कोरोनाचा नवा गडी आलाय… पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आमचं कसं होणार?
- व्यापारी वर्गाला चिंता, पुन्हा कर्जबाजारीपणा
- सांगोला तालुक्यात पहिले व दुसरे 2 लाख 28 हजार डोस पूर्ण
रविवार विशेष/ नाना हालंगडे
आता कुठं तर सुरळीत झालं असं वाटतंय.. तेवढ्यात कोरोनाचा नवा गडी आलाच.. आता परत बंद पडलं तर आमचं लय अवघड व्हईल !’ सांगोला तालुक्यात अनेक गावात आठवडे बाजार सुरू झाले असून, आठवडा बाजारात रस्त्यावर किरकोळ कपडे विकून जीवन जगणारा एक व्यापारी थिंक टँकशी आपली अगतिकता बोलून दाखवत होता.
संपूर्ण सांगोला तालुक्यातील 18 वर्षांवरील 2 लाख 58 हजार 744 लोकसंख्येपैकी पहिला व दुसरा डोस 2 लाख 28 हजार 785.जणांनी लस घेतलेली आहे.
देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून पूर्वीप्रमाणे जीवनमान सुरळीत होऊ लागले आहे. दुकाने, आठवडे बाजार, शाळा, कॉलेज संपूर्णपणे सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ‘ओमीक्रोन’ हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने संपूर्ण जगात कोरोनाच्या या नव्या विषाणूची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. भारतात बंगलोरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने, राज्य शासनाने याबाबत गांभीर्याने घेतले आहे.
त्यामुळे याबाबत सोशल मीडियावर सगळीकडे पुन्हा मेसेजेस फिरू लागले आहेत. राज्य शासन पुन्हा नव्याने काही निर्बंध घालतील का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील या चर्चेमुळे किरकोळ व्यापारी मात्र या चर्चेने त्रस्त झाले आहेत. नव्याने पुन्हा निर्बंध काही घातले तर आमचे जीवन जीवनच बिघडून जाईल असे ते आवर्जून सांगतात.
निर्बंधाबाबत भीती, मात्र नियमांची पायमल्ली
राज्य व केंद्र शासनाने कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने हळूहळू सर्वच निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र शासनाने प्रत्येक नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवर्जून सांगितले जाते. मात्र शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. दुकानदारांना व्यापाऱ्यांना निर्बंधाबाबत भीती वाटते तेच व्यापारी कोरोनाचे नियम पालन करीत नसल्याचे दिसून येतात. आठवडे बाजारात आलेल्या अनेक नागरिकांच्या साधा मास्कही त्यांच्या नाकातोंडावर दिसत नाही.
नियम पाळा, लॉकडाउन टाळा
यापुढी कोरोनाचे नव-नवीन विषाणू येणारच आहेत. परंतु नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले तर कोणत्याच विषाणूचा प्रसार होणार नाही. प्रत्येक नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेतली तर ती काळजी आपल्या गावाची, शहराची व सर्वांची काळजी घेतल्यासारखे होईल. त्यामुळे यापुढे लॉकडाउन नको असूल तर प्रत्येकांने कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे.
- ठळक बाबी
– प्रत्येक नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळवेत.
– आठवडा बाजार, दुकानात लस घेतल्याशिवाय प्रवेश देवु नये.
– मास्क नसेल तर नियतपणे दंड करावा.
– राजकीय मेळावे, सण-समारंभ, लग्नकार्य यामध्ये नियमांचे पालन होत नसेल तर कडक कारवाई व्हावी.
– कोणत्याही प्रकारे लसीकरणाची टक्केवारी वाढवावी.
– नागरिकांनी नियमांच्या सक्तीपेक्षा स्वतःची काळजी स्वतः घ्यावी.
ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत
महाराष्ट्रासाठी काळजीची बातमी आहे. राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे (First corona omicron virus patient in Maharashtra). या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्यानं या करोना विषाणूबाबत आरोग्य यंत्रणा काळजीत आहे.
ओमिक्राँन–कर्नाटकची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने?; नव्या गाइडलाइन्स जाहीर
कर्नाटक राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून आधीच्या कोविड नियमांत बदल करत नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या लॉकडाऊन सारखे कोणतेही कठोर पाऊल उचलण्यात आले नसले तरी काही बाबतीत जी शिथीलता देण्यात आली होती ती मागे घेऊन नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
भारतात ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळले. गुरुवारी ही माहिती समोर आल्यानंतर आज लगेचच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वरिष्ठ मंत्री, साथरोग तज्ज्ञ आणि प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कोविड नियम कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गाइडलाइन्स निश्चित करण्यात आल्या असून त्याबाबतचा आदेश लवकरच जारी केला जाणार आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांनी या बैठकीचा तपशील माध्यमांना दिला.
राज्यात येणाऱ्या सर्व विमान प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना पुढचा प्रवास करता येणार आहे, असे अशोक यांनी नमूद केले. निर्बंधांबाबतही त्यांनी माहिती दिली. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव, समारंभ आयोजित करण्यास १५ जानेवारीपर्यंत मनाई असेल. कोविडवरील दोन्ही लस घेतल्या आहेत अशाच व्यक्तींना आता मॉल, थीएटर, सिनेमागृह येथे प्रवेश दिला जाईल. सभा, बैठका, कोणतेही समारंभ, संमेलनं यात जास्तीत जास्त ५०० लोक उपस्थित राहू शकतात. जागेच्या क्षमतेनुसार ही संख्या मर्यादा असेल, असे अशोक यांनी सांगितले. मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालक सोबत जाणार असतील तर त्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे जे दोन रुग्ण आढळले त्यापैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेचा नागरिक होता. तो माघारी गेला आहे तर दुसरा रुग्ण स्थानिक आहे. त्याची प्रकृती आता उत्तम असून त्याच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या सर्वांचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही अशोक यांनी सांगितले.