“कोंबडी पळाली” सुसाट, अन् तेव्हापासून आनंद शिंदेंनी “कोंबडी” खाणं साेडलं

आनंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वाचा मजेदार किस्से

Spread the love

महागायक आनंद शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही मजेदार पैलू आम्ही आज खास आपल्यासाठी उलगडून दाखविणार आहोत.

महागायक आनंद शिंदे हे सिनेगीत व लोकगीत रसिकांचं लाडकं व्यक्तीमत्व. आनंद शिंदे यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीवर मात करत आजवरची वाटचाल केलीय. त्यांना मिळणारी प्रसिद्धी व झगमगाट डोळे दिपवणारा असला तरी त्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट आहेत.
आनंद शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही मजेदार पैलू आम्ही आज खास आपल्यासाठी उलगडून दाखविणार आहोत.

• … अन् कोंबडी खाणं सोडून दिलं
आनंद शिंदे यांनी शेकडो लोकगीतं गायली आहेत. यापैकीच एक गाणं म्हणजे “काेंबडी पळाली” हे होय. “कोंबडी पळाली..तंगडी धरून लंगडी घालाया लागली” या गीतानं आनंद शिंदेंना यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं. या गीतावर अवघ्या महाराष्ट्राची पाऊले थिरकली. या गाण्यामुळं “जत्रा” हा चित्रपटही हिट झाला. असं असलं तरी याच गाण्यानं आनंद शिंदेंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आनंद शिंदेंनी तेव्हापासून “कोंबडी” खाणं सोडून दिलं. ज्या “कोंबडी” गीतानं अमाप यश मिळवून दिलं त्या “कोंबडी”ला खाण्याची इच्छा होत नसल्याचं आनंद शिंदेंनी अनेक ठिकाणी मत व्यक्त केलंय.

• स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंचा वारसा
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंचा गायनाचा वारसा आनंद व मिलिंद शिंदे हे सुपूत्र नेटाने चालविताना दिसतात. प्रल्हाद शिंदेंच्या हयातीतच आनंद व मिलिंद शिंदे या बंधुद्वयाच्या जोडीने तरुणांच्या मनाला साद घातली होती. त्यांच्या लोकगीतांना त्या काळातील गीतरसिक डोक्यावर घेत होते. “जवा नवीन पोपट हा” या लोकगीतानं आनंद शिंदेंना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचविलं. हे लोकगीत जिथं जाईल तिथं गाजू लागलं. एकाच गाण्यानं धम्माल उडवून दिली. “पोपट” लोकगीताचे आजही हजारो चाहते आहेत. हे गाणं तब्बल तीन दशकानंतर आजही लग्नाच्या वरातीत, खेडोपाडी वाजताना दिसतंय.

• प्रचंड लोकसंपर्क आणि साधी राहणी
आनंद शिंदे हे इथंपर्यंत पोहोचले ते केवळ त्यांच्या प्रचंड जनसंपर्क आणि जादुई आवाजामुळेच. गाणं एेकण्याची आवड असलेल्यांपैकी “आनंद शिंदे” हे नाव एेकलंच नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. आनंद शिंदे यांचं राहणीमान साधं असलं तरी त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. ते सोन्याच्या दागिन्यांचे चाहते आहेत. असं असलं तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. महाराष्ट्रात त्यांचे लाखो चाहते आहेत. आनंद शिंदे हेसुद्धा हजारो चाहत्यांना अगदी नावानिशी आेळखतात. आग्रहाखातर चाहत्यांच्या घरी जमिनीवर बसून पाहुनचार घेतात. एवढ्या उंचीवर पोहोचलेल्या इतर सेलिब्रिटी व आनंद शिंदे यांच्यात हाच महत्त्वाचा फरक आहे.

• “नेते” आनंद शिंदे
आनंद शिंदे यांनी त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील असंख्य गीते गायलीत. केवळ गाण्यातून प्रबोधन करण्याच्याही पलिकडं जाऊन आनंद शिंदेंनी आंबेडकरी चळवळीत प्रत्यक्ष योगदान दिलंय. अनेक आंदोलनात सहभाग नोंदवलाय. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय. अनेक पुरोगामी राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीत त्यांची बसऊठ असते. त्यामुळे राजकीय नेते म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातं.

• आमदारकीचं स्वप्न
मागील काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून आनंद शिंदेंच्या नावाची शिफारस करण्यात आलीय. मात्र राज्यपालांकडून अद्याप सर्वपक्षीय नावांना मंजूरी देण्यात आली नाही. ही मंजूरी मिळताच गायक आनंद शिंदे हे “आमदार आनंद शिंदे” म्हणून आेळखले जातील.

• तिस-या पिढीकडूनही गायनाचा वारसा
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे सुपूत्र आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांनी त्यांचा गायनाचा वारसा जोमाने पुढेच नेला. स्वत:च्या कर्तबगारीवर तो अधिक वृद्धिंगत केला. लोकगीत, सिनेगीत, अल्बम, चळवळीची गिते आदी अनेक प्रकारांतून त्यांनी हा वारसा जिवंत ठेवला. आज तोच वारसा आनंद शिंदे यांचे सुपूत्र आदर्श व उत्कर्ष शिंदे पुढे नेत आहेत.

शिंदेशाही बाणा असाच गर्जत राहो.
आनंद शिंदे यांना वाढदिवसाच्या आपणा सर्वांतर्फे अगणित शुभेच्छा!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका