“कैवार” काव्यसंग्रहास मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यभूषण पुरस्कार जाहीर
कवी, डॉ. शिवाजी शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
ठाणे : थिंक टँक न्यूज नेटवर्क
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. शिवाजी शिंदे यांच्या “कैवार” या काव्यसंग्रहास ठाणे (प.) येथील मराठी साहित्य मंडळाचा “राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यभूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे.
या पुरस्कारासाठी जवळपास ३५० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातून या पुरस्कारासाठी “कैवार ” या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. डॉ.शिंदे यांच्या काव्यसंग्रहाला आतापर्यंत मिळालेला हा १७ वा पुरस्कार आहे.
या पुरस्कार निवडीचे पत्र डॉ.शिंदे यांना नुकतेच प्राप्त झाले. या पुरस्काराची घोषणा मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे, राष्ट्रीय सरचिटणीस तथा जेष्ठ लेखिका नीलिमा जोशी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव वर्षा थोरात यांनी नुकतीच केली.
पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. सदरच्या पुरस्काराचे वितरण दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी सकाळी १० वाजता तृप्ती मंगल कार्यालय,पोळ पेट्रोल पंपाशेजारी, मेन रोड, मु.पो.म्हसवड, ता.माण जि. सातारा येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काव्यसंग्रहास एकूण १७ पुरस्कार मिळाले
डॉ.शिंदे यांचा “कैवार” हा काव्यसंग्रह शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. आतापर्यंत या काव्यसंग्रहास एकूण सतरा (१७) पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ.शिवाजी शिंदे यांना आतापर्यंत विविध क्षेत्रातील एकूण २९ पुरस्कार मिळाले आहेत. हा त्यांना मिळालेला ३० वा पुरस्कार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे मा.कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस, विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.