कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन व विकिस्त्रोतात वाचकार्पण
परिसर शास्त्रज्ञ, पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते कार्यक्रम
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे वाचकार्पण करण्याचा सोहळा परिसर शास्त्रज्ञ पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते रविवार, 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी11 वाजता ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.
मराठी भाषा पंधरवड्याच्या अनुषंगाने विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने या प्रकाशन व वाचकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली. सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभणार आहे. झूम अॅपव्दारे हा प्रकाशन व वाचकार्पण सोहळा होणार असून त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी, अध्यापक , अर्थशास्त्राचे अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात या ग्रंथाच्या लेखिका आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की, हा ग्रंथ तीन भागात विभागलेला आहे. यात जागतिक समस्या, तत्कालीन भारतीय स्थिती तसेच महाराष्ट्र आणि विदर्भातील स्थिती यावर आधारलेले सोळा लेख यात आहेत. यात प्रामुख्याने आर्थिक समस्यांचा अभ्यास मांडलेला असून या ग्रंथास प्रख्यात लेखक व अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची प्रस्तावना लाभली आहे. पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे व विकिमिडिया मुक्त ज्ञानस्त्रोतात याचे वाचकार्पण होत आहे याचा मला आनंद वाटतो.
सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी सांगितले की, विकिमिडिया प्रकल्पाच्या अंतर्गंत विकिपिडिया, विकिस्त्रोत असे अनेक प्रकल्प चालतात. मराठी भाषेतील लेखकांनी आपले ग्रंथ विकिस्त्रोत या मुक्त ज्ञानस्त्रोतावर उपलब्ध करुन द्यावेत व मराठी भाषेच्या समृध्दीला हातभार लावावी अशी मोहीम आम्ही विकीमिडिया प्रकल्पांतर्गत हाती घेतली आहे.
मराठी भाषा पंधरवड्यात आमच्या या मोहिमेला प्रतिसाद देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस त्यांचा नवाकोरा ग्रंथ ऑनलाईन स्वरुपात प्रकाशित करुन, त्याचक्षणी विकिमिडिया मुक्त ज्ञानस्त्रोतात वाचकार्पण करीत आहेत हा चांगला आदर्श आहे. असा वाचकार्पण सोहळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे आणि हा ग्रंथ विकिमिडिया ज्ञानस्त्रोतात लोकार्पण होऊन सर्वांसाठी खुला होत आहे, याचा मला आनंद वाटतो.
संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक व सर्व वाचकांना उपयुक्त असा हा ग्रंथ असून तो ई-बुक स्वरुपात विकिमिडिया प्रकल्पात विकिस्रोतव्दारे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सामाजिकशास्त्रे संकुलांचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी केले आहे.