(स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे) नटसम्राट नाटकातील बेलवरकरांच्या ‘कुणी घर देता का रे घर’ हा गाजलेला सुप्रसिद्ध संवाद आपण सर्वाना माहित आहे. प्रसार माध्यमातून आणि समाज माध्यमांवर अशाच प्रकारची एक बातमी ठळकपणे फिरते आहे, ‘कुणी मुलगी देता का रे मुलगी’. समाजातील या ज्वंलत प्रश्नाकडे समाज किती गांभिर्याने पाहतो आहे, हा संशोधनाचा आणि चिंतनाचा विषय आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अविवाहीत तरूणांनी नवरदेवाचा साज चढवून, घोड्यावर बसून मुलगी मिळत नाही म्हणून नेलेला मोर्चा हा समाजातील अंत्यत संवेदनशील विषयाला हात घालणारा आहे. यावर समाजाने गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. एकेकाळी भारतीय कृषी व्यवस्था हा देशाचा पाया मानला जात होता.
परंतू शैक्षणिक क्रांती आणि औद्योगिक प्रगतीमुळे आता कृषी दुय्यम आणि शिक्षण प्रथम अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच शिक्षणात मुलींनी घेतलेली आघाडी खरोखरच क्रांतीकारी म्हणावी लागेल. ‘चार भिंतीच्या आड’ आणि ‘सातच्या आत घरात’, ‘चुल आणि मूल’ या म्हणी केवळ महिलांसाठी तयार झाल्या होत्या. त्यांना आता शिक्षणातून फाटा दिला गेला आहे.
शिक्षणाची कवाडे मुलींसाठी बंद असलेल्या याच भूमीत आता शिक्षणाच्या समान संधी मुलींसाठी प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध आहेत. अंगवाडीच्या आशा वर्कर पासतून तर पायलटच्या पर्यंतच्या सर्व संधी आणि आयटी इंजिनियरपासून तर नासा संशोधन क्षेत्रातपर्यंत सर्वच दालने आता मुलींसाठी खुले आहेत. क्रीडा क्षेत्राच्या मैदानासून अवकाशापर्यंतच्या क्षेत्रात मुली ‘मैदान’ गाजवत आहेत.
ट्रक ऑपरेटरपासून संरक्षण दलापर्यंत आणि सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत महिला आपले कर्तृत्व आजमावतांना दिसत आहेत, ही आनंदाची बाब आहे. म्हणजे समाजकारण, राजकारण, वैद्यकीयक्षेत्र, संशोधन, अवकाश, आयटी, कृषी, संरक्षण, क्रीडा, बँकींग, शेअर मार्केट असे कोणते क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिला नाहीत. त्यामुळे पराधिन, अबला, निराधार या शब्दांनाही आत मर्यादा पडल्या आहेत.
स्वालंबी होवून स्वतःच्या पायावर उभी राहणारी नव्या युगाची ‘नवी तरूणी’ आम्हाला सर्वच आघाड्यांवर काम करतांना दिसते. आई-वडील जे सांगतील ते करणारी ‘आज्ञाधारक’ मुलगी आता स्वतंत्रपणे विचार करू लागली आहे. तिच्या स्वतःविषयीच्या जगण्याच्या संकल्पना ती ठरवू लागली आहे. शत-प्रतिशत हे प्रमाण नसले तरी अधिकांश प्रमाणात परिवर्तनाच्या या 21 व्या शतकात व तंत्रज्ञानाच्या युगात मुलींनी निश्चितपणे अवकाशात झेप घेतली आहे हे मान्य करावे लागेल. शिवाय मुलींमध्ये असलेली जिद्द, एकाग्रता, प्रामाणिकता आणि आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे महिला सर्वच क्षेत्रात यशस्वी ठरत असून आघाडीवर दिसत आहेत.
अशा या पार्श्वभूमीवर विवाहासंदर्भात जी मुलगी आई-वडीलांवर विसंबून असायची ती आत स्वतःची निर्णय घेवू लागली आहे. आपला जीवनसाठी कसा असावा याबद्दल आपल्या भावना ती आपल्या आई-वडीलांजवळ व्यक्त करू लागली आहे. अशा या काळात श्रेष्ठ नवरा मुलगा आणि कनिष्ठ नवरी मुलगी हे समिकरण पूर्णपणे बदललेले आहे. आता ‘दोघांची पसंती’ असेल तरच आई-वडील पुढचे पाऊल टाकतात ही वस्तूस्थिती आहे. याशिवाय संयुक्त कुटूंब व्यवस्था मोकडळीस आल्याने आता ‘हम दो, हमारे दो’ किंवा ‘हम दो, हमारा एक’ अशी त्रिकोणी किंवा चौकानी कुटूंब व्यवस्था निर्माण झाली आहे.
गरीब असो, मध्यम वर्गीय असो वा श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय असो अशा सर्वच कुटूंबामध्ये मुलगी ही लाडाची झालेली आहे. तिच्या शिक्षणाकडे पालक लक्ष देवू लागले आहेत. तिने शिक्षण घेवून नोकरी करावी अशी पालकांची धारणा झालेली आहे.
म्हणून तिच्यासाठी उच्च शिक्षीत, नोकरदार मुलगाच शोधला जातो. अर्थात यात चुकीचे असे काहीच नाही. परंतू ग्रामीण भागात असलेली कृषी व्यवस्था, कुटूंब व्यवस्था यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नाकारली जाते आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. ज्या कृषीवर आमची संपूर्ण व्यवस्था उभी आहे त्या कृषी क्षेत्रात पदवीधर परंतू नोकरी नसलेले तरूण कृषी क्षेत्रात अंत्यत चांगल्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत. परंतू शेती करणारा मुलगाच नको ही भूमिका मोठ्या प्रमाणावर समाजात दिसून येते.
शेती असेल, लहानसा व्यवसाय असेल, वेतन कमी असेल परंतू अशा मुलांना नाकारण्याची भूमीका मुलीच्या पालकांनी अलिकडच्या काळात घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसते. तसेच नोकरी करणारा मुलगा हा पुणे, मुंबई, बँगलोर सारख्या शहरात असावा, त्याला गळेलठ्ठ पॅकेज असावे, स्वतःचा फ्लॅट असावा, त्याच्याजवळ फोरव्हिलर असावी अशी भूमीका स्विकारून चांगल्या गुणी मुलांना जे शेती करतात, ज्यांना कमी पॅकेज आहे, जे लहानसा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहेत, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरामध्ये काम करत आहेत त्यांनाही पसंती न देणारी मानसिकता समाजात वाढली आहे.
जी स्वस्थ समाजव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. म्हणून लग्नासाठी ‘कुणी मुलगी देता मुलगी’ अशी मागणी मुलाचे आई-वडील व मुलांकडून होते आहे. अशा या मागणीसाठी सोलापूर शहरात भावी नवरदेवांची बँण्ड वाद्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर घोड्यावर बसून निघालेला मोर्चा हा खर्या अर्थाने समाज व्यवस्थेचे ‘नग्न स्वरूप’ दाखविण्यासाठी पुरेसा आहे.
मुलांच्या प्रमाणात मुलींचे कमी होत जाणारे प्रमाण देखील यासाठी कारणीभूत आहे. सुन हवी परंतू मुलगी नको समाजाची भिकारचोट मानसिकता, गर्भलिंग निदान चाचण्यांना बंदी असली तरी ना-लायक आणि लालची डॉक्टरांच्या शोधात असतात. आणि गर्भलिंग निदान करून मुलगी असेल तर तो गर्भ काढून टाकतात. ‘ज्या घरात मुलगी असते ते घर हसते’ तो बाप भाग्यशाली असतो, ज्याला मुलगी असते परंतू मुलींच्या संदर्भातील हलकत मानसिकता समाजात अनेक प्रश्न निर्माण करतात.
वधू पक्षाकडून मागीतला जाणरा हुंडा हा गंभीर प्रश्न देखील त्यासोबत आहे. त्यामुळे मुलींच्या संदर्भातील सर्वच मानसिकता जो पर्यंत समाज बदलणार नाही तो पर्यंत आता मुली मिळणार नाहीत हे सत्य आहे. सर्वच स्तरावर सर्वच बाबतीत आम्हाला आमच्या तुच्छ मानसिकता बदलाव्या लागतील. मुलीच्या वडीलांच्या वेदना, चिंता संपायला हव्यात मुलीवर होणारे अत्याचार, मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोण हे सर्वच बदलावे लागेल. अर्थात हा विषय खूप मोठा आहे.
एका लेखात त्याची व्याप्ती बसविता येणार नाही. परंतू समाजाने आता आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्रात काम करणोर तरूणच आता येणार्या काळात ‘किंग’ ठरणार आहेत. मेट्रो शहरातील ‘आभासी’ आणि ‘चकाकणारी’ शहरे केव्हा अंधारात बुडतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे ‘जुने ते सोने’ या म्हणीनुसार आम्ही आमची विचारशक्ती बदलण्याची आवश्यकता आहे. एव्हढेच.
– इंटरनेट