किसान रेल्वेच्या 800 फेऱ्या पूर्ण
सोलापूर विभागातील मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक
News Desk / नाना हालंगडे
किसान रेल्वेने पन्नास टक्के अनुदानासह भारतातील विविध बाजारपेठेत रेल्वेने 800 फेऱ्या पूर्ण केल्या असून यामधून 2 लाख 75 हजार 761 टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे.
मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेने आपल्या 800 व्या फेरीत 207 टन पपई, डाळिंब, केळी, बोर, अदरक, कांदा इत्यादी फळे व भाजीपाला सांगोला, दौंड आणि येवला येथून बिहार राज्यातील दानापूर, मुझफ्फरपूर येथे नेले आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी पहिली किसान रेल्वे आणि 28 डिसेंबर 202O रोजी 100 किसान रेल्वेच्या फेरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेबलिंकद्वारे हिरवा दिवा दाखविला होता.
पहिली किसान रेल सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या 800 फेऱ्यांमधून 2 लाख 75 हजार 761 टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. किसान रेलची 500 वी फेरी दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी चालली. आता किसान रेलची 800 वी फेरी दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी सांगोला ते मुझफ्फरपूर करीता निघाली.
सोलापूर विभागातील डाळिंब, द्राक्षे, लिंबू, सिमला मिरची, कस्तुरी, खरबूज, पेरू, सिताफळ, बोर, लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, अहमदनगर आणि नाशिक विभागातील कांदा, सोलापूर जिल्ह्यातील तसेच भुसावळ आणि जळगाव विभागातील केळी, नागपूर विभागातून संत्री आणि इतर फळे व भाजीपाला दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल सारख्या दूरच्या बाजारपेठेत जलद आणि ताजी राहतील.
अशा पद्धतीने किसान रेलद्वारे पाठविल्याने त्यांच्या मालाला चांगला भाव, जलद वाहतूक, किमान माल वाया जाते व मोठ्या बाजारपेठांसह चांगला महसूल मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.
मध्य रेल्वेत सात किसान रेल
देवळाली – मुझफ्फरपूर, सांगोला – मुझफ्फरपूर, सांगोला – आदर्श नगर दिल्ली, सांगोला – शालीमार, रावेर – आदर्श नगर दिल्ली, सावदा – आदर्श नगर दिल्ली आणि गोधनी – आदर्श नगर दिल्ली आणि या अनुसूचित किसान रेल व्यतिरिक्त अनेक अनशेड्यूल किसान रेल चालवण्यात येत आहेत.